ठाण्यात मतदारांच्या संख्येत वाढ

ठाणे मनपा निवडणुकीसाठी मतदार याद्यांची लगबग सुरू

    23-Jun-2022
Total Views |

000
 
  
 
 
 
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत झाल्यानंतर आता निवडणुकीचा आणखी एक टप्पा पुढे सरकला आहे. त्यानुसार येत्या २३ जून रोजी महापालिकेच्या माध्यमातून निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर दि. १ जुलैपर्यंत हरकती सूचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार यंदा १३ लाख, ५६ हजार मतदार असतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील निवडणुकीच्या वेळेस ही संख्या १२ लाख, २८ हजार, ६०६ एवढी होती. त्यात यंदा सव्वा लाख मतदारांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
 
 
 
ठाणे महापालिका निवडणुकीची धामधुम आता खर्‍या अर्थाने सुरू झाल्याचे दिसत आहे. प्रभाग आरक्षण सोडत पार पडल्यानंतर आता ओबीसींचा निर्णय प्रलंबित आहे. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अंतिम करण्याच्या सूचना ज्या ज्याठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणच्या महापालिकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेने देखील त्यानुसार तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता ठाण्यात खलबते सुरू झाली आहेत.
 
 
 
अशातच आता मतदार प्रक्रियेचा कार्यक्रमही सुरू झाला आहे. ठाणे महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार केला, तर त्यावेळेस १२ लाख, २८ हजार, ६०६ एवढे मतदार होते. त्यात ६ लाख, ६७ हजार, ५०४ पुरुष तर ५ लाख, ६१ हजार, ८७ स्त्री मतदारांची संख्या होती, तर इतर १५ ही संख्या होती. यंदाच्या निवडणुकीत मे २०२२ पर्यंतची मतदारांची संख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यानुसार मे अखेरपर्यंत सुमारे १३ लाख, ५६ हजार मतदारांची नोंद झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
 
 
 
परंतु, यात पुरुष किती आणि स्त्री मतदारांची संख्या समजू शकलेली नाही. दरम्यान, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा १ लाख, २७ हजार, ३९४ मतदार वाढले आहेत. त्यामुळे या वाढीव मतदारांचा फायदा कोणाला होणार हे पाहणे आता अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आता दि. २३ जून रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दि. १ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतरच, सुनावणी होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
 
 
 
हरकती, सूचना मांडण्याचे आवाहन
 
ठाणे पालिकेच्या प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि निवडणूक विभाग (मुख्यालय) आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे २३ जूनपासून नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. या यादीमध्ये लेखनिकांच्या काही चुका असल्यास, दुसर्‍या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झाल्यास ते वगळणे, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत नाव असूनही, पालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळले असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आदीबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. साहा. पदनिर्देशित अधिकारी तथा संबंधित साहा. आयुक्तांच्या कार्यालयात लेखी, हार्ड कॉपी स्वरुपातच हरकती दाखल कराव्यात. त्या व्यतिरिक्त अन्यत्र दाखल केलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. तसेच, ई-मेलद्वारे व ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या हरकती व सूचनाही विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.