१२० देशांतील नाण्यांचा संग्राहक

11 Jun 2022 11:10:42

sn
 
एक कलाकार, शरीरसौष्ठवपटू, कंपनी मॅनेजर आणि पिता अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडत, १२० देशांतील नाणी, नोटा आणि टपाल तिकिटे संग्रही ठेवणार्‍या नाशिकच्या संजय राजेंद्र नायर यांच्याविषयी...
 
 
नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्पमध्ये जन्मलेल्या संजय राजेंद्र नायर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देवळाली हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. वडिलांना चित्रकलेची आवड असल्याने संजय यांनाही चित्रकलेची गोडी निर्माण झाली. शाळेत ‘इंटरमिडिएट’, ‘एलिमेन्ट्री’ या परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. वडिलांनी संजय यांना चित्र काढताना पाहिले, तर ते रागवत. त्यामुळे अनेकदा ते लपूनछपून चित्रे काढत. चित्रकलेत पुढे भविष्य नाही, असे वडिलांचे म्हणणे असल्याने ते संजय यांना चित्रकलेऐवजी अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगत. १९९८ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी भाटीया महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. नृत्याची आवड असल्याने संसरी गावातील नवरात्रोत्सव, गणेशोत्सवातील स्पर्धांमध्येही ते भाग घेत. घरची जेमतेम परिस्थिती लक्षात घेत अकरावीला त्यांनी कपड्याच्या दुकानात दीड हजार रुपये पगारावर कामास सुरुवात केली. शालेय वयापासूनच संजय यांना ‘आर्टिस्ट’ या नावाने ओळखले जाऊ लागले. चित्रकलेची आवड जोपासत त्यांना व्यायामाची आवड निर्माण झाली. त्यांनी अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये यश मिळवले. बारावीत असताना ते दुकानाचा हिशोबही सांभाळत. एकदा एका ग्राहकाने दिलेल्या पाच रुपयाच्या नोटेने त्यांचे लक्ष वेधले. त्या नोटेवर चार हरणांचे चित्र असल्याने ती नोट दुकानमालकाच्या परवानगीने त्यांनी स्वतःकडेठेवली. आपल्याकडे दुर्मीळ नोट आहे याचे संजय यांना अप्रूप होते. नंतर त्यांना अशा दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण नोटा संग्रहित करण्याची आवड लागली.
 
 
पुण्यातील त्यांचे मित्र विजय गायकवाड यांना संजय यांच्या नोटा संग्रहित करण्याच्या छंदाविषयी कल्पना होतीच. विजय नाशिकला आल्यानंतर त्यांनी संजय यांना पौंड, युरो अशी एकूण १० ते १५ नाणी दिली. पदवीचे शिक्षण २००२ साली पूर्ण झाले आणि नंतर २००४ मध्येच संजय यांच्या वडिलांचे निधन झाले. या दुःखातून सावरल्यानंतर त्यांचा छंद आणखी वाढीस लागला. मित्र, सहकारी फॉरेन टूर्ससाठी गेल्यानंतर संजय त्यांना पुन्हा येताना त्या देशातील नोटा व नाणी घेऊन येण्यास सांगत. हळूहळू त्यांचे मित्र, त्यांना ओळखणारी लोकं स्वतःहून दुर्मीळ नाणी, नोटा तथा विदेशी चलन देऊ लागली. विनायक चुंभळे आयोजित इंद्रप्रसाद लॉन्समधील नाणी प्रदर्शनातही ते स्वतःकडीलअधिकची नाणी दुसर्‍यांना देऊन त्याबदल्यात त्यांच्याकडे नसलेली नाणी घेत. सात ते आठ वर्षांचा कापड व्यवसायातील अनुभव असल्याने ते २००६ साली दुबईत नोकरीसाठी गेले. मात्र, तेथील वातावरण न मानवल्याने अवघ्या तीन महिन्यांतच ते भारतात परतले. यावेळी त्यांनी दुबईची चलनी नाणी व नोटाही सोबत आणल्या.
 
 
नोकरी नसल्याने खचलेल्या संजय यांना एका मित्राने नाशिकमध्येच एका कंपनीत नोकरीसाठी मदत केली. तिथे सहा महिने नोकरी केल्यानंतर त्यांना बहिणीच्या पतीच्या मदतीने एका नामांकित कंपनीत रूजू झाले. तेव्हापासून ते आजतागायत ते याच कंपनीत कार्यरत असून, सध्या ते असिस्टंट मॅनेजरपदी कार्यरत आहे. कंपनीत काम करत असतानाही त्यांनी आपला छंद कायम ठेवला. प्रवास असो वा पर्यटन, संजय नेहमीच दुर्मीळ नाणी, नोटांच्या शोधात असतात. उत्तम इंग्रजीची जाण असल्याने विदेशी चलन संग्रहित करण्यास संजय यांना मदत होते. संजय सध्या कंपनीत काम करण्याबरोबर चित्रकला, शरीरसौष्ठव, नाणी संग्रहित करतात. एकदा संजय यांच्या वाढदिवसाला आलेल्या पत्रावर अतिशय सुंदर टपाल तिकीट पाहून त्यांना टपाल तिकिटे संग्रहित करण्याचीही आवड लागली.
 
 
संजय त्यांच्या विदेशातील मित्रांना भारतात परत येताना ते राहत असलेल्या देशाचे एक नाणे, नोट आणि टपाल तिकीट आणण्यास हक्काने सांगतात. नॉर्वे, फिनलँड, सिंगापूर, कुक आयलँड, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेदरलँड, हॉलंड, युगोस्लोवाकिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका, घाना, नामिबिया, दक्षिण सुदान, बहारीन, टर्की, केनिया, रशिया अशा एकूण जवळपास १२० देशांची ५०० हून अधिक नाणी व नोटा सध्या संजय यांच्या संग्रही आहेत. या संग्रहात १८३५ आणि १९१६ मधील नाणी सर्वात जुनी आहे. विशेष बाब म्हणजे, यासाठी त्यांना एक रुपयाही खर्च आलेला नाही. १५ ते २० देशांतील जवळपास १०० टपाल तिकिटेही त्यांच्या संग्रही आहेत. सर्व नाणी ठेवण्यासाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे फर्निचर तयार करून घेतले असून त्यात ते देशाच्या नावासहित ठेवले आहे. भंगारात किंवा विनावापराच्या प्लास्टिक बाटल्या, किंवा मोठमोठे तेलाच्या डब्ब्यांच्याही ते आकर्षक कुंड्या तयार करतात.
 
 
‘तुला या छंदातून काय मिळतं, कशाला करतोस हे सगळं’ असा सल्ला देणार्‍यांना संजय सांगतात की, “प्रत्येक आनंद पैशात मोजता येत नाही. मी खचलो, दुःखी झालो तर या नाण्यांमध्येच मी रमतो. कारण, त्यातून मला ऊर्जा मिळते. माझ्या अडचणी, संकटे यांतून मला टेन्शन-फ्री करण्यासाठी माझा छंद मला उपयोगी पडतो. जगातील सर्व देशांची नाणी आणि नोटा संग्रही ठेवण्याचे माझे स्वप्न आहे.” एक कलाकार, चित्रकार, शरीरसौष्ठवपटू, कंपनीमध्ये मॅनेजर आणि पिता अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडत आपला छंद जोपासणार्‍या संजय नायर यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा....
 
 
Powered By Sangraha 9.0