पहिल्याच पावसात घरात नाल्याचे पाणी

22 Jun 2022 13:56:42

chembur
 
 
 
 
 
मुंबई : पावसाळ्यापूर्वी ८० टक्के नालेसफाई झाली असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला होता. मात्र, चेंबूरच्या प्रभाग क्र. १४८, भारतनगरमधील भीमटेकडी परिसरात पहिल्याच पावसात घरांमध्ये पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. टेकडीवर ना कचरा उचलला जातो, ना नालेसफाई केली जाते, अशी व्यथा येथील स्थानिक महिलांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.
 
 
 
कचरागाडीकचरा अर्धवटच घेऊन जाते
 
टेकडीच्या पायथ्याशी स्वछतागृहासमोरच एक कचराकुंडी असून, तिथे सकाळी एकदाच कचरागाडी येते. परंतु, ही कचरागाडी नावालाच येथे येते. येथील जमा झालेला कचरा पूर्ण उचलून घेऊन जात नाही. ’सकाळी कचरागाडी येऊन गेली, पण अर्धा कचरा तसाच ठेवून गेली आहे’, असे या भागातील स्थानिक किशोर पांडे यांनी सांगितले, तर पालिकेच्या स्वच्छतागृहातील सर्व मैला रस्त्यावर वाहून येतो. स्थानिक प्रशासन या समस्येकडे लक्ष देत नाहीत, असेही स्थानिकांनी सांगितले.
 
 
 
मागील पाच वर्षे नालेसफाई नाही
 
पहिल्याच पावसात आमच्या घरांमध्ये पाणी शिरले. नालेसफाई करायला मुंबई महापालिकेचे कर्मचारी येतात. मात्र, वरवरची सफाई करून निघून जातात. बर्‍याच वर्षांपूर्वी हा नाला बनविण्यात आला होता. पण, मागील पाच वर्षांपासून येथे नालेसफाई केली जात नाही. आम्हाला हा नाला बांधून पाहिजे आहे. मागील ३५ वर्षांपासून आम्ही इथे राहतो. दरवर्षी आम्हाला हा त्रास आहे. मतदानाला फक्त आमच्या दारात लोकप्रतिनिधी येतात. आमचे भांडे वाहून जातात, घरात सर्वत्र घाण पाणी येते. परंतु, कोणीही आमची ही परिस्थिती पाहायला येत नसल्याची व्यथा इथल्या महिलांनी संवाद साधताना मांडली.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0