गायीने वाचवले आदेश भाऊजींचे प्राण!

    दिनांक  21-Jun-2022 13:08:26
|
 
 

home minister
 
 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजे अर्थातच आदेश बांदेकर गेली १८ वर्षे सातत्याने 'होम मिनिस्टर' या झी मराठीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. विविध संकल्पनांतून, खेळांतून, मजेशीर प्रसंगांतून तर कधी हळव्या आठवणी या सर्वांमधून आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत.
 
 
 
 
 
सध्या सुरु असलेल्या 'महामिनिस्टर'ची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण येत्या रविवारी ठरणार आहे अकरा लाखाच्या पैठणीची मानकरी म्हणजेच 'महामिनिस्टर'! १८ वर्षांच्या एवढ्या प्रदीर्घ काळात भाऊजींना वेगवेगळे मजेशीर अनुभव आले आहेत; त्यातील नुकताच सिन्नर मध्ये होणाऱ्या शूट दरम्यान प्रवासात आलेला अनुभव भाऊजींनी झी मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
 
 
 
 
आदेश बांदेकर सांगतात, 'सिन्नरमधील एपिसोडचे शूट संपवून आम्ही परतत होतो तेव्हा तुफान पाऊस सुरु झाला होता. आम्हाला वाटेतच एक सुंदर तटबंदी असलेले मंदिर लागले. त्या मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊन पुन्हा निघालो तेव्हा अचानक एक गाय आमच्या वाटेत आडवी येऊन थांबली. सहसा हॉर्न वाजवल्यानंतर गाय किंवा कोणताही प्राणी पुढे निघून जातो, परंतु ही गाय जागची हलायला देखील तयार नव्हती. साधारण ५-१० मिनिटे हा प्रकार सुरु होता तोपर्यंत गाय आणि आम्ही शांत थांबलो होतो. थोड्यावेळाने ती स्वतःहून बाजूला झाली; तेव्हा मी गंमतीत म्हणालो- चला सिग्नल सुटला! तो पर्यंत पावसाचा वेग एवढा वाढला होता की आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते, गाडी हळूहळू पुढे जात होती. तेवढ्यात समोर एक आजोबा आमच्या दिशेने हातवारे करत आम्हाला थांबवत होते आम्ही थांबलो तेव्हा त्यांनी सांगितले, आम्हाला वाटेत लागणाऱ्या नदीवरील पूल पावसाच्या जोराने ढासळला आहे! जर ती गाय वाटेत थांबली नसती तर आम्ही आतापर्यंत त्या पुलावर पोहचलो असतो. नशीब बलवत्तर आणि देवाची कृपा म्हणून त्या गायीमुळेच आमचा जीव वाचला.'
 
 
 
 
 
 
 
 
आदेश बांदेकर यांचा हा प्रसंग ऐकून त्यांच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. एक नेटकरी म्हणतात, 'तुमचा इतका निर्मळ, सात्विक स्वभाव व महाराष्ट्रातील सर्व वहिनींच्या- कुटुंबांच्या शुभेच्छा व आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत!' तर एक नेटकरी म्हणत आहेत, 'महाराष्ट्राच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही होणार नाही! देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो!' अशा अनेक प्रतिक्रिया आपल्याला या व्हिडिओखाली वाचयला मिळत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.