राहुल गांधींना न्यायालयाची चपराक; ‘ट्रान्सफर अ‍ॅप्लिकेशन’ फेटाळले

15 Jun 2022 11:18:45

RG
 
 
 
 
 
ठाणे : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या गंभीर आरोपावर आक्षेप घेऊन संघाचे विवेक चंपानेरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व माकपचे सीताराम येचुरी यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात एक रुपयाचा मानहानीचा दावा दाखल केला होता. सदर दावा ‘ट्रान्सफर’ करण्याच्या प्रक्रियेसाठी राहुल गांधी यांनी ठाणे न्यायालयात वकिलाच्या माध्यमातून अर्ज दाखल केला होता. ठाणे न्यायालयाचे मुख्य जिल्हा न्यायाधीश ए. जे. मंत्री यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अर्ज म्हणजे नसता खटाटोप असल्याची टिप्पणी करून ‘ट्रान्सफर अ‍ॅप्लिकेशन’ फेटाळले.
 
 
 
न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधींना एकप्रकारे चपराक बसल्याचे मानले जात आहे. पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर, २०१७ रोजी हत्या झाली. या हत्येबाबत राहुल गांधी आणि येचुरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले होते. त्या विरोधात चंपानेरकर यांनी गांधी आणि येचुरी यांच्यावर ठाणे दिवाणी न्यायालयात एक रुपया मानहानीचा दावा दाखल करून, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरूद्ध बोलण्यास मनाई करावी, अशी मागणी केली होती.
 
 
 
यासंदर्भात मानहानीचा दावा बदलण्याच्या प्रक्रियेसाठी केलेला अर्ज (ट्रान्सफर अ‍ॅप्लिकेशन) फेटाळण्यात आला. जिल्हा मुख्य न्यायाधीश ए. जे. मंत्री यांनी राहुल गांधी यांच्या अर्जावर आपले मत व्यक्त करीत दाव्याला प्रलंबित करण्यासाठी राहुल गांधी यांनी हा केलेला खटाटोप असल्याचे सांगत अर्ज फेटाळला, अशी माहिती विवेक चंपानेरकर यांचे वकील अ‍ॅड. आदित्य मिश्रा यांनी दिली.
 
 
 
अखेर सत्याचा विजय...
 
दरम्यान, न्यायालयीन निर्णयावर याचिकाकर्ते विवेक चंपानेरकर म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नाहक आरोप करून संघाची बदनामी करणार्‍यांना ही चपराक आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून अखेर सत्याचा विजय झाला. किंबहुना एकप्रकारे संघाच्या विचारांचाच हा विजय आहे.”
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0