कोण आहेत 'एनडीए'च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू?

    22-Jun-2022
Total Views |
 
dm
 
 

द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड पक्की आहे आणि पहिली आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपतीपदाचे नेतृत्व करणार ही प्रत्येकाला अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे.

देशात सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी सत्ताधारी विरोधक गणितं जुळवतायतं. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होतोय. १५ व्या राष्ट्रपती म्हणून श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. खरंतर हे नाव अनेकांना परिचित नाही पण या नावाची घोषणा झाल्यावर अनेकांना गुगल गुरुची मदत घ्यावी लागली. विद्यमान केंद्र सरकारचे हेच वेगळेपण आहे ज्याबद्दल कायमच आश्चर्य वाटत आले आहे. पद्म पुरस्कार असो वा इतर घोषणा असो. सर्वसामान्य माणूस विचारही करू शकणार नाही इतके वेगवेगळ्या गोष्टी मोदी सरकार करत असते.

  
मध्यंतरी सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळ्या नावांना पसंती दर्शवली पण केंद्र सरकारने ओरिसातील एक वनवासी महिला, ज्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे अशा नावाची निवड केली आणि ते नाव आहे श्रीमती द्रौपदी मुर्मू. ओरिसा राज्यातील मयूरभंग जिल्ह्यामधील उपरबेडा येथे २० जून १९५८ साली अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबात द्रौपदी मुर्मू यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण उपरबेडा या त्यांच्या गावीच झाले पुढे महाविद्यालयीन शिक्षण रमादेवी वुमन कॉलेज येथे झाले त्यांनतर १९७९ ते १९८३ पर्यंत ओरिसा सरकारमधील ऊर्जा मंत्रालयात कनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले.


१९९४ ते १९९७ पर्यंत त्यांनी रायरंगपूर येथे शिक्षिका म्हणून कार्य केले. राजकारणात येण्यापूर्वीपासून आदिवासीं क्षेत्रांत त्यांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले होते. १९९७ साली त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा आलेख सतत वर्धिष्णू असाच आहे. पक्षाने त्यांना दिलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सर्वप्रथम १९९७ साली भारतीय जनता पक्षाने त्यांना ओरिसा आदिवासी मोर्चाचे उपाध्यक्ष केले.
  
ओरिसा मधील नवीन पटनायक सरकारच्या कार्यकाळात २००० ते २००४ पर्यंत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आणि लोकाभिमुख म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख समाजात निर्माण केली आणि त्यानंतर पुढील दोन वर्षामध्ये त्यांनी ओरिसाच्या राजकारणामध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. २००७ साली ओरिसामधील सर्वोत्तम आमदार म्हणून ओरिसा विधानसभेतर्फे त्यांना प्रतिष्ठित अशा नीलकांता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हे सगळं त्यांना सहजपणे मिळाले नाही. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाशी त्यांनी कणखर लढा दिला आहे. आपले यजमान आणि दोन मुलांना गमावून देखील त्यांनी हार मानली नाही, सारे दु:ख विसरून त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि स्वत:ला सिद्ध केले.
 
 
पुढे २०१४ मध्ये केंद्रात सरकार बदल झाल्यावर भाजप सरकारने २०१५ साली झारखंड राज्याच्या पहिला महिला राज्यपाल म्हणून त्यांची निवड केली आणि २०२१ साली त्यांनी आपला राज्यपाल पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. २५ वर्ष सक्रीय राजकारण करणाऱ्या द्रौपदी मुर्मु यांनी आदिवासी समाजासाठी कायम सर्वोपरी प्रयत्न केले आहे. त्यांच्या कौतुकास्पद आणि कार्यक्षम कारकीर्दीमुळेच राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर त्यांच्याबद्दल म्हणाले, "द्रौपदी मुर्मू जी यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी आणि गरीब, दलित तसेच उपेक्षितांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित केले आहे. त्यांना समृद्ध असा प्रशासकीय अनुभव आहे आणि उत्कृष्ट असा राज्यपालपदाचा कार्यकाळ होता. मला विश्वास आहे की त्या आपल्या राष्ट्राच्या महान राष्ट्रपती होईल.
 
 
"लाखो लोकांना, विशेषत: ज्यांनी गरिबीचा अनुभव घेतला आहे आणि अडचणींचा सामना केला आहे, त्यांना श्रीमती यांच्या जीवनातून मोठी शक्ती मिळते. द्रौपदी मुर्मू जी यांना धोरणात्मक बाबींचा त्यांची समज आणि दयाळू स्वभाव यामुळे आपल्या देशाला खूप फायदा होईल,” याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. यातून आपण त्यांच्या कार्याची उंची अनुभवू शकतो.
 
 
द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड पक्की आहे आणि पहिली आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपतीपदाचे नेतृत्व करणार ही प्रत्येकाला अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. त्यांच्या भावी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा आहे.
 
 
 
: सर्वेश फडणवीस
8668541181
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.