प्रश्न हिंदुत्वाचाच!

    22-Jun-2022
Total Views |
 
 
 
agralekh 
 
 
 
आपण ज्या पक्षात इतकी वर्षे होतो, ज्या पक्षाने हिंदुत्व स्वीकारले होते, तो पक्ष सत्तेसाठी आपली विचारधारा कशी सोडू शकतो, हा प्रश्न एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याला पडणे साहजिकच. त्यातूनच आता शिवसेनेत हिंदुत्वाच्या नावावर जे काही सुरू आहे, उद्धव ठाकरे त्याविषयी जे काही बोलतात, तो फक्त तोंडदेखलेपणा, त्यात सत्याचा लवलेशही नाही, याची खात्री एकनाथ शिंदेंना झाली आणि खर्‍याखुर्‍या हिंदुत्ववादी शिवसैनिकाने हिंदू व हिंदुत्वासाठी खोटारड्या हिंदुत्ववाद्यांविरोधात बंड केले.

 
 
 
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे ट्विट करत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडामागची भूमिका स्पष्ट केली. त्याला कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारलेल्या हिंदुत्वाला उद्ध्वस्त करण्यासाठी कारवाया करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसबरोबर मुख्यमंत्रिपदासाठी घरोबा केला.
 
 
 
 
बहुसंख्य हिंदूंचा व हिंदू बहुसंख्य असलेल्या भारताचा वास्तववादी इतिहास, सांस्कृतिक वारसा-ओळख वेगवेगळ्या प्रकारे मिटवण्यासाठी काँग्रेसने सातत्याने उद्योग केले. काँग्रेसहाती देशाची सत्ता असताना पुरोगामित्व आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंची सर्दैव मुस्कटदाबी केली गेली. हिंदूंवरील अन्यायाला न्याय ठरवत हिंदूंना खराखुरा न्याय काँग्रेसने कधीही दिला नाही. काश्मिरी हिंदूंचा मुद्दा असो वा अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराम मंदिराचा मुद्दा असो, काँग्रेसने नेहमीच हिंदूद्रोही कामे केली.
 
 
 
 
मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळत योजना, उपक्रम, निधीची खैरात करायची, मुस्लिमांच्या धार्मिक भावना संविधानविरोधी असल्या तरी त्या जोपासायच्या, मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतपेटीसाठी दहशतवाद्यांसाठीही टाहो फोडायचा पण, हिंदूंनाच दहशतवादी ठरवायचे, असा प्रकार काँग्रेसने केला. आजही काँग्रेसने आपला हिंदूविरोधी व मुस्लीमप्रेमी कारभार बदललेला नाही. शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसही काँग्रेसमधूनच फुटून निघालेला पक्ष. औरंगजेबाला सुफी संत म्हणण्यापर्यंत मजल मारणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसने जे हिंदूविरोधी राजकारण केले, त्याचाच कित्ता गिरवला.
 
 
 
 
त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससमोर लाचार होत सत्तेसाठी माना तुकवणे, बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या शिवसैनिकाला कधीही मान्य होणारे नव्हते. पण, उद्धव ठाकरेंनी ते केले, त्यावेळी हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारला, तर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमुळे आम्ही पुरोगामी-धर्मनिरपेक्ष होऊ असे विचारण्यापेक्षा आमच्यामुळे ते पक्ष हिंदुत्ववादी होणार नाहीत का, अशा आशयाचे उत्तर संजय राऊतांनी दिले होते. पण, तसे काही झाले नाही, तर शिवसेनाच हिंदूंना अन् हिंदुत्वाला विसरली.
 
 
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या भाषणांतून, संजय राऊत आपल्या सकाळ, दुपार, संध्याकाळच्या बडबडीतून वा ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘आम्हीच खरे हिंदुत्ववादी’ असे म्हणत होते. पण, त्यात काहीही अर्थ नव्हता, त्यांचा हिंदुत्ववादी जमिनीवर हिंदूंच्या उपयोगी येत नव्हता. पालघरमधील साधूंच्या हत्याकांडापासून सुरू झालेला उद्धव ठाकरेंचा हिंदूविरोध पुढेही सुरूच राहिला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसपेक्षाही जरा जास्तच मुस्लिमांचे लांगूलचालन मात्र उद्धव ठाकरेंनी केले.
 
