राजस्थान सरकारचे ‘टार्गेट हिंदू’

14 Jun 2022 10:33:53

kk
 
 
राजस्थानमधील करौलीत २ एप्रिलला हिंदू नववर्षाच्या मिरवणुकीमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. मुस्लीम जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात अनेक हिंदू कार्यकर्ते व काही पोलीस कर्मचारी जखमीही झाले. पोलिसांनी ‘एफआयआर’मध्ये दोन्ही पक्षांना आरोपी केले खरे; पण अनेक जण तुरूंगातून फरार झाले व काही अजूनही फरार आहेत. ही मिरवणूक सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच काढण्यात आली. मात्र, तरीही मिरवणुकीवर हल्ला झालाच! धक्कादायक बाब म्हणजे, या हल्लेखोरांमध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश होता. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘एफआयआर’मध्ये ८० पैकी ६० ते ७० हिंदू तरुणांची नावे आहेत. त्यामुळेच कुठेतरी एकतर्फी कारवाई होत असल्याचा आरोप होताना दिसतो. अनेकजण २० ते २२ या वयोगटातील आहेत. त्यातील अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट असून, काहींना शैक्षणिक नुकसानालाही सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, ‘एफआयआर’मध्ये आंदोलन शांततेत चालू असल्याचे म्हटले गेले.
 
 
मात्र, प्रत्यक्षात हिंदू तरुणांना या प्रकरणात गोवले जात आहे. ज्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याचा प्रताप राजस्थान पोलिसांनी केला. गुन्हा केलेला नसतानाही ‘एफआयआर’मध्ये नाव गोवल्याने अनेक हिंदू तरुण घर सोडून गेले. एकूणच ही परिस्थिती पाहता, हिंदू तरुणांना ‘टार्गेट’करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे षड्यंत्रच रचले जात आहे. पण, राजस्थान सरकार मात्र मूकदर्शक बनून आहे. नुकतेच चिंतन शिबिराच्या जंजाळातून बाहेर पडल्यानंतर राज्यसभा निवडणुकीतील विजयाच्या टिमक्या वाजवण्यात गेहलोत सरकार सध्या व्यस्त आहे. इनमीन काही राज्यांमध्ये काँग्रेस शिल्लक राहिली असून, राजस्थान त्यापैकीच एक राज्य. राजस्थानचा राजकीय तिहास पाहता, याठिकाणी आलटून पालटून काँग्रेस-भाजपची सत्ता येत असते. त्यानुसार भाजपनंतर काँग्रेस सत्तेत आली खरी, मात्र कधी नव्हे ते राजस्थान काँग्रेसने क्रूर मुखवटा धारण करत हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, हे फार काळ चालेल आणि आपली सत्ता टिकेल, हे काँग्रेसचे दिवास्वप्न आहे. येत्या काळात या दिवास्वप्नाला हिंदू एकजुटीने उद्ध्वस्त करतील, यात काही शंका नाही.
 
 
राष्ट्रपतीपद आणि पवार...
 
 
 
पंतप्रधानपदासाठी कित्येक दशकांपासून आस लावून बसूनही पवारसाहेबांना मिळाली ते केवळ हुलकावणी. इटलीच्या रागापायी नवा संसार मांडला आणि सत्तेची फळेही चाखली. मात्र, कधीही आमदारांची शंभरी गाठता आली नाही. मात्र, तरीही त्यांनी राजकीय चाणक्याची पदवी कुठलाही अभ्यास न करताच पदरात पाडून घेतली. अनेकदा पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारांच्या नावांची वावटळ उठते, त्यात साहेबांचे नाव नित्यनेमाने अग्रक्रमावरच. मात्र, तितक्यात नरेंद्र मोदी नावाचे वादळ या वावटळीला कुठल्या कुठे पिटाळून लावते. असो. आता देशाला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वेध लागले असून, पुढील महिन्यात देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे साहजिकच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून त्यात साहेबांचे नाव तरी कसे मागे राहील म्हणा! तिकडे ‘जळता बंगाल’च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरातील विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री आणि प्रमुखांना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रित केले. यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचेही नाव होते. मात्र, राज्यसभा निवडणुकीतील दारूण पराभव पचवणे जड जात असल्याने त्यांनी त्याला नकार दिला असावा कदाचित. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची या बैठकीत चाचपणी केली जाणार आहे. यासाठी शरद पवार यांचे नाव पुढे आहे.
 
 
विशेष म्हणजे, शरद पवार या बैठकीसाठी उपस्थितही राहणार आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही लागलीच शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, तर काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असल्याचे म्हटले. त्यातच राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार झाल्यास ती आनंदाची आणि गर्वाची बाब असेल असे म्हटले आहे. परंतु, ज्या गोष्टी कधीही शक्य नाही, त्यासाठी पवारांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राष्ट्रपतीपद हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाइतके सोपे वाटले का? की दगाफटका केला आणि मिळवलं. चार-पाच खासदारांच्या बळावर ना देशाचा पंतप्रधान होता येतं ना राष्ट्रपती. त्यामुळे विरोधकांकडून केवळ एक नामधारी चेहरा म्हणून या पदासाठी पवारांचे नाव पुढे केले जात आहे, हे नक्की.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0