पक्षी येति घरा!!

09 May 2022 11:13:06

VS

मे महिन्याचा दुसरा शनिवार हा जागतिक ‘स्थलांतरित पक्षी’ दिन म्हणून साजरा केला जातो. पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या भिगवणमध्ये दरवर्षी अनेक पक्षी वास्तव्यास येतात. या स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास असलेल्या भिगवणची सफर घडवणारा हा लेख.....
डिसेंबरच्या थंडीत भिगवणच्या उजनी धरणावरील परिसरात, बोटीतून फिरत खूप सारे वेगवेगळे पक्षी बघण्याचा अनुभव मला मिळाला. निसर्गरम्य भिगवणच्या परिसरात अगदी निवांतपणे फिरण्याचा अनुभव खूप काही देऊन जातो. उजनी धरणाचे उद्घाटन 1980 साली झाले. या धरणामुळे देशातील एका मोठ्या ‘बॅकवॉटर’च्या प्रदेशात हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी नेमाने येऊन राहतात. त्यांचा तो मुक्त संचार आणि निर्भयपणे जगणेच सांगून जाते. इथे त्यांना मनुष्यप्राण्यांपासून काहीही धोका वाटत नाही. उजनी धरणाचा प्रचंड विस्तार पाहता ते अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर ठरले आहे. ‘नेमेचि येतो मग हिवाळा’ असे म्हणत थंडीला सुरुवात होते आणि जानेवारी महिन्यापासून धरणातले पाणी खाली सोडले जाते. यानंतर साधारणपणे काही दिवसांतच पक्ष्यांचे आगमन सुरू होते. पुण्यापासून अडीच ते तीन तासांवर असलेले भिगवण गाव अगदी शांत-निवांत. दुपारी 2 वाजेपर्यंत तिथे पोहोचल्यावर, जेवण आटपून थोडा आराम करून दुपारी 4 वाजताच्या सुमारास, बोटीने उजनी धरणावर पक्षीनिरीक्षणासाठी जाण्याची सोय आहे. संध्याकाळचे सौंदर्य वेगळे, सकाळी सूर्योदयापूर्वीच्या वेळचे दृश्यही फार वेगळेच असते. शक्य असल्यास दोन्ही वेगवेगळ्या वेळेस बोटीने तलावात जाणे योग्य ठरते. निसर्गाचा तो नयनरम्य आविष्कार प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो.
 
 
हवेतला तजेला, नीरव शांतता, आजूबाजूला विस्तीर्ण जलाशय... नजर टाकू तेथे फक्त आणि फक्त पाणी आणि पक्षी. बोटीच्या संथ चालीने डुबूक-डुबूक वल्हवाचा आवाज ऐकत आपण एका वेगळ्या विश्वात पोहोचतो. पाण्यातील उंच झाडाच्या शेंड्यावर हजारो पक्षी घरटी बांधून संसार मांडून बसले असतात. बदके एकत्रित होऊन मोठ्या संख्येने सामूहिक जलक्रीडा करत बोटीच्या आजूबाजूने मजेत फिरत असतात. मध्येच एखादा गावकरी मासेमारी करून छोट्या होडीने परत जाताना उंच हात हलवून आपल्याला मनुष्य प्राण्याची जाग देतो. झपकन पाण्यात सूर मारून अलगद चोचीत मासा पकडून पुन्हा हवेत उंच झेपावणारे पक्षी तसेच, आकाशातच एकमेकांचा पाठलाग करत मिळवलेला मासा आयता दुसर्‍याच्या चोचीतून घेण्याची स्पर्धा पण इथे बघता येते. सकाळच्या वेळेस सगळ्याच पक्ष्यांची त्यांचे खाद्य मासे आणि अलगी मिळवण्याची लगबग चालू असते.
 

