रायगडात मान्सूनची फक्त हुलकावणी

01 Jun 2022 16:25:23
 
 
raigad rainfall
 
 
 
मुरूड, जंजिरा : भारतीय हवामान खाते यांनी वेळे आधी येणाऱ्या मान्सूनचा अंदाज जवळजवळ रायगडात तरी फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे. 'खाजगी स्कायमेट संस्था' यांनी भारतीय हवामान विभागा कडून केरळ मध्ये मान्सून ३ दिवस आधी येणार असल्याची जी वर्दी दिली होती त्यामध्ये कोणताही दम नसल्याचे खाजगी हवामान संस्था (स्कायमेट) यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर देखील हा मेसज आलेला आहे. अजूनही रायगडात उष्णतेमुळे नागरिकांची काहिली होत असून तापमानाचा पारा ३५ अंशाच्या वर पोहचला आहे.
यंदा ७ जून पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार अशा बातम्या पसरल्या होत्या. प्रत्यक्षात १ जून येऊन देखील पावसाचा थांग पत्ता नव्हता. मासेमारी बंद करण्यात आली असून मासेमारी सोसायटीचा डिझेल साठा लॉक करण्यात आला आहे. रायगडात सर्वच तालुक्यात कालवे नसल्याने बहुतांश शेतकरी शेतीसाठी पावसावरच अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
उन्हाळी सुट्टी १५ जून पर्यंत असल्याने रायगडातील समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ सुरूच आहे. उन्हाळ्याच्या झळा जोरदार जाणवत असल्याने पर्यटक घामाघूम होत आहेत. पाऊस बरसल्यास हवेत काहीसा थंडावा येईल. मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन आदी समुद्राकिनारी सायंकाळी थंडावा जाणवतो. पोलादपूर, रोहा, माणगाव, महाड, पाली, खोपोली, पेण तालुक्यात मात्र उष्णतेच्या झळा आधिक मोठया प्रमाणात जाणवत आहेत. अशा ठिकाणी दुचाकी चालविणे अत्यंत कठीण झाल्याची माहिती येथून मिळाली आहे. रायगडात काही ठिकाणी पेरण्या सुरू झाल्याचे वृत्त असून पावसाची गरज आहे. पावसाचा हा लपंडाव सुरू असून लवकरच वरुण राजाचे आगमन होईल असे अनुमान बुजुर्ग मंडळीनी बुधवारी व्यक्त केले आहे.
 
Powered By Sangraha 9.0