मुंबई: राज्यसभेनंतर आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चाना उधाण आले आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील बऱ्याच पक्षांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. मात्र मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी "मी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही." असे उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितले.
शरद पवारांच्या या विधानावरून भाजप नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. निलेश राणे ट्विटमध्ये म्हणतात की, "पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत. ते म्हणतील तुम्हाला, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग जिंकायची गरज काय? आजपासून तुम्ही राष्ट्रपती."
महाराष्ट्रातील काही घटक पक्षांनीदेखील पवार राष्ट्रपती झाल्यास तो महाराष्ट्राचा सन्मान असेल असे म्हटले होते. पण युपीएकडून नाव चर्चेत असताना आता खुद्द शरद पवार यांनी माघार घेतली आहे.