‘जेईई’, ‘एनईईटी’च्या विद्यार्थ्यांना भाजपतर्फे मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’

22 Jun 2022 13:10:00

ND
 
 
 
 
 
ठाणे : ‘जेईई’, ‘एनईईटी’ आणि ‘सीईटी’ उत्तीर्ण होण्यासाठी कोकणातील विद्यार्थ्यांना हजारो रुपयांऐवजी मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’ उपलब्ध होणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे तब्बल दहा हजारांहून अधिक प्रश्नांची सविस्तर उत्तरेही विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.
 
 
 
ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात आ. निरंजन डावखरे यांच्याहस्ते मंगळवारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान, सतीश शेठ, भाजपचे उपाध्यक्ष सुजय पतकी, सचिन बी. मोरे, प्राचार्य डॉ. भूषण लांगी, उपप्राचार्य सीताराम वाघोळे, सरित अगरवाल, टेकनेट प्रोफेशनलचे महेश सावंत आदींची उपस्थिती होती.
 
 
 
बारावीनंतर ‘सीईटी’, ‘जेईई’, ‘एनईईटी’चा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना लाखो रुपये खर्चून खासगी क्लासला प्रवेश घ्यावा लागतो, तर अनेक वेळा हजारो रुपये खर्चून परीक्षेची तयारी करण्यासाठी ‘मॉक टेस्ट सिरीज’ घ्यावी लागते. मात्र, ग्रामीण भागाबरोबरच शहरातील गरीब मुलांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. ते लक्षात घेऊन आ. निरंजन डावखरे यांनी ऑनलाईनद्वारे वर्षभरासाठी मोफत ‘मॉक टेस्ट सिरीज’चा उपक्रम सुरू केला आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना www.niranjandavkhare.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
 
 
 
कोकणातील विद्यार्थ्यांना संधी
 
कोकणातील विद्यार्थ्यांना ‘सीईटी’, ‘जेईई’ आणि ‘एनईईटी’चे उत्तम व दर्जेदार पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना सराव करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आ. निरंजन डावखरे यांनी दिली.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0