हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाचं नाव वापरा : मुख्यमंत्री

25 Jun 2022 16:52:57

news 1





मुंबई
: स्वतःच्या बापाचं नाव वापरायचं तर वापरा माझ्या बापाचं नाव वापरू नका, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिवसेना गट आणि एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही, असा महत्वपूर्ण ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. तसे पत्र शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहे.


याशिवाय गद्दारांवर कारवाई करण्याचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. यासह इतर पाच ठराव या बैठकीत करण्यात आलेले आहेत. यामुळ एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांची मोठी अडचण झाली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका नेमकी काय असेल तसेच शिंदे गट आता न्यायालयीन लढाई लढणार का याबद्दल स्पष्टता झालेली नाही. मात्र, उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंबद्दल आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे.


एकनाथ शिंदे यांच्या गटाने गुवाहाटीतील हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेना-बाळासाहेब, असे ठेवले होते. त्यानंतर झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. त्यामुळे शिंदेंची मोठी अडचण झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे नाव शिवसेना-बाळासाहेब, असे ठेवले आहे. शिंदे गटाने मात्र, आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत. जास्तीचे संख्याबळ आमच्याकडे आहे, असा दावा केला आहे.

शिवसेनेच्या बैठकीत झालेले नेमके सहा ठराव कोणते?

१. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती आणि ती कायम राहील.
२. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर राष्ट्रीय कार्यकारिणीचा विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना असतील.
३. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे अधिकारही उद्धव ठाकरेंना असतील.
४. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही.
५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.
६. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन ठराव.








Powered By Sangraha 9.0