दादांसाठी उसनी ताईगिरी!

16 Jun 2022 10:19:24
 
 
 
modi in maharashtra
 
 
 
 
 
संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीसांच्या भाषणानंतर लगेच पंतप्रधान मोदींना भाषण करण्यासाठी सांगण्यात आले. त्यावर मोदींनी बाजूला बसलेल्या अजित पवारांना भाषण करण्यास सुचविले. मात्र, त्यांनी नकार दिला. ‘प्रोटोकॉल’नुसार, अजितदादांना पालकमंत्री म्हणून भाषणासाठी वेळ देण्यात आली नव्हती. हा कार्यक्रम शासकीय नसून तो एक खासगी कार्यक्रम होता. मंदिर लोकार्पणाच्या कोनशिलेवरही अजित पवारांचेच नाव आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात असताना सुप्रिया सुळे यांनी वादाची ठिणगी टाकली. अजितदादांनी कसलीही अडचण व आक्षेप नसताना सुळेंना राग येण्याचे काहीच कारण नाही. उलट नंतर मुंबईतील कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकाच विमानाने पोहोचले. त्यामुळे मागचा इतिहास पाहता, सुप्रियाताईंना आणि राष्ट्रवादीला धाकधूक होणे साहजिकच. सुप्रिया सुळेंनी अजितदादांना भाषण करून दिले नाही म्हणून तो महाराष्ट्राचा अपमान असल्याचा जावईशोध लावला. स्वतः जाहीरपणे नास्तिक असल्याच्या गमजा मारणार्‍या ताईंना अजित पवारांना दिले गेलेले निमंत्रण रूचले नाही किंवा खासदार शरद पवार यांना बोलावले नसल्याने त्यांचा इतका तीळपापड झाला असावा. हा प्रकार महाविकास आघाडीवर अन्याय असून, आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचेही सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राने नाकारूनही सत्तेचा सोपान सांभाळणार्‍या महाविकास आघाडीनेच महाराष्ट्रावर अन्याय केल्याचे ताईंना कुणीतरी सांगणे आवश्यक आहे. पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यानंतर मुख्यमंत्री ‘प्रोटोकॉल’नुसार कितीवेळा स्वागताला गेले, याची माहितीही ताईंनी घ्यावी. ते स्वागताला जात नाही, मग हा महाराष्ट्राचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान होत नाही का? मुख्यमंत्री मानेचं दुखणं असूनही पंढरपूरला स्वतः गाडी चालवत जातात. मात्र, त्यांना पंतप्रधानांच्या स्वागताला जाणं शक्य होत नाही, अशा मनात एक आणि ओठात एक वृत्तीवर ताईंनी टीका करणे सोडून महाराष्ट्राचे वातावरण बिघडवू नये. मोदींना मिळालेला वारकर्‍यांचा प्रतिसाद आणि अजितदादांची मोदी आणि फडणवीसांची जवळीक याचे दुःख होणे स्वाभाविक असले तरीही ते पचविण्याशिवाय दुसरा पर्यायही नाही. विशेष म्हणजे, अजितदादांनी या प्रकरणावर बाळगलेले मौन बरेच काही सांगून जाते.

 
 
हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी...
 
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौर्‍यावर होते. आदित्य ठाकरे एकटे नव्हते, तर अख्खा लवाजमा यावेळी त्यांच्यासोबत होता. विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्यासह अनेक नेतेमंडळी या दौर्‍यात सामीलही झाले. महाराष्ट्रातील सर्व प्रश्न आता संपलेले आहेत आणि महाराष्ट्र जणू काही महाविकास आघाडीने सुजलाम् सुफलाम् केला आहे, या आविर्भावात सेनेचे नेते अयोध्येला गेले. याठिकाणी आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन नंतर महाप्रसादही ग्रहण केला. त्यानंतर रामलला अन् हनुमानाचे दर्शन घेऊन संध्याकाळी शरयू नदीकाठी महाआरतीही संपन्न झाली. एकूणच सगळं काही एखाद्या नियोजित ‘इव्हेंट’प्रमाणे पार पडलं. त्यातच आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषेदमध्ये तर कित्येक मौल्यवान गोष्टींवर भाष्य केले. त्यामुळे प्रश्न हाच की, शिवसेनेला अलीकडे आपले हिंदुत्व वारंवार सिद्ध करण्याची गरज का वाटू लागली? आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, असे सतत ठासून सांगणार्‍या सेनेवर आता अयोध्या वारीतून हिंदुत्वाचा दिखावा मांडण्याची वेळ आली आहे. या दौर्‍यात आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन बांधण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. विचार चांगला असला तरीही ठाकरे सरकारचा विरोध करणार्‍यांना काहीतरी पुळचटं कारणं पुढे करून नोटिसा पाठविण्याचे सत्र आदित्य विसरले की काय? कंगना, नारायण राणे नंतर नवनीत राणा यांना मुंबई पालिकेने नोटिसा पाठविल्या. म्हणजे आहे त्या घरांमागे शुक्लकाष्ठ लावायचे आणि तिकडे महाराष्ट्र सदन बांधण्याच्या बाता करायच्याब! स्पेशल ट्रेन भरून इथून कार्यकर्त्यांची फौज अयोध्येत नेण्यात आली आणि मुख्यमंत्री म्हणतात कोरोना वाढतोय, काळजी घ्या. असा हा दुटप्पीपणा. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात आहेत आणि इकडे चौकशीला बोलावूनही अनिल परब साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले, असं चौकशीपासून पळायचं आणि नंतर भल्या पहाटे ‘ईडी’ने ताब्यात घेतलं की बोंबाबोंब सुरू करायची. एकूणच हा अयोध्या दौरा म्हणजे सेनेची हिंदुत्व सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड म्हणावी लागेल.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0