वैदिक परंपरा आणि साधना

    दिनांक  23-Jun-2022 13:30:35
|
 
 
vaidik parampara
 
 
 
 
 
 
शिशुपालवध
‘शिशु’ शब्द ‘शश’ शब्दापासून झाला आहे. ‘शश’ म्हणजे ससा. ससा जसा टुणटुण उड्या मारत स्वैरसंचार करतो, अत्यंत लोभस दिसतो, तद्वत स्वैर स्वभावाची बालके त्यांच्या लोभसपणाने सशासारखी म्हणजे ‘शिशु’ असतात. अशा शिशुवृत्तीचे पालन करणारी साधकातील स्वैरवृत्ती म्हणजे ‘शिशुपाल’ होय. काही साधना केल्यावर साधकाचे मन अतिशक्ती संचारामुळे लहरी बनते. अशांना इतरजन ‘लहरीबाबा’ म्हणून गौरवितात. हे दोघांनाही घातक आहे. ज्याला भगवान गोपाळकृष्ण व्हायचे आहे, त्याने साधनेद्वारे येणारा लहरीपणा किंवा वेडपटपणा, स्वतः आपल्या हाताने नष्ट केला पाहिजे.
दुर्योधनाने दिलेले खांडववन जाळून पांडवांनी त्या ठिकाणी ‘इंद्रप्रस्थ नगरी’ स्थापन केली. इंद्राचे प्रस्थ असणारी ‘इंद्रप्रस्थ नगरी’ म्हणजे आपले शरीर होय, हे बुद्धिमंतांच्या लक्षात येईलच. पांडवांचा मोठा भाऊ जो धर्मराज म्हणजे साधकाचा पिंडधर्म याला राज्याभिषेक करायचे ठरले. अशा धर्मराजाला युधिष्ठिरसुद्धा म्हणत. आता हा युद्धात स्थिर असणारा युधिष्ठिर कोणत्या युद्धात स्थिर राहत असेल, याची कल्पना आपल्याला आहेच. धर्मराजाला राज्यभिषेक करायचा म्हणजे प्रथम एखाद्या पुरुषाचा अग्रमान करणे आवश्यक होते. अग्रमानाचा अधिकार भगवान श्रीकृष्णाचांच होता. भीष्म, द्रोण, कृप, कर्ण एवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष दुर्योधनानेसुद्धा कृष्णाला अग्रमान देण्यासंबंधी विरोध दाखविला नाही. पण शिशुपाल मानेना! शिशुपालाला सर्वांनी समजावले. पण शिशुपालच तो, ‘विवेक भ्रष्टानां भवति विनिपात: शतमुखः।’ असे शास्त्र सांगते. विवेक भ्रष्ट माणसाचा विवेक शतमुखाने भ्रष्ट होत असतो. म्हणून आपल्या श्रीकृष्णावस्थेचा मान कायम राखण्याकरिता साधकाने स्वत:च स्वतःतील लहरीपणाचा म्हणजे शिशुपालाचा वध करायला हवा, हे शिशुपालवध कथेतील खरे रहस्य आहे.
नरकासुर वध
कालयवन, शिशुपाल आदी दुष्टांचा नाश झाल्याने शांतता नांदून थोडा काळ भगवंताला स्वस्थता लाभली होती. पण, भगवंताला आराम कोठला? अजूनएक बलवान असुर मातला होता, त्याचे नाव नरकासुर होते. त्याचे काम एकच की, आसपासच्या राज्यांवर धाड घालून त्या राजांचा वध करायचा व त्यांच्या अविवाहित कन्यांना आपल्या महालात आणून भ्रष्ट करायचे आणि नंतर त्यांना आपल्या बंदिखान्यात जन्मभर ठेवून द्यायचे. अशा तर्‍हेने म्हणे या मातलेल्या नरकासुराने १६,१०० कुमारिकांना भ्रष्ट करून आपल्या बंदिखान्यात डांबले होते. काय या शूरवीरांच्या पुण्यभूमीत असल्या स्त्रीलंपट नराधमाच्या नरडीचा घोट घेणारा एकही पराक्रमी, शूर, बहाद्दर निघू नये? एकामागे एक बलात्कार होत होते आणि या देशातील वीरबहाद्दर ते अन्यायकर्म निमूटपणे पाहत होते.
शेवटी समाजसुधारक श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली. सखा अर्जुन याला घेऊन भगवान श्रीकृष्ण नरकासुराचे राज्यात पोहोचून त्याचा मध्यरात्री त्यांनी वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या १६,१०० कुमारिकांना मुक्त करून परत हस्तिनापूरला यायला निघाले. पण, पळविलेल्या भ्रष्ट कुमारिकांशी आता लग्न कोण करणार? म्हणून त्या १६,१०० कुमारिका श्रीकृष्णाने आपल्याला वरावे म्हणून आग्रह धरू लागल्या. श्रीकृष्णाने पोक्त विचार करून अर्जुनाला त्यापैकी एकही न देता, १६,१०० नारींशी लग्न लावले. कृष्णाच्या पूर्वीच्या आठ स्त्रिया व आता नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त केलेल्या १६,१०० स्त्रिया, एकूण मिळून भगवान श्रीकृष्णाच्या आता १६,१०८ स्त्रिया सुखाने नांदत होत्या.
