मुंबई : अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत भाजप हा महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांवर भारी पडताना दिसत आहे. ठाकरे सरकारच्या पक्षांतील एकूण २१ मते फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या तिनही पक्षांनी हॉटेलमध्ये आमदारांना मतदानाबद्दल सर्वच प्रकारचे प्रशिक्षण दिले होते. मात्र, राज्यसभेवेळी घडलेला प्रकार आता पुन्हा एकदा उघड झाला आहे. दहाव्या जागेसाठी निर्णायक मतांची चुरस होती. शिवसेनेतील एकूण तीन मते फुटल्याची चर्चा आहे. सेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. मात्र, फक्त पक्षाला ५२ मते मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही तीन मते कुठे गेली याबद्दल पक्षश्रेष्ठींना चिंता सतावत आहे.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी जागांसाठी चार पक्षांचे ११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराला जिंकून येण्यासाठी २६ मतांचा कोटा आवश्यक आहे. एकूण २८४ आमदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. संख्याबळाच्या अनुसार शिवसेनेकडे ५५ मते असून त्यांचे दोन उमेदवार सचिन अहिर आणि आमषा पाडवी आवश्यक मते उपलब्ध असल्यामुळे निश्चित विजयी होतील, असे चित्र होते. या संख्याबळासह शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’चे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जयस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत.
इतर मते धरल्यास शिवसेनेचे संख्याबळ ६२ होते. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी एकूण ५२ मतांची गरज असून सध्या काँग्रेकडे ४४ मते उपलब्ध होती. त्यामुळे जर काँग्रेसला आपला पराभव टाळून दुसरा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर त्यांना एकूण आठ मतांची गरज होती. ती जर भागली नाही, तर काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव अटळ होता. हा फैसला दुसऱ्या मतमोजणीच्या फेरीवेळी होणार होता. तसेच दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराच्या मतांवर ही कमान कायम होती.