ऐश्वर्याचे स्वीकरण हेचि पाणिग्रहण!

16 Jun 2022 10:27:24

vaidik vivaha
 
 
 
 
गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं 
मया पत्या जरदष्टिर्यथास:।
भगो अर्यमा सविता पुरन्धिर्,
मह्यं त्वादुर् गार्हपत्याय देवा:॥
(ऋ.-१०.८५.३६),(अथर्व.-१४.१.५०)

भगस्ते हस्तमग्रभीत् सविता हस्तमग्रभीत्।
पत्नी त्वमसि धर्मणाहं गृहपतिस्तव॥
(अथर्ववेद-१४/१/५१)
अन्वयार्थ
   
 
 
वर म्हणतो-
१) हे देवी, मी (सौभगत्वाय) षड्विध ऐश्वर्य व सुसंतती इ. सौभाग्याच्या वृद्धीसाठी (ते) तुझ्या (हस्तम्) हाताला ग्रहण करतो. तू (मया) मज (पत्या) पतीसमवेत (यथा) अगदी यथाव्यवस्थितपणे (जरदष्टि:) जरावस्थेपर्यंत, म्हातारपणापर्यंत सुखाने (अस:) राहा. त्या (भग:) सकल ऐश्वर्याधिपती, (अर्यमा) न्यायदात्या, (सविता) सर्व जगाच्या उत्पत्तीकर्त्या, (पुरन्धि:) सर्वविधप्रकारे जगाला धारण करणार्‍या परमेश्वराने आणि (देवा:) या विवाहमंडपात जमलेल्या दिव्योत्तम विद्वान, ज्ञानी सुजनांनी गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पाडण्याकरिता (त्वा) तुला (मह्यं) माझ्यासाठी (अदु:) प्रदान केले आहे.
 
 
 
वर म्हणतो-
१) हे देवी, मी (सौभगत्वाय) षड्विध ऐश्वर्य व सुसंतती इ. सौभाग्याच्या वृद्धीसाठी (ते) तुझ्या (हस्तम्) हाताला ग्रहण करतो. तू (मया) मज (पत्या) पतीसमवेत (यथा) अगदी यथाव्यवस्थितपणे (जरदष्टि:) जरावस्थेपर्यंत, म्हातारपणापर्यंत सुखाने (अस:) राहा. त्या (भग:) सकल ऐश्वर्याधिपती, (अर्यमा) न्यायदात्या, (सविता) सर्व जगाच्या उत्पत्तीकर्त्या, (पुरन्धि:) सर्वविधप्रकारे जगाला धारण करणार्‍या परमेश्वराने आणि (देवा:) या विवाहमंडपात जमलेल्या दिव्योत्तम विद्वान, ज्ञानी सुजनांनी गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पाडण्याकरिता (त्वा) तुला (मह्यं) माझ्यासाठी (अदु:) प्रदान केले आहे.
 
 
 
२) हे प्रिये! (भगः) सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण असलेला मी (ते) तुझ्या (हस्तम्) हाताला (अग्रभीत्) ग्रहण केले आहे, पकडले आहे. तसेच (सविता) धर्मयुक्त मार्गाने चालण्याकरिता प्रेरित झालेला मी (ते) तुझ्या (हस्तम्) हाताला स्वीकारत (स्वीकारले) आहे. आजपासून (त्वम्) तू (धर्मणा) धर्माने माझी (पत्नी) पत्नी, भार्या, जीवनसंगिनी आहेस, तर (अहम्) मीसुद्धा (धर्मणा) धर्माने (तव) तुझा (गृहपति:) पती, भर्ता आहे. (वधूदेखील असेच म्हणते.) आपण दोघे मिळून घर, समाज व राष्ट्राच्या कर्तव्यांकरिता सिद्ध, तत्पर होऊया !
 
