‘हुक्का पार्लरमुक्त ठाणे’ चळवळीला वेग

18 Jun 2022 13:24:16


SK 3
 
 
 
 
 
ठाणे : ठाणे शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी आणि अवैध डान्स बार विरोधात आ. संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागानेही मोठी कारवाई केली आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठाणे शहराची प्रतिमा हुक्का पार्लर आणि डान्स बार संस्कृतीमुळे मलिन होत असल्याने आ. संजय केळकर यांनी या विरोधात लोक चळवळ सुरू केली होती.
 
 
 
या अवैध धंद्याविरोधात जागरूक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर आ. केळकर यांनी अधिवेशनातही या प्रश्नाला वाचा फोडली. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागालाही आ. केळकर यांनी पाठपुरावा करून कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यानुसार या विभागाने अटी-नियमांचे पालन न करणार्‍या ५१ बार-रेस्टॉरंटवर कारवाई केल्याची माहिती आ. केळकर यांना दिली. दरम्यान, पोलीस आयुक्तांनीही स्पष्ट आदेश दिल्यानंतर कारवाईला वेग आला. शहरातील १५ पोलीस ठाण्यांना पत्र देऊन आ. केळकर यांनी विचारणा केली होती. त्यातील केवळ चार पोलीस ठाण्यांनी लेखी माहिती दिली. उर्वरित पोलीस ठाण्यांनी दखल न घेतल्याने आ. केळकर यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
 
 
 
या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असल्याचे दोन्ही कार्यालयाकडून कळविण्यात आले. हुक्का पार्लर आणि डान्स बार हे व्यवसाय अवैधपणे आणि रात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असल्याने ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर हुक्का पार्लरमुक्त ठाणे आणि डान्स बार विरोधी चळवळ नागरिकांच्या सहभागातून सुरू केली. या चळवळीला वेग येत असून यशही मिळत आहे. ज्या-ज्या ठिकाणी असे अवैध धंदे सुरू आहेत, रहिवाशांना त्रास होत आहे, त्याबाबतची माहिती तत्काळ द्यावी, त्यावर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू, असे आवाहन आ. संजय केळकर यांनी केले आहे.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0