‘पीएनजी’च्या अजित गाडगीळ यांचे ‘झपूर्झा’: एक इनोव्हेटिव्ह ‘आर्ट डेस्टिनेशन’

    25-Jun-2022
Total Views |

Gadgil
 
 
 
कुणीतरी सांगून ऐकणं आणि मग आपण आपलं मत बनवणं, यापेक्षा आपण स्वत: जाऊन एखादी गोष्ट पाहणं आणि मग आपण आपलं मत बनविणं, या दोन कृतींमध्ये दुसरी कृती अधिक प्रभावी आहे. आजचा लेख हा अशाच एका भन्नाट गोष्टीविषयी माहिती सांगणारा आहे. ‘संग्रह’ या शब्दाची व्याप्ती किती व्यापक आहे, हे विशद करणार्‍या आजच्या लेखात एका हटके संग्रहालयाबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. याविषयी मीही ऐेकलं आणि वाचलं होतं, तोपर्यंत फारसं विशेष वाटलं नाही. परंतु, जेव्हा मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलं, तेव्हा वाटलं हा विषय केवळ माझ्या एकट्याचा नसून हा विषय सर्वांसाठी आहे, सर्वांनी पाहण्याचा आहे. त्यासाठी आजच्या लेखणीला म्हटलं, आज तुझाच दिवस आहे.
 
 
 
‘संग्रहालये’ अर्थात ‘म्युझियम्स’ हा शब्द आपण निश्चित ऐकलेला असेल. मग, ती कोणत्या विषयाला वाहिलेली असतात, ते विषय, ‘ती’चं महत्त्व काय, त्याविषयी अशी बरीच अमूल्य आणि दुर्मीळ माहितीसह त्या संग्रहित वस्तू आपणांस पाहायला मिळतात. भारतातील काही प्रमुख संग्रहालयांच्या यादीत सुमारे २८-३० संग्रहालये ही विशेष उल्लेखनीय आहेत, त्यापैकी तब्बल १२ संग्रहालये ही एकट्या पुण्यात आहेत. आगाखान राजवाडा पुणे, आदिवासी वस्तुसंग्रहालय पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय पुणे, डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय पुणे, म. फुले वस्तुसंग्रहालय लॉर्ड रे म्युझियम पुणे, भारत इतिहास संशोधन मंडळ संग्रहालय पुणे, भूमिअभिलेख संग्रहालय पुणे, राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय पुणे, रेल्वे संग्रहालय पुणे, लोकमान्य टिळक संग्रहालय पुणे, वैदिक संशोधन मंडळ-यज्ञासाठी लागणार्‍या वस्तूंचे संग्रहालय पुणे आणि आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी संग्रहालय पुणे, यांसह पुण्यात महाराष्ट्रात आणि अखिल भारतात ज्ञात-अज्ञात म्हणण्यापेक्षा प्रसिद्ध-अप्रसिद्ध अशी अनेक संग्रहालये आहेत. अनेक वैयक्तिक संग्रहक असे आहेत की, त्यांच्याकडील जुन्या दुर्मीळ वस्तू पाहून आपण थक्क होतो. ही संग्रहालये पाहताना माझ्यातला कलाशिक्षक जो जागाच असतो, तो स्वगत संवाद साधू लागतो, अशी संग्रहालये कलाविद्यार्थ्यांनी तसेच खासकरून शालेय, माध्यामिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पाहिली, तर त्यांची पाठांतरं करून आठवणीत ठेवण्यासाठीची (अनावश्यक लागणारी वाया जाणारी) ऊर्जा वाचू शकते. जेव्हा या विद्यार्थ्यांसाठी संग्रहालयांच्या भेटीचा कार्यक्रम आखला, तर एकप्रकारे ‘म्युझियम पर्यटन’च!
 