 
 
विवेचन
 
 
मानवी जीवनात प्रगती साधण्याचे प्रमुख साधन जर कोणते असतील, तर ते म्हणजे हात. सकल ऐश्वर्य मिळविण्याकरिता साहाय्यभूत ठरणारे हे मोलाचे कर्मेन्द्रिय. याच हातांच्या माध्यमाने मानव इहलोकीची सर्व कामे पूर्णत्वास नेतो. हाताकरिता शब्दकोशात कर, हस्त, पाणि:, पंचशाख, शय: अशी विविध नावे आली आहेत. यातीलच आलेला एक पर्यायवाची शब्द म्हणजे पाणि:. एखादी सुपरिचित वा चांगली व्यक्ती भेटली किंवा प्रेमळ वाटणारा अनोळखी माणूस भेटला की आपण कसे आनंदाने लगेच हातात हात देतो. विशेष म्हणजे, हे हस्तांदोलन घडते ते उजव्या हातांचे. कारण, उजवा हात हा प्रत्येक कार्यासाठी अत्यंत साहाय्यभूत ठरणारा असतो. जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की, ’हा माझा उजवा हात आहे’ म्हणजेच तो माणूस माझ्याकरिता खूपच जवळचा, कामी येणारा, मदत करणारा किंवा अत्यंत विश्वासू सहयोगी आहे. तसेच हाताच्या बाबतीत आहे. उजवा हात हातात घेणे म्हणजेच प्रत्येक शुभकार्यासाठी हात पुढे करणे होय. हे हस्तांदोलन म्हणजे प्रेम व आनंदाचे प्रतीक मानले जाते. यापुढे आमची मित्रता प्रारंभ होत आहे, आमच्या सख्यभावना वृद्धिंगत होत आहेत, अशी भावना यातून व्यक्त होते. यालाच हिंदीमध्ये ’हात मिलाना!’ किंवा आंग्लभाषेत ’शेक् हॅण्ड्स’ असे म्हणतात. हस्तांदोलनाची ही अतिप्राचीन व विशेष करून मुळात भारतीय आहे. हातात हात देण्याचे म्हणजेच हस्तग्रहणाचे मूळ वेदात आहे. यासाठीच वरील मंत्र म्हणजे प्रत्यक्ष पुरावा होय. मंत्रात आलेला ’पाणिग्रहण’ हा वैदिक शब्द पाश्चात्य संस्कृतीच्या ’शेक् हॅण्ड्स’च्या विचारप्रवाहाला मागे टाकणारा आहे. वैदिक विवाह संस्काराचे दुसरे नाव म्हणजे पाणिग्रहण संस्कार! खरेतर विवाहाची मूलभूत सुरुवातच या पाणिग्रहणाने होते.
 
 
 
