आतापर्यंत आपण कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचे विवेचन पाहिले, तरी सर्व योगाचे उद्दिष्ट अंतिमत: समाधी प्राप्त करणे, आज आपण पतंजलीच्या राजयोगाबद्दल माहिती बघूया. पातंजल योग दर्शनशास्त्राच्या द्वितीय साधनापादामध्ये २९ व्या सूत्रामध्ये याचे वर्णन केले आहे, त्यांच्या ‘अष्टांगयोगा’लाच राजयोग म्हणतात.
यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणा ध्यानसमाधयोऽष्टावङ्गानि ॥२.२९॥
यम - सामाजिक संबंधाबाबत अनुशासन.
नियम - स्वत:च्या व्यक्तिगत जीवनाबाबत अनुशासन.
आसन-प्राणायाम-प्रत्याहार - इंद्रियाची अंतर्मुखता.
धारणा - सर्वसमावेशक एकाग्रता
ध्यानसमाधय: अष्टौ अङ्गानि।
या आठ अंगांचा अभ्यास करून दिव्यानंद मिळवावा, असे पतंजलीमुनी सांगतात. पातंजलसूत्रात पाच यम व पाच नियम सांगितले आहेत, तर काही ठिकाणी ही संख्या दहा-दहा आहे.
पाच नियम पुढीलप्रमाणे
१) अहिंसा - काया-वाचा-मनानेसुद्धा हिंसा न करणे स्वत:च्या रक्षणासाठी किंवा देशाच्या रक्षणासाठी केलेली हिंसा याला अपवाद आहे.
२) सत्य - नेहमी खरेच बोलावे, खरे वागावे. एक खोटे बोलले, तर ते लपविण्यासाठी १०० वेळा खोटे बोलावे लागते, अशावेळी आपले मन नेहमीच अशांत राहते. शांत झोपसुद्धा येत नाही. म्हणून नेहमी सत्य वदावे, सत्य आचरावे, शांती-सुख अनुभवावे.
३) अस्तेय - जे आपले नाही, त्याची इच्छा न करणे, ते न उचलणे. उचलल्यास ती चोरी होते. (स्तेय) त्यामुळे मन स्वत:ला कुरतडत राहते.
४) ब्रह्मचर्य - सर्वसामान्यपणे ब्रह्मचर्य म्हणजे कामवासनेपासून अलिप्त राहणे, असा अर्थ केला जातो. लैंगिक गोष्टीविषयी विचार न करणे, स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी न बोलणे, न पाहणे. पण, चेंडू जितका दाबून ठेवाल, तेवढाच तो वरती उडतो. त्याप्रमाणे लैंगिक भावना दाबल्या, तर उफाळून वर येतात व विकृती उत्पन्न करतात, अशा भावनांवर नियंत्रण ठेवणे, त्यांची दिशा बदलणे महत्त्वाचे असते. याचाच दुसरा अर्थ असा ‘ब्रह्म’ म्हणजे शुद्ध जाणीव व ‘चर्य’ म्हणजे चालणे म्हणजे शुद्ध जाणिवेकडे वाटचाल करणे.
अहिंसा, सत्य आणि अस्तेय ही तीन व्रते जर प्रामाणिकपणे आचरणात आली, तर ब्रह्मचर्याच्या उपलब्धीसाठी ते साहाय्यक ठरते.
५) अपरिग्रह - म्हणजे वस्तूंचा संग्रह न करणे म्हणजे कोणतीही वस्तू, माणसे यांच्यावर मालकी न ठेवणे. म्हणजे ‘हे माझे, ते माझे, माझे सगेसोयरे.’ पण, याचा अर्थ जरुरीच्या वस्तूंचासुद्धा त्याग करणे, असा नाही. साठवून ठेवण्याची वृत्ती आसक्ती निर्माण करते. मनात अतृप्ती, अशांतता निर्माण होऊन साधनेत अडथळा येतो.
