पूर्ण योगे अनुष्ठान, लाभे सुख महान!

    दिनांक  23-Jun-2022 12:58:07
|
 
 
gautama buddha
 
 
 
 
योग हा सर्वांसाठी खुला आहे. इथे कोणत्याही प्रकारची संकीर्णता किंवा भेदभाव अजिबात नाही, जो अगदी अंतःकरणपूर्वक श्रद्धेने अष्टांग योगाचे अनुष्ठान करेल, त्याला सर्व सुखाचा लाभ होईल. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाला योगाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर आदर्श समाज उदयास येईल. परिणामी, सर्वांच्या भावना शुद्ध व पवित्र होऊन जगातील सर्व नागरिकांमध्ये बंधुत्वाचे नाते निर्माण होईल.
 
 
आजकाल माणसाकडे सर्वकाही असून सुद्धा तो दुःखाचे व नैराश्याचे जीवन जगत आहे. समाजात वावरणारे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचे सर्व घटक शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकल व त्रस्त दिसत आहेत. कुठे कौटुंबिक कलह, तर कुठे नातेसंबंधातील दुरावा... अशा या साधारण बाबींमुळे मानवी जीवनातील सुख व आनंदाची पर्वणीच हरपत चालली आहे. छोट्याशा कारणांमुळे नैराश्य वाढीला लागते व माणूस नको त्या अनर्थकारी मार्गांचा अवलंब करण्यास प्रवृत्त होतो. किती मोठे आश्चर्य पाहा... बुद्धीचे अपार वैभव लाभलेला हा मानव सुखाची सर्व साधने उपलब्ध असूनही दुःखाचे जीणे जगतोय.
 
 
 
दिवसेंदिवस वाढत चालल्या हिंसक घटना, आत्महत्या, अनैतिकता किंवा असहिष्णूता या सर्व कारणांमुळे वैयक्तिक व सामाजिक जीवन जगणे असह्य झाले आहे. या सर्वांच्या पाठीमागे कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे मनात उठणारे अनिष्ट व नकारात्मक विचारांचे वादळ! त्याचबरोबर आणखी एक कारण म्हणजे मानसिक दुर्बलता व आंतरिक आत्मशक्तीचा शक्तीचे विस्मरण. या सर्वांवर अतिशय प्रभावशाली कोणता उपाय असेल तर तो म्हणजे योग होय. महर्षी पतंजली यांनी रचलेला ‘योगदर्शन’ हा ग्रंथ म्हणजे भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा.
 
 
चार पादात म्हणजेच अध्यायात विभागलेला हा ग्रंथ व त्यावर महर्षी व्यासांनी केलेले भाष्य खरोखरच अतिशय दिशादर्शक ठरणारे आहे. यातील मार्गदर्शक ठरणार्‍या तत्त्वांचा अवलंब करणे, हे सांप्रत युगी गरजेचे ठरते. खरेतर समस्या या सर्वात अगोदर माणसाच्या मनात उद्भवतात. नंतर त्यांचे परिणाम शरीरावर होऊ लागतात. मग शेवटी माणूस विविध रोगांना बळी पडतो. खरेतर या सर्वांची चिकित्सा बाह्य औषधोपचारांपेक्षा आतील मानसिक व आत्मिक बळ वाढविल्याने होऊ शकते. यासाठीच प्राचीन भारतीय योगविद्या मोलाची समजली जाते. योगशास्त्रात प्रतिपादित केलेल्या तत्त्वांचे निष्ठेने पालन व अनुष्ठान केल्यास सर्व जगातील समस्या सुटण्यास मदत होईल.
 