VS1 
 
येथील स्थानिक लोकांना पक्षांचे उत्तम ज्ञान आहे. ते पूर्णपणे जाणून आहेत की, पर्यावरणाला आणि निसर्गाला कुठलाही त्रास न देता, निसर्गाच्या सान्निध्याने राहिल्यास त्यांचा खरा विकास होणार आहे. येथील स्थानिक लोकांच्या जमिनी उजनी धरणाखाली गेल्या. काहींच्या कोर्ट कचेर्‍या अद्याप चालू आहेत. काहींना दुसर्‍या जवळच्या गावात जमिनी मिळाल्या. तेथेही त्रिशंकूसारखी परिस्थिती अनुभवल्याने, गावकरी मंडळी परत माघारी आपल्या गावाकडे परतली. निसर्ग पर्यटन आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी येणार्‍या लोकांसाठी सोयी उपलब्ध करून देऊन त्यातून रोजगार मिळवण्याची एक संधी येथील गावकर्‍यांना मिळाली आहे. त्यामुळे कुठेही निसर्गाला धक्का न देता, त्याच्याबद्दल जागरूक राहूनच ते निसर्ग पर्यटनाचा विकास करत आहेत.
फ्लेमिंगो पक्षी आपल्याकडे तीव्र थंडीच्या प्रदेशातून मोठा पल्ला पार करून उजनी धरणाजवळील भिगवणच्या प्रदेशात साधारणपणे दोन ते तीन महिन्यांसाठी मुक्कामास येतात.
 
 
 
VS2
 
मुबलक प्रमाणात आढळणारी अलगी/शेवाळे फ्लेमिंगो पक्ष्याचे आवडते खाद्य. उथळ पाण्यात जोमाने वाढणारी अलगी फ्लेमिंगोसाठी मोठे आकर्षण असते. फ्लेमिंगो पक्ष्यांना जन्मजात लाल रंग नसतो. अलगी खाऊन त्यांना पंखांवर हळूहळू लाल रंग चढू लागतो. जानेवारी महिन्यापासून त्यांचे भिगवणच्या भागात स्थलांतर चालू होते. पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांना पंखांवर गडद लाल रंग प्राप्त होतो. फ्लेमिंगो पक्षी नेहमी समूहाने राहतात. रात्रीच्या वेळी समजा काही धोका वाटल्यास ते मोठा आवाज करून आजूबाजूच्या आपल्या मित्रांना बोलावून घेतात. या पक्ष्यांची कवायत मनोवेधक असते; एकामागून एक उंटांसारखे चालत ते खाद्य शोधण्यात मग्न असतात. दोन्ही पायाने उथळ पाण्यात नृत्य करून पायाने ते खालची माती उकरतात आणि त्याबरोबर अलगी सुटून पाण्यावर आल्यावर अलगद ते चोचीत पकडतात. अलगी खाण्याने त्यांना पंखांना लाल रंग प्राप्त होत असतो. जन्मलेले लहान पिल्लू रंगाने राखाडी असते. फ्लेमिंगोच्या लांबलचक बारीक मानेच्या आत तीन वेगवेगळ्या ठिकाणी अन्न गाळून ते पोटात जाते. उथळ पाणथळ जागी जिथे भरपूर अलगी वाढते, ते फ्लेमिंगोंचे आवडते ठिकाण.
 
 
 
उजनी धरणावर हंगामी स्थलांतरित पक्षी थंडीच्या काळात सैबेरिया, आफ्रिका, श्रीलंका, युरोप इत्यादी ठिकाणाहून काही महिन्यांसाठी येतात. जगभरातून पक्षीनिरीक्षणासाठी पर्यटक येथे येतात. अनेकानेक स्थलांतरित पक्षी नित्यनेमाने प्रत्येक वर्षी या उजनी धरणावर उथळ दलदलीच्या ठिकाणी, काठाकाठाने वाढलेले कोवळे गवत खात मुक्त संचार करत असतात. गोगलफोड्या (ओपन बिल स्टोर्क) पक्षाच्या चोचीत फट असते. त्यात गोगलगाय पकडून तिचे कवच फोडून खाणे त्याच्या विशिष्ट चोचीच्या ठेवणीमुळे सहजशक्य असते. डोक्यावर तुरा असलेला देखणा राखाडी बगळा ( ग्रे हेरॉन ) देखील इथे पाहायला मिळतो. चित्रबलाक (पेंटेड स्टोर्क) पक्ष्याच्या पंखांवर अतिशय सुंदर गुलाबी रंगाची पसरण असून आतील बाजूने पंख राखाडी असतात. हा पक्षी सहजच अर्धा किलो मासे पोटात साठवून झाडाच्या शेंड्यावर बसून शांतपणे रवंथ करत राहतो. अतिशय देखणा असा चित्रबलाक पक्षी अंगावरील सुरेख गुलाबी आणि राखाडी रंगाचे मोठे पंख पसरून उडतो, तेव्हा खूपच मनमोहक दिसतो. काही ‘पेंटेड स्टोर्क’ पक्षी मनुष्य प्राण्याची दखलही न घेता, वर्षनुवर्षे एकाच ठरलेल्या झाडावर येऊन आपले घरटे बांधतात. भिगवणचा परिसर त्यांना सुरक्षित वाटत असावा.
 

