नवी दिल्ली: कंगालीच्या उंबरठयावर उभा असलेला पाकिस्तान आता त्याच्या जनतेला चहाचे सेवन 'कमी' करण्यास सांगत आहे. पाकिस्तानच्या नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी देशातील जनतेला याबाबत सांगितलं. चहाचे सेवन एक-दोन कपांनी कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सध्या पाकिस्तान चहाच्या उत्पादनासाठी, दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. इक्बाल यांनी सांगितले की पाकिस्तान जोपर्यंत चहाच्या उत्पादनात स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत लोकांनी अशा सर्व वस्तूंना वापरणं व त्यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
२०२१-२२ च्या आर्थिक वर्षात पाकिस्तानने परदेशातून ८३.८८ अब्ज किमतीचा चहा आयात केला होता. पाकिस्तानच्या मंत्र्यांचा हा विडिओ सोशल मीडियावर खूप वायरल झाला आहे. तर काही नागरिक या विषयाला अभिनंदन वर्धमान यांच्या घटनेशी जोडत आहेत. भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना २०१९ मध्ये पाकिस्तानमध्ये कैद करण्यात आले होते. पाकिस्तानी लष्कराने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनंदन वर्धमान म्हणाले की, त्यांना दिलेला चहा चांगला होता. नंतर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली होती.