 
 
खूप पूर्वी म्हणजे इ. स. पूर्व २८० पासून संग्रहालये, कलादालने यांचा उपयोग समाजशिक्षणासाठी होतो, हे सिद्ध झालेले आहे. संग्रहालयाला भेट देणार्‍यांना अनेक प्रकारचे लाभ होतात. त्यांना भेट देत काहीतरी शिकू इच्छिणार्‍यांचे शिक्षण तर होतेच, पण त्याचबरोबर माहितीत भर पडते. त्या व्यक्तीची दृष्टी व्यापक बनते. स्मृतिप्रवणता वाढते. संदर्भशक्ती, गुणग्राहकशक्ती वृद्धिंगत होते. एकूणच संग्रहालय म्हणजे समाजशिक्षणाचं महत्त्वाचं केंद्रंच मानलं जावं, इतकं त्याचं अमूल्यत्व आहे. म्हणूनच कदाचित पहिल्या येलेमीने इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिले वस्तुसंग्रहालय स्थापले. आपल्या आजच्या लेखाची प्रस्तावना खरंतर एका महान ऐतिहासिक ग्रंथनिर्मितीचा भाग आहे. फार न लांबवता एका झपाटलेल्या आणि झपाटून टाकणार्‍या म्हटलं, तर कलंदर; म्हटलं तर अवलिया आणि म्हटलं तर संग्राहक व्यक्तीच्या छंदातून निर्माण झालेले विश्व आहे, हे विश्व निर्माण करण्यासाठी त्यांच्या मौल्यवान सुवर्णपेढीहून कित्येक पटींनी अमूल्य वेळ त्यांनी अमूल्य-दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करण्यासाठी उपयोगात आणलेला आहे. तब्बल दोन तपांहून अधिक वर्षांची तपश्चर्या दि. १८ मे, १९२२ ला ‘झपूर्झा’च्या रुपाने फळाला आली. ‘झपूर्झा’ म्हणजे झपाटलेपणाने जगणे. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांनी या शब्दाचा वापर म्हणण्यापेक्षा उपयोग सर्वप्रथम प्रचारात आणला. साधनेतील एका अवस्थेला ‘उन्मनी अवस्था’ म्हणतात. ‘तुरियावस्था’, ‘उन्मनी अवस्था’ या विविध प्रकारच्या अवस्था सप्तपुरुषांच्या बाबतीत ऐकायला, वाचायला मिळतात. १८९३ साली ‘उन्मनी अवस्थे’चे वर्णन करण्यासाठी ‘झपूर्झा’ या शीर्षकाच्या कवितेत केशवसुतांनी सर्वप्रथम हा शब्दप्रयोग केेलेला आहे.
 
 
 

Art 
 
 
पुण्यापासून सिंहगड रस्त्यावर खडकवासला जलाशयाजवळ एका किनार्‍याला कुडजे नावाचे गाव आहे. या गावात सुमारे आठ एकरावर हे ‘झपूर्झा’ नावाचे संग्रहालय आहे. ज्यांच्या नावातच ‘अजित’ आहे, अशा अजित गाडगीळ नावाच्या अत्यंत सामान्य राहणीमान असणार्‍या परंतु असामान्यत्व पदाला पोहोचलेल्या सुवर्णोद्योजकाने समाजऋण फेडण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयोग, अत्यंत अमूल्य उपक्रम आणि अत्यंत उपयुक्त ज्ञानवृद्धी करणारा कार्यक्रम म्हणजे ‘झपूर्झा’ची निर्मिती होय. ‘पीएनजी’ म्हणजे सुवर्णालंकार विश्वातील विश्वास संपादन केेलेले द्विशतकाकडे आगेकूच करणारे भरवशाचे नाव सर्व जगभरात व्यापलेले आहे. ‘पी. एन. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स’ अशा नावाची वेगळी ओळख सांगण्याची आवश्यकताच नाही. फक्त एक सांगावसे निश्चित वाटेल, ‘अ‍ॅण्ड सन्स’मधील एक नाव म्हणजे अजित गाडगीळ. त्यांच्या डोळस निष्ठेतून ‘झपूर्झा’ची निर्मिती झाली आहे. कोल्हापूर येथील प्रथितयश आर्किटेक्ट शिरीष बेरी यांनी ‘झपूर्झा’चे ‘डिझाईन’ केले आहे. या ‘आर्ट डेस्टिनेशन’मध्ये आठ कलादालने, एक ‘अ‍ॅम्पिथिएटर’, एक ‘कॅफेटेरिया’, एक ‘सोव्हेनियर शॉप’ आहे आणि दर शनिवारी सांस्कृतिक मेजवानी, अशा सर्वांगसुंदर कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल म्हणजे ‘झपूर्झा’ होय.
 
