मुंबई : "सुकलेली पानं गळलीच पाहिजेत, हा तर निसर्गाचा नियम आहे. ज्या पानांना कीड लागली आहे ती तोडावीच लागतील. नाहीतर ती कीड संपूर्ण झाड सडवून टाकेल.", असे विधान राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी (दि. २४ जून) शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते उपस्थितांशी बोलत होते. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि शिवसेनेतल्या आमदारांचं एकामागोमाग गुवाहाटीला जाणं यामुळे मुख्यमंत्र्यांनी असे विधान केल्याचे दिसते.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान शिवसेना पक्षाला गुलमोहराचं झाड संबोधत त्याचे उदाहरण देत एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाष्य केल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले. "गुलमोहराचं झाड हे फुलापानांनी बहरून गेलं होतं. परंतु निसर्गाचा नियम आहे की, सुकलेली पानं ही गळलीच पाहिजेत. ती जोवर गळत नाहीत तोवर तिला नवीन पालवी फुटणार नाही. त्यामुळे ही सुकलेली पानं गळून गेलीच पाहिजेत. ज्या पानांना कीड लागली आहे ती तोडावीच लागतील. नाहीतर ती कीड माझं संपूर्ण झाड सडवून टाकेल.", असे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले.
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून माझ्या मोहात अडकू नका
"मी कुठलेही भावनिक भाष्य करत नाही. मी केवळ बाळासाहेबांचा मुलगा आहे. म्हणून माझ्या मोहात अडकू नका. माझ्यापेक्षा शिवसेना हे बाळासाहेबांचं लाडकं अपत्य आहे. त्यामुळे मी व्यक्तीगतरित्या शिवसेना चालवायला नालायक आहे, असं वाटत असेल तर शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.", असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे.