सूडबुद्धीपोटी एकाच गुन्ह्यात भामरेविरोधात सहा ठिकाणी एफआयआर!

01 Jun 2022 19:49:15
 
nikhil
 
 
 
 
 
मुंबई : शरद पवारांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या आरोपांवरुन फार्मासिस्ट निखिल भामरेविरोधात सहा ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. "एकाच गुन्ह्यासाठी अनेक एफआयआर दाखल करणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. निव्वळ राजकीय सुडाने पेटून एखाद्याच्या मागे हात धुवून लागणे हे सरळ सरळ मानवाधिकारांचे उल्लंघन आहे", असा आरोप निखिल भामरेंचे वकिल अ‍ॅड. सुरेश कोलते यांनी केला आहे.
 
पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल २२ वर्षीय भामरेविरोधात ठाणे, नाशिकसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. वकीलांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्यामुळे भामरेला जामीनही मंजूर झाला. पवारांबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी निखिलला अटक केली होती.
 
"निखील भामरेने केलेल्या पोस्टचे समर्थन करणे चुकीचीच गोष्ट आहे, पण त्याच्याविरोधात एकाच वेळी पाच-सहा ठिकाणी गुन्हे दाखल करणे तसेच त्याला साधी न्यायालयीन मदतही मिळू न देणे हे लोकशाही विरोधीच आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. जर आज निखिलला लावला जाणारा न्याय सर्वांनाच लावायचा झाला तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करावे लागतील, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया सेलचे संयोजक प्रकाश गाडे यांनी दिली आहे.
 
"२१ वर्षीय निखिल भामरेला घाबरून शरद पवारांनी 6 ठिकाणी गुन्हे दाखल करायला लावले आहेत. २१ वर्षीय मुलाला शरद पवार घाबरलेत. एकाच गुन्ह्यात 6 ठिकाणी FIR दाखल करून बेकायदेशीर कामे करत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हे थांबवलं नाही तर, न्यायालयाकडून सरकारची तर नाचक्की होणार आहेच. तानाशाही सरकारला या सर्वांचं उत्तर न्यायपालिकेला द्यावं लागणार आहे. महाराष्ट्र सरकार सरळ सरळ मानवी अधिकाराचे उल्लंघन करत आहे. लवकर या सरकारला याची उत्तरे न्यायालयात द्यावी लागणार आहेत.", असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0