सुदानसाठीही ‘मुस्लीम ब्रदरहूड’

18 Jun 2022 11:15:17

africa
 
 
स्थानिक वनवासी आणि मुस्लीम अरबी समुदाय यांच्यादरम्यान उफाळलेल्या हिंसेमध्ये वनवासी समाजाच्या तब्बल १०० जणांची हत्या झाली. अनेक गावंच्या गावं जाळली गेली आणि त्यात लहान बालक, महिला, वृद्ध जळून खाक झाले. ही घटना आहे सुदान देशातल्या दारफूर इथली.
 
 
तसे हे प्रकार तिथे अजिबात नवीन नाही. २१व्या शतकातला सगळ्यात मोठा नरसंहार इथेच झाला होता. २००३ ते पुढील दहा वर्षांत इथे ४ लाख, ८० हजार लोक नाहक मृत्युमुखी पडले. यातील बहुसंख्य लोक स्थानिक वनवासीच होते. हा विषय संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयात गेला. या नरसंहारासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने सुदानचे राष्ट्रपती अल बशीर यांना पुराव्यासहीत गुन्हेगार ठरवले. तसेच, सैन्यातील पाच कर्नल आणि इतर अधिकार्‍यांवरही ठपका ठेवला. मात्र, याच काळात सुदानमध्ये सत्तापालट झाला. अल बशीर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सैन्याने अल बशीर यांना ताब्यात घेतले. संयुक्त राष्ट्रसंघाला सांगितले की, अल बशीर हा सुदानचाही गुन्हेगार आहे, असे सांगून सुदानच्या सैन्याने अल बशीर यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताब्यात देण्यास नकार दिला.
 
 
सुदानमध्ये ८० टक्के मुस्लीम आणि पाच टक्के ख्रिश्चन, तर १५ टक्के वनवासी राहतात. अर्थात, सुदानचे मुस्लीम काय किंवा ख्रिश्चन काय, हे दोघेही पूर्वाश्रमीचे सुदानी वनवासीच! सुदानच नव्हे, तर आफ्रिका खंडातील नील नदीच्या काठावर, घनदाट जंगलात वनवासी समूहांचा निवास होता आणि आजही आहे. ते निसर्गपूजक आहेत. पशुपालक आणि गोमातेसंदर्भात अत्यंत भावनाशील आहेत. इथे श्रीमंती एखाद्याकडे किती पशू आहेत आणि घरात किती मुली जन्मल्या यावरून मोजली जाते. गाय आणि महिलांबाबत या वनवासी समूहांमध्ये प्रचंड आदर आणि पारंपरिक श्रद्धा आहेत. गाय आणि महिलांवर झालेला हल्ला किंवा अत्याचार इथे हे वनवासी समाज त्यांच्या समाजावर झालेला हल्ला मानतात.
 
 
मात्र, मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्माच्या प्रसारानंतर या वनवासी समाजामध्ये शब्दातीत घडामोडी घडल्या. ज्या वनवासींनी मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला, ते मूळ वनवासी प्रथांना आणि श्रद्धांच्या विरोधात गेले. सुदानच्या लगतच मुस्लीम राष्ट्रे आहेत. त्यांच्यावर अरब संस्कृतीचा प्रभाव आहे. तो प्रभाव या सुदानच्या मुस्लिमांवरही पडला. त्यांना स्थानिक वनवासींनाही धर्मांतरीत करायचे होते. मात्र, हे वनवासी आपल्या मूळ परंपरांना चिकटून राहिले. सुदान १९५६ साली ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. पुढे 80च्या दशकात मुस्लीम धर्मीय अल बशीर हे सुदानचे सत्ताधारी झाले. त्यांच्या काळात लीबिया या मुस्लीम राष्ट्राने सुदान आणि चाड या दोन्ही देशाच्या सीमाभागात दहशतवाद पेरण्यासाठी ‘जंजावद’ नावाच्या संघटनेला पोसले. ‘जंजावद’ या अरबी शब्दाचा अर्थ म्हणजे धर्माचा पवित्र घोडा. ‘जंजावद’ संस्था सुदान सीमा भागात हैदोस घालू लागली. सुदाननेही ‘अब्बाला’ या अरबी टोळीस शस्त्र पुरवले आणि या ‘जंजावद’च्या विरोधात उतरवले.
 
 
 
मात्र, पुढे ‘जंजावद’मध्ये ‘अब्बाला’ टोळी मिसळली. मग ‘जंजावद’ जे स्वतःला धर्माचे घोडे अर्थात धर्मप्रसारक मानत होते, त्यांनी सुदानमधील गैर-मुस्लीम वनवासींवर हल्ला करण्यास सुरुवात केली. सशस्त्र टोळीपुढे स्थानिक वनवासी नामोहरम होतील. ते एकतर मुस्लीम तरी होतील किंवा ते त्यांची जमीन, पशुधन सोडून तरी जातील, असे या टेाळीला वाटले. मात्र, स्थानिक वनवासींनी या सशस्त्र टोळीला जबरदस्त आव्हान दिले. या काळात राष्ट्रपती अल बशीर आणि सैन्याने ‘जंजावद’ला मदत केली. लाखो वनवासी बेघर, बेपत्ता झाले. महिलांवर अत्याचाराची तर सीमाच नव्हती. सुदानमध्ये दिवसरात्र संघर्ष पेटला. इतका की, २०११ साली अल बशीरना वनवासीबहुल प्रदेशाला ’दक्षिण सुदान’ म्हणून वेगळ्या देशाची मान्यता द्यावी लागली. मात्र, तरीही काही वनवासी त्यांच्या पारंपरिक जल-जमीन-जंगलसाठी मूळ सुदानच्या सीमा भागात राहिले. या उर्वरित समुदायाला तिथून हाकलून लावण्यासाठी, त्यांची जमीन, संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्यावर अरबी टोळ्यांकडून नित्यनियमाने हल्ले होत आहेत. मग हे समुदायही विरोधकांवर हल्ले करतात. दर आठवड्याला शेकडो लोक मारले जातात. दर आठवड्याच्या बातम्यांमध्ये शेकडो लोक मारले गेले हे लिहिलेले असते. यामुळे बहुसंख्य मुस्लीमधर्मीय सुदान गरीब, दहशतवादाने रक्तरंजित आहे. सध्या मुस्लीम राष्ट्रे ईशनिंदा वगैरेंसाठी एक होताना दिसत आहेत. सुदानसारख्या मुस्लीमबहुल देशासाठी मुस्लीम राष्ट्रे का बरं एकत्रित येत नाहीत?
 
 
Powered By Sangraha 9.0