कोविड’ महामारीच्या काळात जे धक्के बसले, त्यामध्ये तरुणांना बसलेल्या धक्क्यांचा विशेष विचार करणे देखील क्रमप्राप्त ठरते. कारण, ही पिढी देशाचे भविष्य खांद्यावर घेऊन चालणारी पिढी आहे. या काळात केवळ त्यांच्या नोकर्या, रोजगार आणि व्यवसायावरच विपरीत परिणाम झाला नाही, तर त्यांचे शिक्षण व प्रशिक्षणही बर्याच प्रमाणात विस्कळीत झाले. या सगळ्याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होऊ लागले.
या महामारीच्या प्रारंभीपासून, पहिल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात सहापैकी एका युवकाला काम थांबवावे लागले. ज्यांनी धीर एकवटून काम सुरु ठेवले, त्यापैकी जवळजवळ ४२ टक्के लोकांचे उत्पन्न बर्याच प्रमाणात घटले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, या महामारीच्या आरंभापासूनच जगातले ७० टक्क्यांहून अधिक तरुण जे प्रत्यक्ष अभ्यास करतात किंवा व्यवसायाला अभ्यासाची जोड देतात, त्यांच्यावर शाळा, कॉलेज, विद्यापीठ वा तांत्रिक प्रशिक्षण केंद्रे बंद पडल्यामुळे विपरीत परिणाम झाला आहे.
जगातील १६ टक्के लोकसंख्या ही १५ ते २४ वयोगटातील म्हणजे तरुणांची आहे, जी एकंदरीत कार्यरत असलेल्या वयोगटातील लोकसंख्येच्या जवळपास २५ टक्के आहे. तरुणांची कौशल्ये विकसित करणे, ही सर्व राष्ट्रांसाठीच अत्यावश्यक बाब आहे. याकडे यशस्वीपणे लक्ष द्यायचे म्हटल्यास आपण या विषयाकडे विशेषत: महामारीचा तरुणांवर झालेल्या विनाशकारी सामाजिक व आर्थिक परिणामाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
आपला भारत देश सर्वात तरुण देशांपैकी एक असल्याने त्याच्या उच्च लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा फायदा घेण्यासाठी पुढची काही वर्षे उत्सुक आहे. २०२० साली जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल कौशल्य परिषदेत आपले विचार मांडताना युवकांनी कौशल्य पुनर्कुशलता वृद्धिंगत करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांनी पुढे असेही अधोरेखित केले की, एखाद्या व्यक्तीसाठी त्यांनी स्वावलंबी बनण्यात आणि आपली स्वयंरोजगाराची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कौशल्ये अत्यंत महत्त्वाची अशी सकारात्मक भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे इतर देशांत आणि ’युनायटेड नेशन्स’ही सर्व भागधारकांना युवकांसाठी कौशल्य कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित करते. जगात शाश्वत विकास उद्दिष्टांच्या धोरणांमध्ये जी पूर्ती करायची असेल, तर हे युवकांसाठी कौशल्य कार्यक्रम लक्षणीय उरतात. यामुळे आर्थिक वाढ आणि योग्य काम या बरोबरच ‘शून्य भूक’ परिस्थिती व चांगले आरोग्य समाजाला मिळू शकेल.
तथापि, महामारीच्या काळात आपण पाहत आहोत की, जगभरातील अर्थव्यवस्था त्रस्त झाल्या आहेत. याचा परिणाम केवळ रोजगाराच्या संधी तरुणांसाठी कमी झाल्यात, इतक्यापुरता मर्यादित नाही; तर शैक्षणिक व कौशल्य विकास कार्यक्रमांच्या वितरणात आणि अंमलबजावणीतही व्यत्यय निर्माण झाला आहे. श्रमिक बाजारपेठेत प्रवेश आणि नोकर्यांमधील संक्रमणदेखील खूप आव्हानात्मक बनले आहे. ‘डिजिटल प्रगती’ हा कोरोना काळातील सकारात्मक विकासाचा पाया मानला जातो. पण, आपल्याला यामध्ये जे ‘डिजिटल विभाजन’ दिसून येते, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. उच्च उत्पन्न असलेल्या विकसित देशांमधील ६५ टक्के तरुण ऑनलाईन शिकत होते. ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा फायदा या श्रीमंत तरुणांना मिळत असताना कमी उत्पन्न असलेल्या अविकसित देशांमधील केवळ १८ टक्के युवक ऑनलाईन अभ्यास करू शकले.
आतापर्यंतच्या जागतिक माहितीनुसार, ३८ टक्के तरुण त्यांच्या भविष्यातील करिअरबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यातच श्रमिक बाजारपेठेत आणखी अडथळे निर्माण होण्याची चिन्हेदेखील दिसत आहेत. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये श्रीलंका, तर आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात आहे. त्यांनी दिवाळखोरी जगजाहीर केली आहे. शेजारी पाकिस्तान व बांगलादेशही मोठ्या महागाईने त्रस्त आहेत. आपल्या देशातही महागाई हळूहळू वाढू लागली आहे. यातच महामारीमुळे केवळ आरोग्य क्षेत्रच नाही, तर आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील परिणामांना सामोरे जाण्यासाठी देशांच्या अधिकृत खर्चात लक्षणीय वाढ होते. उद्योग आणि वाणिज्य मंदावल्यामुळे सरकारी उत्पन्नात प्रचंड घटही नोंदवण्यात आहे. या सर्वांचा सर्वाधिक परिणाम तरुणांच्या प्रगतीवर आणि भविष्यावर होत जातो. हा अत्यंत अभद्र आणि निराशाजनक अनुभव असतो. शिक्षण संपल्यानंतरचा पुढचा काळ हा तरुणांना आपले वैयक्तिक आणि आर्थिक भविष्य घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ आहे. या मधल्या काळात तरुण पिढी प्रचंड कष्टांतून आणि मानसिक तणावातून जात आहे. सामान्यत:सुद्धा हा कठीण काळ असतोच, पण महामारीच्या काळात हा आत्यंतिक क्लेषकारक काळ ठरला आहे, यात शंका नाही.
- डॉ. शुभांगी पारकर