सह्याद्रीतून नव्या मांसाहारी गोगलगाईचा शोध!

12 Jun 2022 14:53:16
snail 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम घाटातून एका नव्या मांसाहारी गोगलगाईचा शोध लावण्यात आला आहे. ही महाराष्ट्रातील मांसाहारी गोगलगाईंची तिसरी प्रजाती आहे. या बाबतचा शोध निबंध नुकताच पीअर-रिव्ह्यू केलेल्या इंटरनॅशनल जर्नल "मोलस्कॅन रिसर्च" मध्ये ऑनलाइन प्रकाशित झाला आहे.
 
 
ही गोगलगाय जाती प्रदेशनिष्ठ आहे. सह्याद्रीत वसलेल्या विशाळगड संवर्धन राखीव मधील शाहूवाडी तहसील येते आढळते. पश्चिम घाटातील उत्तरेकडील भागातील प्रजातींच्या प्रकारानुसार या प्रजातीचे नाव देण्यात आले आहे. गोगलगाईंची 'हॅप्लोप्टिचियस' प्रजाती प्रथमच भारताच्या मुख्य भूमीवरून नोंदविली गेली आहे. इतर सर्व 'हॅप्लोप्टिचियस' प्रजाती आग्नेय आशियाई भागातून नोंदवल्या गेल्या आहेत. नव्याने सापडलेली हॅप्लोप्टिचियस सह्याद्रिएन्सिस तिच्या अद्वितीय प्रजनन प्रणालीमुळे ही इतर हॅप्लोप्टिचियस प्रजातींपेक्षा वेगळी आहे. या गोगलगाईच्या शंखाचा रंग फिकट पिवळा आहे. ही प्रजाती मांसाहारी असून, छोटे कीटक हे तिचे खाद्य आहे. ही प्रजाती जमिनीवर पडलेल्या पानांवर, झाडाच्या बुंध्याजवळ आणि लहान ओल्या खडकांवर आढळून आली. तसेच काँक्रीटने बांधलेल्या रस्त्यावरील गतीतोधकांवर देखील आढळून आली.
 

snail1 
 
याबाबतचा शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा शोध निबंध कराडचे अमृत भोसले, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे आणि मेढ्यातील ओमकार यादव या युवा संशोधकांनी लिहला आहे. हा शोध उत्तर पश्चिम घाटाच्या एका अनपेक्षित क्षेत्रातून झाला आहे. या मुळे पुन्हा एकदा सह्याद्रीतील नव नवीन सजीव प्रजातींचा शोध घेण्यासाठी अधिक व्यापक सर्वेक्षणाची आवश्यकता आहे, हेच अधोरेखित होत आहे.
 
“गोगलगायी सारख्या दुर्लक्षित प्राण्यांच्या अजून काही प्रजाती पश्चिम घाटामध्ये सापडण्याची शक्यता आहे, त्यासाठी खूप लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे. वातावरणातील वाढत्या प्रतिकूल बदलांमुळे त्यांचे आस्तित्व धोक्यात येत असून योग्य प्रकारचे संशोधन होऊन ह्या प्रजातींचे संवर्धन करणे हे त्या प्रजातींच्या आणि मानवाच्या दृष्टीने गरजेचे आहे."  -अमृत भोसले, प्राध्यापक, प्राणीशास्त्र विभाग, सद्गुरू गाडगे महाराज विद्यालय. ”
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0