 
आजचे सर्व जग मनोविकारांनी ग्रासलेले आहे. त्यामुळेच व्यक्तीपासून ते विश्वापर्यंत सर्वत्र दुःख व अशांतता वाढीस लागल्याचे भयावह चित्र पाहावयास मिळते. मन किंवा चित्तामध्ये बिघाड आल्यानेच काम, क्रोध, लोभ, मोह, भय, ईर्ष्या- द्वेष आदी दोष निर्माण होतात. यांचे परिणाम इतके भयावह की माणसाचा राक्षस होण्यास वेळ लागत नाही. कारण, मन हेच सुख-दुःखाचे कारण आहे. यासाठीच तर शास्त्रात म्हटले आहे-
 
 
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:।
 
 
सारे काही घडते, ते मन व इंद्रियांच्या दोषांमुळे. चित्तामध्ये उद्भवणार्‍या क्लिष्ट वृत्तींमुळे माणसांमध्ये नानाविध अनिष्ट प्रवृत्ती निर्माण होतात. याच दुष्प्रवृत्ती पुढे व्यक्तींबरोबरच कौटुंबिक व सामाजिक समस्यांकरिता कारणीभूत ठरतात. याकरिता महर्षी पतंजलींनी योगशास्त्राच्या प्रारंभीच म्हटले आहे- योग: चित्तवृत्तिनिरोध:! म्हणजेच आपल्या मन किंवा चित्ताच्या विविध वृत्तींना रोखणे, यालाच तर ‘योग’ म्हणतात. आपले मन अतिशय चंचल आहे.
 
 
कवयित्री बहिणाबाई याच मनाविषयी म्हणतात-
 
 
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर।
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर॥
 
 
 
हे मन इतके बहिर्मुखी होते की, ते क्षणार्धात एका ठिकाणाहून दुसर्‍या दूर ठिकाणी पोहोचते. मनाच्या नानाविध वृत्तींत विचारांचा प्रवाह नेहमीच सुरू असतो. विशेष करून तो पाप व पुण्य अशा दोन्ही स्वरूपाचा असतो. जणू काही नद्यांचे हे दोन प्रवाहच! यात पापमार्गी प्रवाहाला सोडून पुण्यमार्गाशी जोडणे महत्त्वाचे ठरते. मनात निर्माण होणारे नानाविध दुर्विचार, रोग, शोक, क्रोध इत्यादी सर्व विकार नाहीसे करून त्याऐवजी उत्साह, दया, करुणा, प्रेम हे सद्गुण निर्माण करणे म्हणजेच योग होय.
 
 
जगातील प्रत्येक माणूस सुखी होऊ इच्छितो. दुःख मात्र कोणालाच आवडत नाही. यासाठीच योगशास्त्रात प्रतिपादित केलेला अष्टांगयोगाचा मार्ग. योगाच्या आठ अंगांचे श्रद्धेने अनुष्ठान केल्यास सर्वांनाच शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होते. याचा लाभ केवळ एका व्यक्तीपुरताच मर्यादित राहत नाही, तर त्याला सामूहिक रूप आल्याने सार्‍या विश्वात सुखाचे व शांततेचे वारे वाहू लागते.
 
 
योगाचे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ अंगं आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत, तर शौच, संतोष, स्वाध्याय, तप व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम आहेत. दहाही यम-नियमांचे निष्ठापूर्वक पालन केल्यास माणसाची जीवन यशस्वी होण्यास मदत मिळते. सामाजिक जीवनात त्यांची प्रतिष्ठा वाढीस लागते. आसन हे योगाचे तिसरे अंग. सर्वांगासन, हलासन, पवनमुक्तासन, मयूरासन, पद्मासन, शशकासन, मण्डुकासन, कूर्मासन, वक्रासन, वज्रासन, पश्चिमोत्तानासन अशी विविध आसने केल्यास साधकाचे शरीर स्वस्थ, निरोगी व पुष्ट बनते.
 
