तक्रार करूनही रेवदंड्यात कांदळवनाची कत्तल सुरूच

16 Jun 2022 16:18:09
 kandal
 
 
मुंबई(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील समुद्रालगतच्या ताराबंदर या गावात भराव टाकून कांदळवन नष्ट करण्यात येत आहे. कांदळवन कक्षाकडून या जागेचे सर्वेक्षण झाले असून अहवालात भराव टाकला गेला असल्याचेही समोर आले आहे. या बाबत अनेक तक्रारी करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
 
मुरुडच्या कोलमंडला गावातील किनाऱ्या लगतच्या कांदळवनांवर गेल्या महिन्यापासून भराव टाकण्यात येत आहे. ही जागा गट क्र.५४ असून शासकीय राखीव वन म्हणून सूचित आहे. या बाबतची तक्रार प्रतिक कनगी यांनी सर्व प्रथम दि. १० मे रोजी रेवदंडा पोलिसांकडे केली होती. यानंतर रेवदंडा पोलिसांनी ही जमीन महसूल खात्याच्या अखत्यारीत येत असून त्वरित कारवाई करता येणार नाही असे सांगितले. या कांदळवनालगत असलेल्या खासगी जमिनीच्या मालकांकडून हा भराव टाकण्यात येत आहे असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या बाबत तहसीलदार कार्यालयात तक्रार देण्यात आली आहे मात्र, कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. कारवाईला होणाऱ्या विलंबामुळे कांदळवनांची कत्तल आजही सुरू आहे. शासकीय यंत्रणा यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी पर्यावरण कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.
 
पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ या कायद्यानुसार कांदळवने ही 'अत्यंत संवेदनशील' या श्रेणीत अधिसूचित आहेत. तसेच कांदळवनाच्या ५० मीटर क्षेत्रात कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही. असे असताना अवैध कारभाराकडे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0