अहिंसासत्यास्तेय ब्रह्मचर्या
परिग्रहा यमाः ॥ २.३०॥
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, (असंग्राही वृत्ती) यमाः व्रते
सामाजिक जीवनात वावरताना काय करावयाचे नाही, याचा आदर्श पाच यमांद्वारे पतंजलींनी आपल्या समोर ठेवला आहे. याउलट वैयक्तिक जीवन जगताना काय केले पाहिजे की साधनेतील अडथळे दूर होतील.
शौचसंतोषतपस्वाध्यायेश्वर प्रणिधानानि नियमाः॥ ॥२.३२॥
१) शौच - काया, वाचा मनाची शुद्धता, शुद्ध मन सामर्थ्यवान असते.
२) संतोष - आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद न उपभोगता नाही त्यासाठी रडणे, या वृत्तीचा त्याग केला पाहिजे. चित्ताची समतोल वृत्ती, प्रसन्नता वाढल्यास जीवनविषयीचा स्वीकारभाव निर्माण होणे.
३) तप - म्हणजे परिश्रम करणे. शारीरिक, वाचिक, मानसिक अशी तीन तपे आहेत. तप म्हणजे शरीराला ताप देणे. त्याने कष्टाची सवय लागते. सोशिकता वाढते. अहंभाव गळून पडतो.
४) स्वाध्याय - म्हणजे स्व+अध्याय तुम्ही जो अभ्यास कराल त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. स्तोत्र-ग्रंथपठणास सत्वशील विचार व त्याने निखळ आनंदप्राप्ती होते.
५) ईश्वर प्रणिधान - भक्तिमार्गीयांचा देव आणि पतंजलीचा ईश्वर यामध्ये खूपच फरक आहे. अंतःस्थ ईश्वरी तत्त्वाची सतत जाणीव ठेवणे म्हणजे ईश्वर प्रणिधान.
यम, नियम हे यौगिक नीतिशास्त्राची पहिली पायरी म्हणून त्याचे पालन सहजतेने झाले पाहिजे, अशी योगाची अपेक्षा आहे, पण ते सहजासहजी घडत नाही. त्यामुळे त्यापुढील साधना म्हणजे आसन, प्राणायाम व प्रत्याहार हेसुद्धा बहिरंग योगात येतात.
आसन - योगशास्त्राचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे आसने. कारण, तो चटकन दिसतो. पटकन लक्षात येणारा कमालीचा आकर्षक असल्याने लोकांना आवडतो. सुरुवातीला केवळ ध्यानात्मक आसने होती. हठयोगाचे आसन हे प्रथम अंग आहे. त्यामुळे स्थिरता स्वारस्य व हलकेपणा येतो. भगवान शंकराने आसनांचे ८४ लक्ष प्रकार सांगितले आहेत, तर ‘हठरत्नावली’त ८४ आसनांचे वर्णन आहे.
प्राणायाम - श्वसननियंत्रणाद्वारे मनोनियंत्रण व अंतरंग योगाकडे वाटचाल हा प्राणायामाचा हेतू आहे. त्यामुळे प्राणायाम साधनेत अंतरंगाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रत्याहार - पंच ज्ञानेंद्रियामार्फत मनाचा बाह्य विषयांशी सतत संबंध येतो. मन सतत बाहेर भटकत असते तेव्हा मनाचा बाह्य विषयांशी असलेला संबंध तोडणे. अंतःकरणातीलचित्ताशी एकरूपतेचा प्रयत्न करणे.
धारणा - श्वसनक्रियेशी समरसता आली की, बाह्यविषय निघून जातात. इष्ट विषयावर मनाला सहजतेने गुंतवणे म्हणजे धारणा.
ध्यान - ध्यान हे लागले पाहिजे. ध्यानामध्ये सहजता, स्थिरता, प्रयत्नशीलता आवश्यक आहे, अशा साधनाची मनोवृत्ती संतुलित असते.
समाधी - केवळ ध्यानाविषयी एकरूपता आपल्यानंतर निर्भास चित्ताचे मूळ स्वरूप नाहीसे होणे, ध्येय विषयांचे दिव्यज्ञान होऊ लागणे, ही खरी समाधी अवस्था इति!
- वैद्य अरुणा टिळक
(लेखिका आयुर्वेदाचार्य
योगशिक्षक आहेत)