हिंदूद्वेष्ट्यांचा काश्मीर राग

02 Jun 2022 10:56:42
 
 
 
vivek agnihotri
 
 
 
 
 
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि भारतीयांना ‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून काश्मिरी पंडितांच्या व्यथा सांगणारे विवेक अग्निहोत्री हे युके दौर्‍यावर असताना त्यांना तिथे अतिशय वाईट अनुभव आला. युकेतील ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’कडून त्यांना दि. ३१ मे रोजी भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याप्रमाणे ते भाषण देण्यासाठी युकेत गेलेसुद्धा. मात्र, हा कार्यक्रम ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ने अचानक अगदी शेवटच्या क्षणी रद्द केला. म्हणूनच विवेक अग्निहोत्री यांनी यानंतर युनिव्हर्सिटीवर ‘हिंदूफोबिया’चा आरोप करीत ट्विट केले की, “हिंदूफोबिक ‘ऑक्सफर्ड’ युनियनने पुन्हा एकदा हिंदूंचा आवाज दाबला आहे.
 
 
त्यांनी माझा कार्यक्रम रद्द केला. मात्र, यामागील खरे कारण हे आहे की, त्याठिकाणी हिंदूंच्या नरसंहाराविषयी मी बोलणार होतो. या ठिकाणी हिंदू विद्यार्थी अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. तसेच, या युनियनचा निर्वाचित अध्यक्ष हा एक पाकिस्तानी आहे. त्यामुळे या लढाईत मला साथ द्या.” तसेच त्यांनी या सगळ्या प्रकाराविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचेही म्हटले आहे. त्याचप्रमाणे अग्निहोत्री यांनी या प्रकाराबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातूनही आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “मला ‘इस्लामोफोबिक’ म्हटले जाते, जसं काश्मिरी हिंदूंना मारणं हा हिंदुत्वविरोध नव्हताच. मात्र, सत्य परिस्थितीवर चित्रपट तयार केला, तर मी ‘इस्लामोफोबिक’ वाटू लागलो. ‘ऑक्सफर्ड’ विश्वविद्यालयात हिंदू अल्पसंख्याक असून, हे एकप्रकारे अल्पसंख्याकांचे उत्पीडनच आहे. याआधी ‘केम्ब्रिज युनिव्हर्सिटी’कडूनही अग्निहोत्री यांना डावलल्याचा प्रकार समोर आला होता. कारण, तेव्हा काही पाकिस्तानी आणि काश्मिरी मुस्लीम विद्यार्थ्यांनी अग्निहोत्रींना विरोध केला होता. त्यामुळे मोदी समर्थक असणे, काश्मिरी पंडितांच्या बाजूने उभे राहणे हा अग्निहोत्रींचा अपराध आहे की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.
 
विशेष म्हणजे, अग्निहोत्री यांना पहिल्यांदाच विरोध झाला असे नाही. याआधीही त्यांच्या वाटेत अनेक अडथळे आले आहेत. ‘काश्मीर फाईल्स’चे चित्रीकरण काश्मीरमध्ये सुरू असतानाही त्यांना विरोध झाला. तेव्हा त्यांना पोलीस संरक्षणात चित्रपटाचे शूट पूर्ण करावे लागले. नंतर, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही, तर ३०० कोटींहून अधिकची कमाई या चित्रपटाने केली. या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरी पंडितांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. विवेक अग्निहोत्रींनी या चित्रपटासाठी अनेक गोष्टी पणाला लावल्या आणि त्याचे फळ म्हणून हा चित्रपट ‘हिट’ ठरला. देशभरातील हिंदूंना जागे करण्यामध्ये ‘द काश्मीर फाईल्स’यशस्वी ठरला. पण, काही नतद्रष्टांनी त्यालाही विरोध करण्याचे आपले कर्तव्य यथाशक्ती पार पाडले. ‘विकिपीडिया’नेही चित्रपटाच्या माहितीमध्ये छेडछाड करत ‘द काश्मीर फाईल्स’ला चुकीचे ठरवत चित्रपट काल्पनिक असल्याचे म्हटले. त्यावरही अग्निहोत्रींनी संतप्त होत ‘विकिपीडिया’ला धारेवर धरले होते. तसेच, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही ‘द काश्मीर फाईल्स’ भाजप पुरस्कृत असल्याची टीका केली होती. यावर अग्निहोत्री यांनी थरूर यांना हिंदू नरसंहाराची चेष्टा करणे बंद करण्याची समज दिली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या चित्रपटावर टीका केली होती.
 
अनेक चित्रपटगृह मालकांनी सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. तसेच, काहींनी मोजकेच शो लावले. मात्र, हिंदू एकत्र केल्यावर काय घडू शकते, याचा प्रत्यय ‘द काश्मीर फाईल्स’च्या अभूतपूर्व यशाने समोर आला. हिंदू समाज जागा झाला आणि या चित्रपटाने नवनवीन विक्रमांना गवसणी घातली. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार याआधीही अनेकदा जाणूनबूजून झाकोळण्याचा प्रयत्न झाला. काश्मीरला नंदनवनाच्या नावाखाली हिंदूंसाठीचे स्मशान बनवण्याकडे प्रयत्न केले जात होते. मात्र, काश्मिरी पंडितांच्या अश्रूंची चव देशाला सांगण्याची हिंमत विवेक अग्निहोत्रींनी केली. त्यासाठी त्यांचे करावे तितके कौतुक कमीच! अग्निहोत्रींना विरोध नवा नाही, त्यामुळे भाषण भले देता आले नसेल. मात्र, त्यांच्या चित्रपटाने सगळ्या हिंदूद्वेष्ट्यांना सणसणीत चपराक लगावली, हे मात्र नक्की.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0