राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि ‘संस्कार भारती’चे अखिल भारतीय संरक्षक ‘पद्मश्री’ बाबा योगेंद्रजी यांचे काल, शुक्रवारी दि. १० जून रोजी लखनौ येथे निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना ही शब्दसुमनांजली...
योगेंद्रजी ‘संस्कार भारती’ला सर्वस्व वाहिलेले व्यक्तिमत्त्व. प्रेमाने ओथंबलेले बोलणे, मृदू खणखणीत वाणी, आश्वासक प्रेमळ स्पर्श, अत्यंत तीक्ष्ण स्मृती, ९९ वर्षांचे दीर्घायुष्य, तरुणांना लाजवेल, असा उत्साह हे वर्णन आहे, आमच्या बाबा योगेंद्रजी यांचे.
योगेंद्रजींचा जन्म दि. ७ जानेवारी, १९२४ रोजी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यामधील गांधीनगर या गावी झाला. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊ लागले. शिक्षणासाठी गोरखपूरमध्ये असताना ते नानाजी देशमुख यांच्या संपर्कात आले आणि संघाचे प्रशिक्षण घेऊन योगेंद्रजी प्रचारक म्हणून निघाले. गोरखपूर, प्रयाग, बरेली, बदायुं आणि सीतापूर येथे संघाचे प्रचारक होते. नानाजी देशमुख, भाऊराव देवरस, हरिभाऊ वाकणकर, माधवराव देवळे आणि योगेंद्रजींनी १९८१ मध्ये ‘संस्कार भारती’ची स्थापना केली. योगेंद्रजी ‘संस्कार भारती’चे पहिले अखिल भारतीय संघटन मंत्री होते. सध्या योगेंद्रजी ‘संस्कार भारती’चे ‘अखिल भारतीय संरक्षक’ म्हणून कार्यरत होते. देशभरातील असंख्य कार्यकर्ता/कलाकारांशी संपर्क असलेले योगेंद्रजी हजारो कार्यकर्त्यांना अगदी पहिल्या नावाने ओळखत असत. अनेक वेळा पहाटेच्या वेळी आलेल्या फोनवर बाबाजींचा धीरगंभीर आवाज आम्ही ऐकला आहे. कार्यवृद्धीविषयी अनेक सूचना त्यांच्याकडून मिळत असत. त्यांचा प्रेमळ सहृदय आवाज आता ऐकू येणार नाही. असो.
कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे भारत सरकारने योगेंद्रजींना २०१८ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. योगेंद्रजींना ‘भाऊराव देवरस सेवा सन्मान’, ‘अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार’ अशा अन्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. अखिल भारतात त्यांचा ‘संस्कार भारती’साठी प्रवास झाला असेल. बाबाजींचा प्रवास झालेल्या प्रत्येक घरातील सभासद बाबाजींच्या आठवणी आजही आत्मीयतेने सांगतात. केंद्रीय बैठकीत जाताना प्रत्येक कार्यकर्त्याला योगेंद्रजींच्या भेटीची लागलेली ओढ आम्ही अनुभवलेली आहे. जवळजवळ १०० वर्षांचे उत्तम हिंडतेफिरते आयुष्य त्यांना लाभले आणि त्यांचा प्रेमळ सहवास आम्हाला लाभला, हेच आमचे भाग्य.
गेले काही दिवस योगेंद्रजी लखनौच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार घेत होते. कलाक्षेत्रातील संघटनेचा अनेक वर्षांचा अनुभव असलेला निगर्वी, कलाकार कार्यकर्ता! कलाक्षेत्रातील अनेकांच्या मनात अनंत स्मृतींचा स्मृतिगंध ठेवून दि. १० जून रोजी निर्जला एकादशीच्या पावन दिवशी सकाळी ८च्या सुमारास अनंतात विलीन झाले. त्यांच्या पावन स्मृतींच्या सोबतीने ‘संस्कार भारती’चे कार्य पुढे वाढवणे हेच योगेंद्रजींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन ठरेल.