ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उद्योजकांनी धर्मकार्यासाठी अधिकाधिक अर्पण करावे! : रवींद्र प्रभुदेसाई

दशम ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशना’ची यशस्वी सांगता

    21-Jun-2022
Total Views |

RP 2
 
 
 
 
 
ठाणे : “ ‘उद्’ म्हणजे ‘आनंद’ व ‘योजक’ म्हणजे मिळवणे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती जो घडवून आणतो तो खरा उद्योजक होय ! असे परात्पर गुरु परशुराम पांडे महाराज यांनी सांगितले आहे. त्यानुसार, जगातील सगळ्यात मोठे उद्योजक हे सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले हेच आहेत. तेव्हापासून माझ्या धनातील काही वाटा मी धर्मकार्य करणार्‍या संस्थांना अर्पण करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर माझ्या आनंदात आणखी वाढ झाली.
 
 
 
त्यामुळे ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी उद्योजकांनी अधिकाधिक अर्पण करावे,” असे आवाहन ठाणे येथील ‘पितांबरी’ उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. हिंदू जनजागृती समितीच्यावतीने हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी फोंडा, गोवा येथे आयोजित दशम ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. दि. १२ ते १८ जून या कालावधीत पार पडलेल्या ‘हिंदू राष्ट्र अधिवेशना’त भारतातील २६ राज्यांसह अमेरिका, हाँगकाँग, नेपाळ, फिजी आणि इंग्लंड येथील १७७ पेक्षा अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी, तसेच संत, साहित्यिक, अधिवक्ता, उद्योजक, पत्रकार, माजी वरिष्ठ शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतून ‘लष्कर-ए-हिंद’या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रवक्ता डॉ. विजय जंगम, कल्याण येथील ‘सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट’चे संस्थापक सद्गुरू नवनीतानंद, सुप्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक दुर्गेश परूळेकर, नवी मुंबई येथील निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित थडानी आदी या अधिवेशनाला उपस्थित होते. या अधिवेशनात ‘भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावे’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट १९९१’ रद्द करून काशी, मथुरासह हजारो मंदिरे हिंदूंच्या ताब्यात द्यावी’, ‘धर्माधारित हलाल सर्टिफिकेटवर बंदी आणावी’, ‘काश्मिरी हिंदूंसाठी ‘पनून काश्मीर’ नावाने केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात यावा’, असे अनेक ठरावदेखील यावेळी संमत करण्यात आले.
 
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.