या कथेत योगसाधकाचा एक दिव्य अनुभव मोठ्या सुंदर पद्धतीने भगवान वेदव्यासांनी लिहून ठेवला आहे, असे अनुभवी साधकाला कळून येईल. अनंत जन्मांच्या कुसंस्कारांमुळे आपल्या शरीरातील योगनाड्या बद्ध म्हणजे अध्यात्मात प्रगती न करणार्‍या बनत असतात. ‘रक’म्हणजे पुढे सरकणे व नरक म्हणजे पुढे न सरकणे, दुर्गतीला पोहोचणे. असल्या अप्रागतिक साधना नाड्यात स्वस्थ बसणारा जीवात्मा म्हणजे नरकासुर होय. असल्या अप्रागतिक अवस्थेत असणे खर्‍या साधकाला शोभत नाही. तो योगसाधना, आसने, प्राणायाम, ध्यानधारणा करून आपली नाडीशुद्धी करतो व प्रत्येक नाडीत दडलेला आपल्यातील नरकासुर मारून त्या नाड्यांशी आपल्याच उच्च अशा कर्षणयुक्त अवस्थेचे म्हणजे कृष्णाचे लग्न लावतो.
त्या नाड्या भगवान कृष्णाशी संलग्न झाल्या की, त्यात आपोआप विश्वातील सुयोग्य शक्तीचा संचार होऊन साधक प्रगतिशील म्हणजेच आर्य बनतो. हे कार्य श्रेष्ठ साधक नित्याच्या योगसाधना कालानुसार मध्यरात्री करतो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री का झाला, याचे योगरहस्य आपण पाहिलेच आहे. तद्वत मध्यरात्रीस योगसाधना म्हणजे ध्यान, धारणा, समाधी लावून श्रेष्ठ साधक श्रीकृष्ण आपल्या शरीरस्थ नाड्यातील घाण असुर-नरकासुर यांचा वध करून त्या नाड्याशी स्वत: लग्न लावतो. आता आपल्या शरीरात १६,१०० च नाड्या का? याबद्दलची व्यासांची कल्पना आपण पाहू. प्रश्नोपनिषदातील सहाव्या प्रश्नांतील दुसर्‍या मंत्रात याचा स्पष्ट निर्देश आला आहे. साधनापूर्ती करण्याकरिता साधकाला स्वत:मध्ये षोडशकला पुरुष उत्पन्न करावा लागतो.
‘तस्मै स होवाच। इहैवान्तः शरीरे सोम्य स पुरुषो यस्मिन्नेता: षोडशकला: प्रभवन्तीति॥२॥’ कला १६ मानल्या आहेत, असे यावरून दिसते. कला म्हणजे प्रत्यक्ष कला नसून अवस्था आहेत. पंच कर्मेंद्रियांच्या सर्व कला, पंचज्ञानेंद्रियांच्या सर्व कला, पंच तन्मात्रांच्या सर्व कला मिळून पंधरा कला होतात. या सर्व कला प्राप्त करणारे मन धरल्यास ठीक ’षोडशकला प्रभवन्तीती’ अशी साधकाची श्रेष्ठ अवस्था येते. भगवंत गीतेत सांगतातच, ‘मन एवं मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः।’प्रत्येक अवस्थेला सहस्रपटीने वर्धित केल्यास साधकातील गुण षोडशसहस्र होतात.
सहस्र याचा अर्थ केवळ हजार संख्याच नसून उत्तमोत्तम अवस्था असाही आहे. शंभराला जशी एक पस्तुरी घालून जसे १०१ रुपयांचे दान देतात तद्वत १६ हजारांवर शंभर पस्तुरी घालून १६,१०० उच्चावस्था झाल्या. तत्पूर्वी कृष्णाला आठ बायका (अष्टांग योग) असल्यामुळे आता श्रीकृष्ण १६,१०८ बायकांचा दिव्य दादला बनला असला, तरी दिव्य दादला बनण्याकरिता त्याला त्याच्यातील नरकासुर मध्यरात्रीच योगसाधना करून मारावा लागतो. या महान योगसाधनेचे स्मरण आपल्या जीवनात सतत असावे म्हणून आपल्या वैदिक ऋषिमुनींनी दिवाळीचे मंगल पर्वात पहिल्याच दिवशी मध्यरात्री शरीरशुद्धी म्हणजे १६,१०८ नाड्यांतील (नारींतील) नरकासुराचा वध करून अभ्यंग स्नान करण्यास सांगितले आहे. परंतु, दुर्दैवाने या कथेतील योगरहस्य न समजल्यामुळे आम्ही आमच्या शरीरातील बाह्य घाण वा नरकासुर काढण्याकरिता उटणे, साबण लावून अभ्यंगस्नान करीत असतो. खरे अभ्यंगस्नान योगसाधना करून अंतर्बाह्य शरीरशुद्धीचे आहे, तरच आपल्यातील नरकासुर मारला जाईल, अन्यथा नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
 
 
लेखक: योगीराज हरकरे
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.