चिपळूणचा अनोखा सरकारी पाहुणा

15 Jun 2022 11:52:17
Khavle11
 
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): जंगलाला लागून असलेल्या चिपळूण तहसील कार्यालय परिसरात काल दि. १४ जून रोजी एक खवले मांजर आढळून आले. वन विभागाने हे खवले मांजर ताब्यात घेऊन त्याची नैसर्गिक अधिवासात सुखरूप सुटका केली.
 
चिपळूण तहसील कार्यालयाच्या परिसरात काल दि. १४ जून रोजी रात्री एक खवले मांजर आढळून आले. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत चिपळूण पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्वरित वन विभागाला पाचारण केले. चिपळूण वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी हे खवले मांजर वन विभागाच्या ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी नंतर या खवले मांजराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
 
ग्रामस्थांनी वेळीच वनविभागास माहिती दिल्याने खवले मांजराचा जीव वाचला. कोकणात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने खवले मांजराची तस्करी सुरू आहे. यासंबंधीची प्रकरणेही सातत्याने समोर येत आहेत. खवले मांजरांची तस्करी करणारे दलाल ग्रामस्थांना पैशांचे आमिष दाखवून या प्राण्याची शिकार करवून घेतात. वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात खवले मांजरांना मोठी मागणी आहे. मात्र, भारतीय 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत खवले मांजरांना संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांची शिकार, व्यापार, तस्करी आणि वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे.
Powered By Sangraha 9.0