 
प्राणायाम हे चौथे अंग. सुव्यवस्थितरित्या प्राणायाम केल्यास शारीरिक विकासासोबतच मानसिक बळ वाढीला लागते. प्राणायाम म्हणजे श्वास व प्रवासाच्या गतीला आपल्या शक्तीनुसार नियंत्रित करणे होय. प्राणायामाचे बाह्य, आभ्यंतर, स्तंभवृत्ती व बाह्यांभ्यंतरविषयाक्षेपी असे चार प्रकार पडतात. साधकांनी सिद्धासन किंवा पद्मासनामध्ये बसून श्वासाला एकदाच सर्वशक्तीनुसार बाहेर फेकणे आणि बाहेरच रोखणे, याला बाह्यवृत्ती प्राणायाम म्हणतात. यामुळे मनाची चंचलता दूर होते व शरीर व मन शुद्ध बनते, तर आपल्या शक्तीनुसार श्वासांना आतच ओढून आत रोखणे, याला आभ्यंतर प्राणायाम म्हणतात.
 
 
श्वासांना जिथल्या तिथे रोखणे म्हणजे स्तंभवृत्ती प्राणायाम होय. जेव्हा श्वास हे आतून बाहेर जात असताना मध्येच थोडेथोडे रोखणे आणि बाहेरून आत येत असताना त्यांनादेखील मध्येच थांबविणे, याला बाह्यांभ्यंतरविषयाक्षेपी प्राणायाम असे म्हणतात. याच प्राणायामाचे भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम- विलोम, भ्रामरी असेही प्रकार आहेत. या प्राणायामाचे अनुष्ठान केल्याने मनातील सारे विकार नाहीसे होण्यास मदत मिळते. ज्याप्रमाणे लोहाराच्या भात्यातून बाहेर पडणार्‍या हवेमुळे लोखंड किंवा इतर धातूतील अशुद्धता (मलिनता) दूर होऊन ते स्वच्छ व सुंदर बनते.
 
 
त्याचप्रमाणे प्राणायामामुळे मनातील सर्व विकार, आवेग व विकृती नाहीशी होण्यास मदत मिळते. मनामध्ये एक प्रकारची उत्साहशक्ती जागृत होते. आत्मविश्वास वाढीला लागतो. चिंता, भय, शोक व नैराश्याचे वादळ शमते. प्राणायाम करताना संकल्पदेखील पवित्र व शुद्ध असणे आवश्यक असते. पुढील प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही अंगेदेखील तितकीच महत्त्वाची व पालन करण्यास योग्य आहेत. यामुळे साधक आध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण होत समाधी अवस्थेकडे वळतो.
 
 
विशेष म्हणजे, योग हा सर्वांसाठी खुला आहे. इथे कोणत्याही प्रकारची संकीर्णता किंवा भेदभाव अजिबात नाही, जो अगदी अंतःकरणपूर्वक श्रद्धेने अष्टांग योगाचे अनुष्ठान करेल, त्याला सर्व सुखाचा लाभ होईल. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनाला योगाशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर आदर्श समाज उदयास येईल. परिणामी, सर्वांच्या भावना शुद्ध व पवित्र होऊन जगातील सर्व नागरिकांमध्ये बंधुत्वाचे नाते निर्माण होईल. योग ही आचरणाची प्रक्रिया आहे. केवळ योगासने आणि प्राणायाम या दोनच अंगाचे अनुष्ठान करणे, म्हणजे संपूर्ण योग नव्हे. यासाठी योगाच्या आठही अंगांचे पालन करणे म्हणजे संपूर्ण योग होय. मानवाने नेहमी या आठ बाबींशी आपले संधान बांधले पाहिजेत. त्यामुळे त्याच्या मनात नवचैतन्याचा व उत्साहाचा प्रवाह ओसंडू लागतो. कारण, योग ही यशस्वी जीवनाची खरी गुरुकिल्ली व अमृतवल्ली आहे. आपण सर्व या संपूर्ण योगमार्गाचा वसा घेऊया आणि जीवन आनंदी बनवू!
 
 
 
 
 
  लेखक: प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.