पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी हे आमंत्रण स्विकारले असून १४ जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूनगरीत पहिल्यांदाच दाखल होणार आहेत. यामुळे या कार्यक्रमाची आता देहू संस्थांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे.
आचार्य तुषार भोसले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक १४ जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत."
देहू हे १७ व्या शतकातील संत तुकारामांचे जन्मस्थान आहे. तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील पंढरपूर विठ्ठल मंदिरात पायी जाणाऱ्या संत तुकारामांच्या भक्तांशी संवाद साधणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील वारकरी, दिंड्या उपस्थित राहणार आहेत. जवळपास ३०-४० हजार जणांचा समुदाय कार्यक्रमास येणार असल्याचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितले.