सावनीचा आवाज आता तेलुगु चित्रपटातही

11 Jun 2022 13:14:40

savni
 
 
 
 
 
 
 
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र ही नेहमीच आपल्या आवाजातून तिच्या चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडते. पण आता ती दाक्षिणात्य श्रोत्यांना - प्रेक्षकांना देखील आपलेसे करून घेणार आहे. एका आगामी तेलुगू चित्रपटासाठी सावनीने गाणे म्हटले आहे आणि त्या गाण्याची झलक तिने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे.
 
 
 
 
 
'सदा नन्नु नडिपे' असे या तेलुगू चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे टायटल ट्रॅक नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटात सावनीची अनेक गाणी आहेत. त्यापैकी त्या चित्रपटातील टायटल ट्रॅक सध्या चांगलेच गाजत आहे. यापूर्वीही सावनीने फक्त मराठीच नाही तर हिंदी, गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा गाणी गायली आहेत. आणि आता तेलुगू भाषा देखील तिच्या गाण्यांच्या यादीत सामील झाली आहे.
 
 
 
 
 
तेलुगू संगीत क्षेत्रातील पदार्पणाविषयी सावनी सांगते, ‘मी अनेक भाषेत गाणी गायली आहेत. यापूर्वी मी तेलुगू भाषेतील गाणी आणि जिंगल्स गायली होती. यावेळेस मी पहिल्यांदाच तेलुगू 'चित्रपटा'साठी गाणी गायली आहेत. तेलुगू गाणं गाण्यासाठी मी तेलुगू भाषा शिकले. साऊथच्या कोणत्याही भाषा गाताना खूप चॅलेंजिंग असतं. या भाषा समजायला आणि बोलायला अवघड असतात. परंतु, मी याआधी तमिळ, मल्याळम गाणी गायली आहेत. ती गाणी रेकॉर्ड करण्याआधी मी साऊथमधील विविध गाणी सातत्याने ऐकली होती. त्यामुळे या चित्रपटातील तेलुगू गाणी गाताना मला थोडं सोप्पं गेलं. या गाण्यांमध्ये बऱ्यापैकी संस्कृत शब्द आहेत.’
 
Powered By Sangraha 9.0