या विधीत एकूण सहा मंत्रांचा विनियोग होतो. यांपैकी पहिल्या वरील दोन मंत्रांच्या आधारे पाणिग्रहणाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया. समग्र विश्वाचा निर्माता परमेश्वर, अग्निदेवता आणि विवाह मंडपात मोठ्या संख्येने जमलेल्या जनसमूहाच्या साक्षीने वर व वधू हे एक-दुसर्‍यांचा हात ग्रहण करतात. वाड्.निश्चय विधीत वाणीचे ग्रहण केल्यानंतर विवाहेच्छुक वर-वधू आता प्रत्यक्ष उजव्या हाताने परस्परांना स्वीकारत आहेत. ब्रह्मचर्य आश्रमात असताना प्रयत्नपूर्वक चारित्र्याची जपणूक करीत स्वतःला सर्वदृष्टीने सांभाळणारे हे युवक-युवती आता एक दुसर्‍याला पती-पत्नी म्हणून प्रतिज्ञापूर्वक ग्रहण आहेत. वर वधूसमोर उभे राहून आपल्या उजव्या हाती तिचा उजवा हात घेतो. डाव्या हाताने वधूच्या डाव्या हाताच्या कोपर्‍याला स्पर्श करीत उचलून धरतो. याकरिता वराला थोडेसे खाली झुकावे लागते. हे खाली झुकणे म्हणजेच नम्र होणे होय. इथे पुरुषाचा स्त्रीसमोर अवमानित होण्याचा कमीपणा मुळीच मानला जात नाही. आपली होणारी पत्नी म्हणजे साक्षात् गृहलक्ष्मी! घरादाराची सुषमा वाढविण्याचे आणि सर्व प्रकारची ऐश्वर्यसंपन्नता वृद्धिंगत करण्याचे कार्य घडते ते पत्नीमुळे, म्हणजेच तिच्या आगमनप्रसंगी वराने तिच्यासमोर थोडेसे नमले किंवा झुकले तर एक प्रकारे लक्ष्मीचे विनयपूर्वक स्वागतच झाले समजा. वरील मंत्रात हे पाणिग्रहण कशासाठी? याची मीमांसा करताना चिंतनशील ऋषींनी विवाहाचा कृतिशील आराखडाच समोर ठेवला आहे. वधू किंवा वराचा हात ग्रहण करण्याचा उद्देश म्हणजे सौभाग्याची प्राप्ती. म्हणूनच तर आरंभी म्हटले आहे- गृभ्णामि (गृह्णामि) ते सौभगत्वाय हस्तम् । आम्ही दोघेही वर-वधू परस्परांना सर्व प्रकारचे सौभाग्य, सुख व आनंद लाभो, यासाठी एक दुसर्‍यांचा हात ग्रहण करीत आहोत. एकदा हात हाती घेतला की, हे दोघे ही एक दुसर्‍यांचे एकनिष्ठ झाले समजा. विश्वासपात्र बनून जिवलग मित्र बनले. एक दुसर्‍यांना आधार देत उभे करण्याची पवित्र भावना यामुळे वाढीस लागते. विशेष म्हणजे, केवळ भाग्य नव्हे, तर सौभाग्य वाढते. सु ’भाग्य’ हे केवळ या नवदाम्पत्याचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे, समाजाचे व राष्ट्राचेदेखील. ’भग’ या शब्दाचे विविध अर्थ होतात. अग्निपुराण (६.५.७४) शास्त्रात ’भग’ शब्दाचे सहा अर्थ वर्णिले आहेत.
 
 
 
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रिया:।
ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां इतीरणा॥
 
 
 
म्हणजेच सर्व प्रकारचे ऐश्वर्य, धर्मभावना, यश-मान-कीर्ती, श्री, ज्ञान-विज्ञान आणि वैराग्य या सहा बाबींना ’भग’ असे म्हणतात. नव्या वधूचा घरी प्रवेश होणे, म्हणजे साक्षात वरील सहा सौभाग्याचे लेणे अवतरणे होय. याचबरोबर वधूच्याही जीवनात वराच्या पदार्पणाने सौभाग्याचे आगमन होणे होय. पती-पत्नी दोघांनीही मिळून घरात सुखा-समाधानाने, आनंदाने आणि धर्मपूर्वक अर्थ प्राप्त करीत जगणे आणि कुटुंबीयांची श्रद्धा नि सेवा व संगोपन करणे म्हणजेच सौभाग्याचा उदय होणे.
 
 
 
याप्रसंगी पुढे हे वर-वधू म्हणतात-
मया पत्या/ पत्न्या जरद् अष्टिर् यथास:।
 
 
 