VS2 
 
चमचचोच्या (स्पून बिल) पक्ष्याची चोच उथळ पाण्यावर मासे पकडताना, एखाद्या आचार्‍याने अलगद जिलबी सोडावी, तशी सुबकतेने फिरवत असतो. गुलाबी मैनेची (रोझी स्टार्लिंग) सांजवेळी गोड गळ्याने एकमेकांस घातलेली साद आणि त्यांचे एकत्रित चाललेले समूहगानमनाला मोहित करते. पट्टेकदंब (बार हेडेड गूस) पार हिमालय पार करून काही महिन्यांसाठी इथे पाहुणा असतो, सुरक्षित कोरडी जमीन आणि काठाने वाढलेले कोवळे गवत खास प्रिय. डोक्यावर असलेल्या तीन पट्ट्यांमुळे त्याला ‘पट्टेकदंब’ नाव मिळाले आहे. या निर्भय पक्ष्याला मनुष्य प्राणी आणि भटक्या कुत्र्यांपासून अजिबात धोका वाटत नाही. आरामात तलावाच्या काठाकाठाने ते फिरताना आढळतात. पाकिस्तानमधून काही पक्षी हंगामी स्थलांतर करण्यास येतात. पाणभिंगरी, पाणपक्षी मुक्त विहार करत उजनीच्या सहज सौंदर्यात मोलाची भर घालत असतात. पक्ष्यांसोबतच इथे श्वापदे सुद्धा पाहायला मिळतात, पठार प्रदेश असल्यामुळे, येते क्वचित खोक्डाचे सुद्धा दर्शन होते.
 
 
VS3
 (छायाचित्रे : आशिर्वाद ओक) 
 
 
नौका विहारासाठी वापरण्यात येणार्‍या बोटी येथे जवळच इंदापूर भागात बनवल्या जातात. एक एक बोटीचा खर्च एक दीड लाखाच्या घरात जातो. निसर्ग पर्यटन हे येथील स्थानिकलोकांसाठी रोजगाराचे साधन ठरत आहे. स्थानिक लोकांना पक्षांची उत्तम माहिती आहे. शासनाने येथील लोकांसाठी काही मार्गदर्शक कोर्सेस विकसित केले, तर त्यांच्याजवळील पारंपरिक पक्ष्यांची माहिती आणि नवीन ग्रहण केलेले शास्त्रशुद्ध ज्ञान त्यांना नक्कीच फायद्याचे ठरेल, ज्यामुळे स्थानिक लोक आणि येणारे पर्यटक दोघांचा फायदा होईल. निसर्ग पर्यटनासाठी भिगवण एक उत्तम पर्याय आहे. येथे जवळ असलेल्या सोलापुरातील दाण्याची चटणी खूप प्रसिद्ध आहे. तसेच येथील मिसळ, तिलापिया माशाचे बरेच प्रकार, खारवलेलं मटण पण या भागात प्रसिद्ध आहे. सुट्टीचे दिवस टाळून गेल्यास अगदी निवांतपणे पक्ष्यांची संगत अनुभवता येते.

- सोनाली चितळे  
 
 
Powered By Sangraha 9.0