जालियानवाला बाग हा सेल्फी पॉइंट नव्हे! - दीप्ती नवल यांचा संताप

    18-Jun-2022
Total Views |

deepti
 
 
 
 
 
 
शिमला : शिमल्यामध्ये पार पडणाऱ्या साहित्य संमेलनात बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल या देखील सहभागी झाल्या आहेत. तेथे करण्यात आलेल्या एका वक्तव्यावर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दीप्ती नवल यांनी ८०च्या दशकातील काळ गाजवला होता. त्यांचा चाहतावर्ग देखील चांगलाच मोठा होता. त्या अभिनेत्री तर आहेतच परंतु, त्याच्या जोडीने त्या स्वतः साहित्यिक आणि चित्रकार देखील आहेत. ह्या संमेलनात दीप्ती नवल यांनी जालियानवाला बागेसंबंधात तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे विधान केले आहे.
 
 
 
 
 
 
आजकाल कुठेही गेले तरी सेल्फी घेणं हा तरुण पिढीचा नियमच झाला आहे आणि जर चुकून सेल्फी काढायचा राहिलाच तर त्याने हळहळणारी आजची काही मुलं आहेत. पण ह्या सर्वात आपण कुठे सेल्फी काढत आहोत, त्या जागेचा इतिहास काय आहे, महत्त्व काय आहे ह्या सर्वाचा त्यांना विसर पडतो, असे म्हणत दीप्ती नवल यांनी जालियनवाला बागेत सेल्फी घेणाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. शिमल्यामध्ये सुरु असणाऱ्या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनातील 'शब्द आणि समज' या सत्रात त्यांनी आपले विचार मांडले आहेत.
 
 
 
 
 
 
दीप्ती नवल या अनेक वर्ष अमेरिकेत जरी असल्या तरी त्यांचे बालपण अमृतसरमध्ये गेले होते; त्यामुळे भारत आणि भारतीय संस्कृती हा नेहमीच त्यांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा विषय राहिला आहे आणि हे प्रेम त्यांच्या साहित्यातून-चित्रांतून व्यक्त होत असते. जालियानवाला बागेसंबंधात बोलताना त्या म्हणाल्या, जालियानवाला बाग हा सेल्फी पॉइंट झाला आहे! या जागेचा इतिहास काय, काय नरसंहार येथे झाला होता, किती निष्पाप जीवांचा येथे बळी गेला या सगळ्याचा विसर पडला आहे काय? तुम्ही हिरोशिमाला जा, आजही त्याठिकाणी त्या महायुध्दातल्या खुणा जाणीवपूर्वक तुमच्या निदर्शनास आणून दिल्या जातात. आपल्यातली संवेदनशीलता हरवत चालली आहे. दुर्दैव हे की आपण अनेकदा चुकतोय हे देखील आपल्याला कळत नाही, एवढे आपण आत्ममग्न झाले आहोत. कुणी हे लक्षात आणून दिले तरी आपल्यात सुधारणा काही होत नाही याची खंत जास्त वाटते, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणातून तरुणांची चांगलीच कानउघडणी केली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.