 
 
येथील पहिली गॅलरी ‘द कलेक्शन’ या नावाने विकसित केली आहे, या गॅलरीत देशातील प्रसिद्ध चित्रकारांची ‘पेंटिंग्ज’ पाहायला मिळतात. एस. एच. रझा, के. एच. आरा, एम. एफ. हुसेन, अमृता शेरगील, प्रभाकर बर्वे, अतुल दोडिया, नसरीन मोहम्मदी अशा सुप्रसिद्ध चित्रकारांची पेंटिंग्ज पाहता येतात. दुसरे दालन आणखीच आगळेवेगळे आहे. ‘लाईट ऑफ लाईफ’ या नावाच्या या कलादालनात प्रवेश करताना अंधारातून प्रवेश करून मिणमिणत्या दिव्यांच्या प्रकाशात वस्तू पाहाव्या लागतात. प्राचीन पारंपरिकतेपासून आधुनिक काळातील दिव्यांपर्यंत अनेक प्रकारच्या दिव्यांच्या रचना पाहावयास मिळतात. जहाजावरील दिवे, रात्रीचे गावांकडील खांबावरील दिवे, लामणदिवे, समया, पणत्या अशा अनेक प्रकारच्या दिव्यांची मांडणी या दालनात पाहायला मिळते. येथे तिसरे दालन आहे, ‘प्रिंट अ‍ॅण्ड इम्प्रिंट’ या नावाचे. गेल्या १०० वर्षांचा छपाईतंत्राचा विकास या दालनात आल्यावर पाहायला मिळतो. मग राजा रवी वर्मा यांच्या काळातील ‘ओलिओग्राफ’ येथे पाहायला मिळतात. १८९४ मध्ये राजा रवी वर्मा यांनी जर्मनीमधून प्रिंटिंग प्रेस आणि तंत्रज्ञ बोलवून मुंबईत गिरगावला ‘रवी वर्मा प्रेस’ची स्थापना केली. त्या काळातील काही छपाई नमुने या दालनात पाहायला मिळतात. याच दालनात खूप जुन्या डब्यांवरील रंगीत छपाई केलेली चित्रे-प्रसंग, व्यक्तिचित्रे अशी भूतकाळाला वर्तमानात आणणारी कामे येथे प्रत्यक्ष पाहायला मिळतात.
 
 
 
Zapurza
 
 
 
