सर्पमित्र उद्योजकाची जीवनगाथा...

17 Jun 2022 19:42:48

mns
 
घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण झाले नसले तरी आज स्वत:चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणार्‍या आणि वयाच्या ५८व्या वर्षीही सर्पमित्र म्हणून आवड जोपासणार्‍या डोंबिवलीच्या बाबाजी बाबुराव पाडेकर यांच्याविषयी...
 
 
बाजी पाडेकर यांचा जन्म पुण्यातील एका लहानशा खेडेगावातला. त्यांचे शालेय शिक्षण रयत शिक्षण संस्थेत झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दहावीनंतर ते मुंबईत दाखल झाले. मिळेल ते काम करता करताच त्यांनी पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु, घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. एकीकडे पोट भरण्यासाठी पडेल ते काम करतानाच त्यांचे शिक्षण मात्र कायमचे सुटले. त्यांनी कधी रिक्षा चालविली, तर कधी गॅरेजमध्ये काम केले. पुढे काही काळ ‘घरडा केमिकल’मध्ये नोकरीही केली. बाबाजी हे घरात भावंडांमध्ये थोरले. त्यांचे मातृछत्र लहानपणीच हरविले. त्यामुळे वडिलांनीच त्यांना लहानाचे मोठे केले. त्यांचे वडील शेतकरी. त्यात तीन बहिणी आणि एक भाऊ यांचीही जबाबदारी बाबाजींवर होती. १९९० साली बाबाजींनी ‘ट्रान्सपोर्ट’च्या व्यवसायात पर्दापण केले आणि ‘अल्पेश ट्रान्सपोर्ट’ नावाने स्वत:चा व्यवसाय सुरू आहे.
 
 
बाबाजींना लहानपणापासूनच प्राण्यांविषयी प्रचंड कुतूहल. बाबाजी हे शेतकरी कुटुंबात लहानाचे मोठे झाल्याने त्यांच्या घरात गुरेढोरे होती. प्राण्यांविषयी स्वाभाविकच जिव्हाळा होता. त्यामुळे त्यांना जसजशी संधी मिळाली, तसतसे त्यांनी प्राण्यांविषयीच्या पुस्तकांचे वाचन सुरु केले. त्यानंतर त्यांनी सर्पमित्र म्हणून प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली. दि. २६ फेब्रुवारी, १९८९ साली त्यांनी पहिल्यांदा सापाला पकडले. त्याशिवाय इतर प्राण्यांनाही ‘रेस्क्यू’ करण्याचे काम बाबाजी आजही करतात. त्यासाठी त्यांनी कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. हे काम करीत असताना त्यांना बिनविषारी सापांनी अनेकदा त्यांना दंश केला आहे. पण, एकदा तर विषारी सापानेही त्यांना दंश केला होता. डोंबिवली महापालिकेत हा साप आढळून आला होता. तो साप पकडण्यासाठी बाबाजी गेले होते. सापांविषयी माहिती असल्याने तो साप विषारी आहे, याची बाबाजींना जाणीव होतीच. त्यामुळे सर्पदंशानंतर त्यांनी लगेचच शास्त्रीनगर रुग्णालयात धाव घेतली. पाच दिवसांच्या उपचारानंतर ते सुखरूप घरी परतले. सर्व सरकारी रुग्णालयांत सर्पदंशावर उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे बाबाजींना उपचार मिळण्यात कोणत्याही अडचणी आल्या नाहीत.
 
 
बाबाजींनी आजवर एक लाखांहून अधिक साप पकडून त्यांना जंगलात सोडले आहे. बाबाजी सांगतात की, सध्या सर्पमित्रांची संख्या वाढत आहे. पूर्वी सर्पमित्रांची संख्या कमी असल्याने एका दिवशी सात ते आठ साप पकडण्यासाठी फोन येत असत. आता दिवसाला एक किंवा दोन फोन येतात. नागरिकांकडून फोन आल्यावर सर्पमित्र सापाला पकडतात आणि त्यानंतर सापाला जंगलात सोडले जाते. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात साप बिळाबाहेर जास्त प्रमाणात फिरताना आढळून येतात. पावसाळ्यात बिळात पाणी साठल्याने, तर उन्हाळ्यात जास्त उष्णतेमुळे साप बिळाबाहेर येतात.
 
 
सर्पदंशाचा असाच एक किस्सा बाबाजी सांगतात. एकेदिवशी त्यांच्या मित्राच्या मुलाला मण्यार जातीच्या विषारी सापाने पायाला दंश केला. त्यानंतर त्याच सापाने शेजारच्या घरात जाऊन दुसर्‍या मुलाच्या कानाला दंश केला होता. पायाला दंश केलेल्या मुलाच्या पालकांनी त्याच्यावर घरगुती उपचार केले. त्यानंतर सकाळी त्याला रुग्णालयात नेण्यात आले. सकाळपर्यंत या मुलांचा ‘ब्रेन डेड’ झाला होता, तर दुसर्‍या मुलांच्या पालकांनी त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. पण, त्या मुलाचा मृत्यू झाला, तर पायाला दंश केलेल्या मुलाला खासगी रुग्णालयात उपचार मिळाल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला. सर्पदंशाची अशी अनेक उदाहरणे आमच्या डोळ्यांसमोर असल्याचे ते सांगतात.
 
 
बाबाजी हे डोंबिवली पूर्वेतील देशमुख होम्स सोसायटीत राहतात. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळून ते सर्पमित्र म्हणून आपली आवड जोपासत आहेत. अतिशय निरपेक्ष भावनेने ते आपले काम करतात. पण, व्यवसायामुळे एखाद्या ठिकाणी साप पकडण्यासाठी व्यक्तिश: जाणे शक्य नसेल, तर आसपासच्या दुसर्‍या एखाद्या सर्पमित्राला ते संबंधित माहिती देतात. कधी साप आढळला, पण त्या ठिकाणाहून तोपर्यंत निघून गेला तरी लोक माहिती कळवितात. त्यामुळे आपला व्यवसाय सांभाळून हे काम करणे शक्य होत असल्याचे बाबाजी सांगतात.
 
 
अनेकदा लोकांकडून साप किंवा अन्य प्राणी वाहनांखाली येऊन मृत्युमुखी पडतात. यासाठी सरकारने अधिक कठोर कायदे करण्याची गरज आहे. त्यामुळे या प्रवृत्तींना कुठेतरी आळा बसू शकेल. हे प्राणीसुद्धा निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांनी देखील जीवंत राहणे गरजेचे आहे. अनेक औषधांमध्ये सापाच्या विषाचा वापर केला जातो. साप नामशेष झाले, तर ही औषध प्रक्रिया बंद पडेल. त्यामुळे पुढील पिढीचे हे मोठे नुकसानच असेल, असेही बाबाजी सांगायला विसरत नाहीत. तेव्हा, अशा या अनेकांचे जीव वाचवण्यासाठी तत्पर असलेल्या सर्पमित्राला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0