आम्ही दोघेही वृद्धापकाळापर्यंत सोबत राहू. सर्वांच्या साक्षीने पकडलेला हा हात कधीही न सुटणारा असेल. हे पाणिग्रहण जीवनाच्या अंतापर्यंत अभेद्य व अभंग राहणार. केवळ काही वर्षांसाठी नव्हे? मनभेद किंवा मतभेद कितीही झाले, तरी आम्ही पत्नी-पती कधीही वेगळे होणार नाहीत. एकदा पकडलेला हात आता वेगळा होणार नाही. आमचे हे मंगलमय नाते जीवनाच्या अंतापर्यंत आहे. सर्वांच्या साक्षीने घडलेले हे हस्तांदोलन कोणत्याही परिस्थितीत, कितीही दुःखे व संकटे आली, तरी आता वेगळे होणारच नाही. पती-पत्नीचे हे नाते जसे तारुण्यावस्थेत किंवा प्रौढावस्थेत, तसेच ते वार्धक्यावस्थेतदेखील! आम्ही वानप्रस्थ आश्रमातदेखील अगदी आनंदात एक दुसर्‍याची काळजी घेत शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्टीने आरोग्यसंपन्न बनून राहूत. वैदिक विवाह संस्काराच्या पवित्र बंधनाची खरोखरच किती मोठी पराकाष्ठा आहे!
मंत्राच्या शेवटी हे दोघेही म्हणतात म्हणतात - ...मह्यं त्वादुर् गार्ह पत्याय देवा: ।
 
 
 
आम्हा दोघांची पती-पत्नी म्हणून निवड करणारे कोण कोण आहेत? आम्ही दोघांनी लपूनछपून किंवा चोरून एक दुसर्‍यांना वरले नाही. केवळ बाह्य आकर्षणाने आम्ही आम्ही एकत्र आलो नाहीत. आमचे एकत्र येणे, हे इतरांच्या साक्षीने, मदतीने व प्रयत्नाने. म्हणून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आम्हा वर-वधूंचे कर्तव्य आहे. आम्हा दोघांचे ऋणानुबंध जोडणारा सर्वात प्रथम तो महान ईश्वर होय. तो सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने परिपूर्ण असा ’भग’, न्यायकारी असल्याने तो ’अर्यमा’, सकल मानवाची निर्मिती करणारा तो ’सविता’ आणि समग्र विश्वाला धारण करणारा असल्याने ’पुरंधि’ परमेश्वर ! त्या भगवंताच्या कृपेमुळेच आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र येत आहोत. पण, या कार्यात समाजातील प्रतिष्ठित वडीलधारी मंडळी, जे की आज इथे या विवाह मंडपात आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत, असे माता-पिता व श्रेष्ठ सुजन, या सर्वांमुळे आज ही नवगृहाश्रम व्यवस्था झाली आहे. म्हणूनच यापुढे या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पार पाडत जगले पाहिजे.
पुढे दुसर्‍या मंत्रात वर म्हणतो-
 
 
 
हे ऐश्वर्यसंपन्न देवी, मी तुझा हात ग्रहण करीत आहे. पण हे माझे हे हातात हात घेणे कशासाठी ? तर धर्मकार्यासाठी! तसेच वधूदेखील म्हणते- मी आपला हात धार्मिक कार्यासाठीच स्वीकारत आहे. म्हणजेच या पुढे आम्ही दोघे ही केवळ पती-पत्नी नसून ’धर्मपती व धर्मपत्नी’ आहोत. आपल्या दोघांचे वैवाहिक जीवन हे केवळ कामोपभोगासाठी नव्हे, तर पवित्र धर्मकार्यासाठी असेल. कोणतेही कार्य करताना आम्हा नवदाम्पत्याचे नाते हे धर्माशी जोडले गेले पाहिजे. अधर्मापासून दूर राहत नेहमी श्रेष्ठ व पवित्र कार्यात अग्रेसर राहणे, हेच खरे जीवन होय. पाणिग्रहण विधीतील अन्य चार मंत्रातील भावदेखील असाच अतिशय उदात्त व हृद्य आहे. वैदिक पाणिग्रहणाचा हा उच्च दृष्टिकोन आजकालच्या नवदाम्पत्यांनी जीवनात उतरवला तर निश्चितच त्यांचे वैवाहिक जीवन सर्वदृष्टीने सुंदर, सुखी व समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
 
९४२०३३०१७८
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
Powered By Sangraha 9.0