येथे आणखी एक दालन आहे. ‘महाराष्ट्राची वैभवशाली वस्त्रपरंपरा’ असं त्याचं नावं. या दालनात पैठणी-जरीच्या साड्या, पितांबर अशा प्राचीन वस्त्रांची मांडणी केलेली आहे. पैठण (प्रतिष्ठान) किंवा तेर (तगर) ही महाराष्ट्रातील वस्त्रनिर्मितीची प्राचीन केंद्रे त्या काळापासून प्रसिद्ध आहेत. तेथील पैठणी, पेशवाई, तीळ पैठणी, मराठेशाहीतील पैठणी येथे पाहायला मिळतात. पैठणीचे पैठणीपण या साडीच्या विशिष्ट जरीकाठांमध्ये व ‘डबल इंटरलॉक टेप्रेस्ट्री’ या तंत्राने जरीने विणलेल्या पदरात आणि काठांमध्ये आहे. म्हणजेच ‘टेपेस्ट्री’ तंत्राचा वापर हे पैठणीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ‘डबल इंटरलॉक टेपेस्ट्री’ तंत्राला भारतात वेगळे असे नाव नाही. कदाचित भारतात पैठण येथेच पहिल्यांदा या तंत्राचा वापर करून वस्त्रं विणली गेली. महाराष्ट्रातील वस्त्रपरंपरा ही फक्त उपयोगिता व व्यापार यात मर्यादित न राहता, त्यातून एक नयनरम्य वस्त्रसंस्कृती साकारत गेली. ही संस्कृती या दालनात दृश्यमान आहे. येथेच ‘पितांबर’ हा वस्त्रप्रकारही पाहायला मिळतो. ‘रेशमा’पासून हे वस्त्र बनवतात. ‘मुकटा’ (मुक्त) हा रेशमप्रकारदेखील ‘पितांबर’मध्ये येथे पाहावयास मिळतो. आणखीन एक दालन आहे. या दालनात ठरावीक महिन्यांनंतर एका प्रथितयश कलाकाराच्या कलाकृती ठरावीक काळासाठी प्रदर्शित करण्यात येतात आणि त्या दालनाला ‘त्या’ कलाकाराचे नाव देण्यात येते. हा एक आगळावेगळा सन्मानच जणू ‘झपुर्झा’ने त्या कलाकाराला दिलेला आहे. एक दालन आहे, त्याचे नाव ‘१८३२.’ या दालनात ‘१८३२’ पासूनचे दागिने, अलंकार आणि दुर्मीळ वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत. यात राजघराण्यातील स्त्रिया टाच घासण्यासाठी जी वस्तू वापरावयाच्या तिला ‘वज्री’ म्हणतात, तीसुद्धा येथे पाहावयास मिळते. या दालनात भातुकलीची भांडी, पंचपाळे, चौपाळे, त्रिपाळे, फुलदाण्या, अत्तरदाण्या अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात.
 
 
 
एका दालनाचे नाव आहे, ‘महाराष्ट्र स्कूल कला आणि विचार १.’ या दालनात ‘महाराष्ट्र स्कूल’मधील काही नामवंत चित्रकारांची नावे आणि त्यांच्या कलाकृती पाहायला मिळतात. ‘बॉम्बे स्कूल’मधील ‘आर्टिस्ट्स’ जसे की, एस. एल. हळदणकर, आबालाल रहीमान, एम. व्ही. धुरंधर अशा समकालीन कलाकारांच्या कलाकृती येथे पाहायला मिळतात. आठवे ‘कल्पदालन’ हे ‘अंशकालाचे कवडसे’ नावाने ओळखले जाते. यात आताच्या प्रयोगशील कलाकारांच्या कलाकृती असतात. अजित गाडगीळ यांचे विचार या दालनात वाचावयास मिळतात. ते लिहितात, “आपल्याकडे कला आणि संस्कृतीचा फार मोठा वैभवशाली वारसा आहे. आपण तो जपला पाहिजे, जोपासला पाहिजे, असे मला मनापासून वाटते. मला अशी आशा आहे की, ‘झपूर्झा’ या सगळ्यात खारीचा वाटा तरी उचलेल. लोकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये कलेची जाणीव, कलेची आवड निर्माण करेल आणि हा वारसा, ही परंपरा पुढे नेईल.” त्यांच्या भावना आणि संस्कृतीबद्दलची आत्मियता येथे व्यक्त होते. चित्रकार राजू सुतार आणि विक्रम मराठे हे दोन अनुभवी चित्रकार ‘झपूर्झा’चे डावे-उजवे हात आहेत. ‘झपूर्झा’ला भेट देण्याची इच्छा हा लेख वाचत असताना वाचकांना झालेली असणारच, म्हणून चौकशी करण्यासाठी विक्रम मराठे यांना ९७६३३३८६३६ या भ्रमणध्वनीवर संपर्क करुन माहिती विचारता येते. येणार्‍या ३० जूनपर्यंत ‘झपूर्झा’मध्ये विनामूल्य प्रवेश आहे. सुवर्णकलाकार, सुवर्णउद्योजक, अलंकारतज्ज्ञ, ‘झपूर्झा’चे शिल्पकार निर्माते आणि ‘पीएनजी’चे मालक अजित गाडगीळ यांना त्यांच्या ‘झपूर्झा’ उपक्रमांसाठी आभाळभर शुभेच्छा देताना आम्हाला आनंद होतो आहे...!
 
 
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.