दगाबाजांची यादी आमच्याकडे आहे-राऊतांचा इशारा

11 Jun 2022 14:16:41
t 
 
 
 
 
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत काल भाजपाने दणदणीत विजय मिळवत यश संपादन केलं. अपक्षांनी दगाफटका केला त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली. दिलेला शब्द न पाळलेल्या दगाबाजांची यादी आमच्याकडे असल्याचा दावा करत आमदार देवेंद्र भुयार व आमदार संजय शिंदे यांनी त्यांच्या पहिल्या पसंतीचा मत हे शिवसेना उमेदवाराला न दिल्याची नाराजी संजय राऊत यांनी व्यक्त केली. दरम्यान या निवडणुकीत विरोधकांकडून माझा पराभव करण्यासाठी देखील प्रयत्न झाल्याचे राऊत यांनी सांगितले.
 
 
 
 
देवेंद्र भुयार व संजय शिंदे यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले आहेत. राऊतांच्या गद्दारीच्या आरोपानंतर देवेंद्र भुयार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे आता ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत, असं वाटू लागलंय. मतदान गोपनीय असतं, मी मत दिलं नाही, हे यांना कसं माहित? मी कुठलाही दगाफटका केलेला नाही.
 
 
 
 
माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे, पण माझी वैयक्तिक नाराजी नाही. माझ्या मतदारसंघातले काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांसाठी वेळ दिला नाही, त्यावरून माझी नाराजी आहे.माझी मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी मी उघडपणे व्यक्त केली. उद्धव ठाकरेंसमोर नाराजी मांडायची नाही तर काय दाऊदसमोर मांडायची का?" असा प्रश्न देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला तर  “त्यांचा आमच्यावर विश्वास नव्हता तर मतदानासाठी घेऊन जायचे नव्हते. मी हरभरे खाणाऱ्यातला आहे का, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे, असं म्हणत संजय शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
 
 
 
 
पहिल्या फेरीत संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मतं पडली आहेत तर धनंजय महाडिक यांना २७ मतं पडली आहेत. मात्र दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर भाजपने महाविकास आघाडीवर मात केली व धनंजय महाडिक यांना ४१ मतं पडून महाडिकांचा विजय झाला. संजय राऊत यांनी पराभवाचे खापर अपक्ष आमदारांच्या माथी फोडल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद बाहेर येऊ लागलाय. इतके दिवस महाविकास आघाडीत सगळं आलबेल आहे, हा दावा फोल असल्याचे आता समोर येत आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0