हारा हुआ बिलंदर!!!

12 Jun 2022 21:02:45
 
 
sharad pawar and sanjay raut
 
 
 
 
हुश्श...! झालो एकदाचा खासदार! नाकीनऊ आणले आहे ‘कमळ’वाल्यांनी. इतकी धाकधूक होती की, विचारता सोय नाही. संजय पवार की राऊत, राऊत की पवार असे सगळे म्हणत होतेच. कसाबसा वाचलो. आता कसं पुन्हा मन मानेल तसे बोलायला मोकळा ना! काय आहे? साहेब म्हणाले आहेत, ते दिल्लीचे राजे म्हणजे पंतप्रधान झाले की, मी महाराष्ट्राचे तख्त सांभाळणार. शूऽऽ मी असे बोलतो हे कुणाला सांगू नका. कारण, काल-परवाच मोठ्या ताई म्हणाल्या की, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर त्या देवीचे दर्शन घेतील. मी तर उघडउघड राष्ट्रवादीमध्ये नाही ना? रडतखडत का होईना खासदार झालो ते वांद्य्राच्या साहेबांच्या कृपेने. त्यामुळे खाल्ल्या मिठाला वरवर तरी जागले पाहिजे. पण ताईंची इच्छा देवीला पूर्ण करायची असेल, तर मग मला घड्याळाच्या काट्यानुसार चालायला हवे, पण सध्या बाणाच्या टोकावर आहे मी. जाऊदे. कधी नव्हे, ते राज्यसभेचीसुद्धा निवडणूक असते, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले. मी खूप विचार केला, असे का व्हावे? माझ्यासारख्या ‘वन मॅन शो’ असलेल्या आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनवणार्‍या सर्वोच्च कोटीच्या नेत्याबाबत असे का व्हावे? माझ्यासारखा मीच आहे. गुणवान, बुद्धिमान आहे मी. माझी थोरवी मी किती सांगू? मला या देशातले या जगातले सगळे कळते. मी खूप खूप महान आहे. काय म्हणता मी संधीसाधू आहे? माझ्या मुळच्या पक्षाची वाताहत करण्याचे सगळे सौजन्य माझ्याकडे जाते? जनतेतून निवडणूक लढवली, तर मला माझी लोकप्रियता कळेल? हे बघा दरवेळी मी सांगतो, असं बोलून तुम्ही माझा आणि माझा म्हणजे सगळ्या मराठी माणसाचा, सगळ्या महाराष्ट्राचा अपमान करू नका. अफझलखान आहात तुम्ही. काय म्हणता, हाच माझा घातक स्वभाव? असू द्या राजकारणात चांगलं करणार्‍यांपेक्षा वाईट करू शकणार्‍यांचेच भले केले जाते. ‘तेरी भी चूप मेरी भी चूप.’ तसेच आमच्या शरद पवार साहेबांचे लाडके जितूभाऊ म्हणालेच ना, ‘हमाम में सब नंगे होते हैं।’ मी नंगा माणूस आहे. काय म्हणता, या नंगेपणामुळेच माझी नैतिक हार झाली? असू दे. तुम्ही त्या देवेंद्रला ‘जो जिता वही सिंकदर’ म्हणता का? माझ्याकडे पाहा, ‘हारे तो भी सिंकदर’ आहोत. काय म्हणता बिलंदर आहे मी? हारा हुआ बिंलदर?
 
 
 
भावी राष्ट्रपती
 
 
 
भावी पंतप्रधान, भावी पंतप्रधान असे गेली कित्येक वर्षे लोकांकडून म्हणवून घेताना मला पहिल्यांदा काही वर्षे चांगले वाटायचे. पण आता भावी पंतप्रधानांच्या ‘कॅटेगरी’साठीसुद्धा रांगा लागल्यात. आमचे वांद्य्रातील पुतणे, दिल्लीच्या मॅडम आणि त्यांचे राजकुमार, त्या प. बंगालच्या दीदी सगळेच. त्यांना कळतच नाही की, मी सिनिअर आहे. ‘भावी’चा मान मलाच मिळायला हवा. ते सुख पण त्यांना बघवत नाही. इथेही घुसखोरी करायला आलेत. वांद्य्राच्या पुतण्याच्या माणसांनी तरी समजून घ्यावे? माझ्या कृपेने राज्यात बसलेत आणि वर स्वप्न दिल्लीच्या तख्ताची. राज्यसभेची निवडणूक लढताना कळलेच असेल, दिल्लीचे पाणी पिण्यासाठी काय आगीच्या तोफांना सामोरे जावे लागते ते. हा तर एक ‘ट्रेलर’च असतो. देशभरात पंतप्रधानकीचा चेहरा बनण्यासाठी तेवढे कर्म किंवा तेवढे किडेतरी स्वभावात असायला लागतात. यांना कोण सांगणार? जाऊ दे. मला काय मी गंमत बघतो. इतकी दशकं राजकारणात पहिलवानकी केली. आता मात्र थांबायचे ठरवतो. पंतप्रधान नको. मला राष्ट्रपती व्हायचे आहे.तसेही पंतप्रधान मोदींनी स्वत: कबूल केले की ते माझे शिष्य आहेत. देशाचे पंतप्रधान मला गुरू मानतात, तर मला राष्ट्रपती होण्याचा हक्क आहेच. काय म्हणता, पंतप्रधान मोदी विनयाने आणि मला मान देण्यासाठी असे म्हणाले होते? मग काय झाले? मला राष्ट्रपती व्हायचे आहे, म्हणजे आहे. किती दिवस मी ‘भावी पंतप्रधान’ राहू? काय म्हणता राष्ट्रपती होण्यासाठी मला भाजपची साथ घ्यावी लागेल आणि भाजप माझ्या मते, जातीयवादी, मनूवादी आहे? छे! छे! काहीही. राजकारणात मला जो नेता बनवेल, जो जिंकून देईल, ते पुरोगामी आणि तेच खरे मानवतावादी. भाजपची साथ मिळाली, तर भाजपसारखा श्रेष्ठ पुरोगामी पक्ष नाही. काय म्हणता मी स्वत:ला ‘देवाचा बाप’ म्हणून वरतून लोकांना ‘साल्यांनो’ म्हटले म्हणून जनमत माझ्या विरोधात आहे? काय म्हणता मी कधीच पंतप्रधान आणि राष्ट्रपती होऊ शकत नाही? असू दे. मी ‘किंग मेकर’ आहे. आता मला ‘क्विन मेकर’ व्हायचे आहे. कारण, प्रत्येक मुलगी ही तिच्या बापाची राजकुमारीच असते. त्यामुळे मला सुप्रियासाठी ‘क्विन मेकर’ व्हायचे आहे. पण सध्यातरी ‘भावी राष्ट्रपती’चा ‘फील’ आहे, त्याचे सुख घेऊ द्या...
 
Powered By Sangraha 9.0