 
 
 
पक्षप्रमुखच हिंदूंना बाजूला सारुन मुस्लिमांना जवळ करतोय म्हटल्यावर शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी, पदाधिकार्‍यांनीही त्याचेच अनुकरण केले. पांडुरंग सकपाळ यांच्याकडून अजान स्पर्धेचे आयोजन, राहुल शेवाळेंकडून उड्डाणपुलाला ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्तीचे नाव देण्याचा प्रस्ताव, नांदेड, सोलापूर, मालेगाव, मुंबई, नागपूर, रत्नागिरी आदी ठिकाणी उर्दू भवन उभारण्याचे उदय सामंत यांचे निर्देश, प्रभादेवी मंदिरासमोर ख्रिश्चन स्मृतिस्तंभ उभारण्याचा शिवसेनेच्या मुंबईतील महिला नेत्याचा उद्योग, या सगळ्यातून शिवसेना हिंदुत्वाला धुडकावून मुस्लीम तुष्टीकरणाच्या मार्गावर सुसाट चालल्याचे दिसत होते.
 
 
 
 
त्याचवेळी ‘रझा अकादमी’सारख्या इस्लामी कट्टरपंथी संघटनेने दिलेल्या धमकीसमोर झुकत उद्धव ठाकरेंच्या सरकारने ईद-ए-मिलादच्या मिरवणुकांना कोरोना काळात परवानगी दिली, ‘रझा अकादमी’ने महाराष्ट्रात दंगल पेटवली तरी त्या संघटनेवर बंदी घालण्याचे धाडस उद्धव ठाकरेंचे सरकार दाखवू शकले नाही, ‘एमआयएम’च्या रॅलीला कोरोना असूनही उद्धव ठाकरेंचे सरकार अडून शकले नाही. उद्धव ठाकरे अशाप्रकारे हिंदूंना लाथाडत असताना मुस्लिमांना पंखाखाली घेत असल्याचे चित्र निर्माण झाले. सर्वसामान्य शिवसैनिकांना तर त्याची तेव्हाही चीडच येत होती व ती ते समाजमाध्यमांतून व्यक्तही करायचे. एकनाथ शिंदेही शिवसैनिक आहेत, तेही धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंचे, त्यांना हिंदू, हिंदुत्वाला डावलण्याचा प्रकार रुचणे अजिबात शक्य नव्हते. त्यांचे बंड त्याचाच दाखला.
 
 
 
 
अर्थात, उद्धव ठाकरे व शिवसेनेकडून तोंडदेखला हिंदुत्वाचा उल्लेख व्हायचा, ‘आमचेच हिंदुत्व खरे’ म्हटले जायचे, पण ते तेवढ्यापुरतेच. हिंदूंशी संबंधित अन्य विषयांप्रमाणेच औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावर उद्धव ठाकरेंनी हास्यास्पद भूमिका घेतली, ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकून गेला, तर त्या कबरीला धोका पोहोचू नये म्हणून त्या कबरीलाच सुरक्षा देण्याचा धर्मांध इस्लामप्रेमी निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, तरी शिवसेनेला त्यात काही वावगे वाटत नसे, असे वागणारी शिवसेना खरी हिंदुत्ववादी कशी असू शकेल?
 
 
 
 
त्याच प्रश्नांच्या माध्यमातून मनात निर्माण झालेली खदखद आज एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली, तीही उद्धव ठाकरेंच्या सरकारला पार खिळखिळे करणारी. कारण, प्रश्न खर्‍या-खोट्या हिंदुत्वाचा होता व आहे. भाजपने नेहमीच हिंदूहिताचा, हिंदुत्वाचा पुरस्कार केला. अयोध्येतील श्रीराम मंदिर असो वा काशीतील पुनर्विकसित विश्वनाथ मंदिर असो वा काश्मिरी हिंदूंचा विषय असो, यासंबंधीच निर्णय होत असताना तथाकथित हिंदुत्ववादी शिवसेना त्यावर टीका करण्यातच वेळ दवडत होती.
 
 
 
 
त्यातून साहजिकच आपण ज्या पक्षात इतकी वर्षे होतो, ज्या पक्षाने हिंदुत्व स्वीकारले होते, तो पक्ष सत्तेसाठी आपली विचारधारा कशी सोडू शकतो, हा प्रश्न एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याला पडणे साहजिकच. त्यातूनच आता शिवसेनेत हिंदुत्वाच्या नावावर जे काही सुरू आहे, उद्धव ठाकरे त्याविषयी जे काही बोलतात, तो फक्त तोंडदेखलेपणा, त्यात सत्याचा लवलेशही नाही, याची खात्री एकनाथ शिंदेंना झाली आणि आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरेंच्या खर्‍याखुर्‍या हिंदुत्ववादी शिवसैनिकाने हिंदू व हिंदुत्वासाठी खोटारड्या हिंदुत्ववाद्यांविरोधात बंड केले. भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सत्ता स्थापन करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची साथ सोडा, अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली. आता त्यावर पुढे काय घडामोडी घडतील, हेे येत्या काही काळात स्पष्ट होईलच, पण, त्यांच्या निर्णयामागे मुद्दा हिंदुत्वाचाच आहे, हे नक्की!
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.