शिवसेनेसमोर मुंबई महापालिका राखण्याचे आव्हान !

    दिनांक  22-Jun-2022 22:18:55
|
 
मुंबई : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगळाच सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे जर शिवसेनेला नाईलाजास्तव काही अप्रिय निर्णय घ्यावा लागला त्याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे. २०१७ पासून सातत्याने महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या भाजपचे मनोधैर्य शिवसेनेतील अंतर्गत संघर्षामुळे वाढण्याची शक्यता असून निवडणुकीत भाजप आणखी त्वेषाने उतरला तर त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता गाजविणाऱ्या सेनेसमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.


यशवंत जाधव शिंदेंच्या गळाला
कोट्यवधींच्या आर्थिक अफ़रातफरीमुळे चौकशीच्या गोत्यात आलेले मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव हे देखील एकनाथ शिंदे गटामध्ये सामील  झाले आहेत.  जाधव यांच्या पत्नी आणि भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असून त्या शिंदे गटासोबत गुवाहाटी येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यशवंत जाधव यांच्यावर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या छापेमारीमुळे आणि त्यानंतर उघडकीस आलेल्या व्यवहारांमुळे पालिकेतील सत्ताधारी आणि कंत्राटदारांमधील 'अर्थपूर्ण' संबंध आपसूकच समोर आले होते. तसेच यशवंत जाधव यांच्या डायरीत 'केबलमॅन'ला दिलेल्या कोट्यवधी रुपयांविषयी आणि 'मातोश्री' दिलेल्या ५० लाखांच्या घड्याळाच्या उल्लेखामुळे या आर्थिक गैरव्यवहाराचे संबंध थेट पक्षातील मोठ्या नेत्यांशी जोडले जात होते.


शिवसेनेचा चेहरा आहे कुठे ?
मुंबई महापालिकेत विरोधकांची भूमिका पार पडणाऱ्या भाजपच्या आक्रमक हल्ल्यांना एकमुखी प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडे नेमका कुठला चेहरा आहे, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यशवंत जाधव हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुरफटलेले आहेत तर माजी महापौर किशोरी पेडणेकर वगळता इतर कुठला नेता भाजपशी भिडायला तयार नाही. त्यामुळे मुंबईत अधिकाधिक प्रभावशाली होत चाललेल्या भाजपाला रोखण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडे नेमका चेहरा आहे कुठे ? याचे उत्तर शिवसेनेला शोधावे लागणार आहे.


फटका बसणार नाही
'राजकीय पक्षाच्या वाटचालीत अशा प्रकारचे चढ उतार येत असतात. पक्षाच्या विरोधात गेलेल्या काही लोकांमुळे पक्षाला फारसा फरक पडत नाही. आम्ही पक्ष म्हणून मुंबईकरांशी बांधले गेलेले आहोत. अशा प्रकारच्या बंडामुळे पक्षात अस्वस्थता नक्की निर्माण होईल पण त्याचा  निवडणुकीत परिणाम जाणवणार नाही,' अशी भावना शिवसेनेच्या काही महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.