विज्ञानसाक्षर विद्यार्थी घडविणारा शिक्षक

25 Jun 2022 10:18:18

Yogesh R
 
 
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी, त्यांना विज्ञानसाक्षर करण्यासाठी गेल्या १६ वर्षांपासून झटणार्‍या शिक्षक योगेश रूपवते यांच्याविषयी...
 
 
 
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावातील योगेश मनोहर रूपवते यांचा जन्म. नवीन मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांना चित्रकलेची आवड जडली. वडील शिक्षक असल्याने ते ग्रंथालयातील पुस्तके वाचून झाल्यानंतर योगेश यांना वाचनासाठी देत. तसेच योगेश यांना शाळेत चंदनापूरकर मॅडम यांच्या उत्तम हस्ताक्षरासोबत त्यांचे मार्गदर्शनही मिळत होते. हळूहळू योगेश यांना वाचनाची गोडी लागली. अतिवाचनाने डोळ्यांवर अतिताण पडल्याने लहानपणीच डॉक्टरांच्या सल्ल्याने चष्मा लागला. वडील शिक्षक असलेल्या शाळेतच त्यांनी पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान, त्यांना खो-खोची आवड लागली. पुढे आठवीला मालपाणी विद्यालयात प्रवेश घेतला. यावेळी सर्व शिक्षक तरुण आणि नुकतेच रूजू झालेले होते. हे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत असल्याने त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकता आल्या. शाळेच्या बॅण्ड पथकातही त्यांचा सहभाग होता. १९९८ साली ७५ टक्के मिळवत योगेश दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर ठरल्याप्रमाणे सारडा महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली. घरात वडील, मामा, काका, मावसभाऊ असे सर्वच शिक्षक असल्याने त्यांनीही शिक्षक व्हायचे ठरवले होते. त्यामुळे संगमनेरलाच ‘बीएड’साठी प्रवेश घेतला. याठिकाणी प्रा. राजश्री बाम यांचा विनयशीलपणा आणि गाढा अभ्यास यामुळे योगेश प्रेरित झाले. ‘बीएड’नंतर अहमदनगर महाविद्यालयामध्ये ‘एमएससी’साठी प्रवेश घेतला, याचबरोबर त्यांनी नोकरीसाठीही अर्ज करण्यास सुरुवात केली.
 
 
 
‘एमएससी’च्या पहिल्याच वर्षी त्यांना ‘रयत शिक्षण संस्थे’कडून नोकरीसाठी फोन आला आणि सिन्नरच्या ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालयात ते शिक्षणसेवक म्हणून रूजू झाले. घर दूर असल्याने ते भाड्याच्या खोलीत राहू लागले. सुरुवातीच्या काळात योगेश यांनी गणित व त्यानंतर सेमी इंग्रजी आल्याने ते विज्ञान विषय शिकवू लागले. त्यांना मुलांमध्ये रमणे आवडत होते. विज्ञान हा विषय प्रयोगांच्या माध्यमातून लवकर समजतो. मात्र, त्यावेळी ग्रामीण भागातील शाळांतील विज्ञान प्रयोगशाळा अद्ययावत नव्हत्या. त्यामुळे योगेश यांनी नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, त्याद्वारे प्रयोग करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना ते घरच्याघरी करता येतील असे प्रयोग करण्यास सांगत. पदार्थातील भेसळ ओळखणे, पानांचे निरीक्षण करणे, फुग्यात हवा भरून तो सोडणे, असे अनेक प्रयोग ते घरी करायला सांगतात. या अशा छोट्या कृतीतून विज्ञानाच्या संज्ञा विद्यार्थ्यांना लवकर समजू लागल्या. संसाधनांची मर्यादा लक्षात घेता ते विद्यार्थ्यांना घरून आणणे शक्य असणार्‍या गोष्टी शाळेत प्रयोगाकरिता घेऊन यायला सांगत. वर्गापेक्षा मोकळ्या वातावरणातील शिक्षण विद्यार्थ्यांना आवडते. कारण, निसर्गातील अनेक गोष्टींतून बरच काही शिकता येतं. त्यामुळे त्यांचा भर हा वर्गाबाहेरील शिक्षणाकडे अधिक होता. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत तंत्रशिक्षण विभाग आहे. यातील शेती, पशुपालन, विद्युत, गृहउद्योग अशा विविध कोर्सद्वारे विद्यार्थी भविष्यात आपल्या पायावर उभे राहू शकतात. या विभागाची जबाबदारी योगेश यांच्याकडे आहे. योगेश यांनी रूजू होताच शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली. मुलांना योग्य मार्गदर्शन केल्याने मुलांचा विज्ञानाकडे कल वाढला. केळीच्या सालापासून इंधननिर्मिती या प्रकल्पाची भोपाळ येथील प्रदर्शनात उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड झाली. यासाठी ऋषिकेश आंधळे हा विद्यार्थी शाळेचा प्रतिनिधी होता.
 
 
 
दुचाकीपासून शेतीची कामे करण्याच्या प्रकल्पालाही प्रचंड यश मिळाले. इतके सारे प्रकल्प बनवणे म्हणजे, खर्चही तितकाच मोठा. मात्र, शाळेच्या मर्यादा आणि विद्यार्थ्यांची गरीब परिस्थिती त्यामुळे योगेश स्वतः पैसे खर्च करतात. आतापर्यंत त्यांनी विज्ञान प्रकल्प तयार करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले. पैशाचा विचार त्यांनी केला नाही. कारण त्यांना विद्यार्थ्यांना विज्ञानसाक्षर करण्याबरोबरच त्यांना नाउमेद करायचे नव्हते. स्कॉलरशिप विभाग, हरित सेना यांची जबाबदारीही ते सांभाळतात, हरित सेनेच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत एक हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. पर्यावरणासंदर्भातील काम लक्षात घेता त्यांना २०१५ साली ‘सृष्टीमित्र’ पुरस्कारही मिळाला. विशेष म्हणजे, सचिन गिरी यांच्यामुळे सर्पमित्र झालेल्या योगेश यांनी आतापर्यंत २०० हून अधिक सर्पांना नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. योगेश यांना मुख्याध्यापक बाळासाहेब पगारे यांसह अनिल वसावे, वसंत कवडे, राहुल पगारे, रियाज मणियार, किशोर जाधव, विजय वाकचौरे यांचे सहकार्य मिळते. योगेश यांच्या पत्नीदेखील ‘एम.ए’ ‘डीएड’ आहेत. कोरोना काळात वडील आणि भावाचे एकाच दिवशी निधन झाल्याने योगेश यांना मोठा धक्का बसला. विज्ञान विषय दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. विज्ञान शिकणे आवश्यक असून, त्यामुळे अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होते. विज्ञान समजून घेऊन माणसाने विज्ञाननिष्ठ राहावे. तसेच, मुलांना विज्ञान साक्षर बनविण्यासाठी शेवटपर्यंत झटणार असल्याचे योगेश सांगतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानसाक्षर करण्यासाठी धडपडणार्‍या योगेश रुपवते यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांच्या आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0