रोगग्रस्त मानसिकता निरामय जीवनाला पर्याय होऊ शकत नाही. बहुसंख्य भाजपेतर पक्ष, त्यांच्या ‘इकोसिस्टीम’ना मोदीद्वेषाची, भाजपद्वेषाची, संघद्वेषाची काविळ झालेली आहे. या रोगावर राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद हाच औषधोपचार प्रभावी ठरणार आहे, तरच त्यांना सत्य स्वच्छ दिसायला लागेल!
काही आजार असे असतात ज्यांचं निदान लवकर होत नाही. अशा आजाराने ग्रस्त-त्रस्त रुग्ण कुठेतरी कुणाकडून तरी आपल्या आजाराचे निदान होईल, त्यावर कुठलातरी औषधोपचार लागू पडेल आणि या आजारातून आपली सुटका होईल म्हणून वेगवेगळ्या रुग्णालयात चकरा मारत असतो. अचूक निदान, आजारानुकूल औषधोपचार आणि रुग्णाचा सकारात्मक प्रतिसाद असा त्रिवेणी संयोग जुळून आला, तर रुग्ण खडखडीत बरा होऊ शकतो. काही रुग्ण असे असतात, ज्यांच्या आजाराचं अचूक निदान झालं, तरी आपल्याला असा काही आजार झालेला आहे, यावर ते विश्वास ठेवायलाच तयार नसतात. निदान झालेल्या आजारावर सुचवलेला औषधोपचार करवून घेण्याऐवजी ते भलत्याच औषधोपचाराने आपला आजार बरा करून घेण्यासाठी भलतीकडेच भटकतात आणि अधिकच खंगत जातात. अशा रुग्णाला कुणी त्याच्या आजाराविषयी सहानुभूती दाखविली, योग्य औषधोपचार करवून घ्यायचा प्रेमळ सल्ला दिला तर ते भडकतात. अशा रुग्णाचा अंत ठरलेला असतो!
रुग्ण कुणीही असू शकतो, देश, समाज, संघटना, आस्थापना, मीडिया, राजकीय पक्ष, मतदार राजा वगैरे वगैरे... कारण, हे सारे व्यक्ती समूह असतात आणि जो शारीरिक-मानसिक आजार एका व्यक्तीला होऊ शकतो, तो समूहालाही होऊ शकतो! राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद यांचं प्रचंड वावडं असलेल्या काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीने आपल्या स्वार्थासाठी सर्व शासन-प्रशासन व्यवस्था, स्वायत्त संस्था, साहित्य, कला-क्रीडा क्षेत्र, प्रसारमाध्यमे, मतदार वगैरे क्षेत्रं रोगग्रस्त करून सोडली आहेत. अल्पसंख्याकांचं लांगुलचालन आणि बहुसंख्याकांवर लत्ताप्रहार हा काँग्रेसचा ‘सेक्युलॅरिझम.’ घुसखोरांना अभय आणि भूमिपुत्र भयभीत हा काँग्रेसचा सेक्युलॅरिझम! या मातीतली सभ्यता, संस्कार, प्रथा-परंपरा-वारसा हे सारे बुरसटलेले आणि आयातीत जे काही असेल ते सारे पुरोगामी हा काँग्रेसचा ‘सेक्युलॅरिझम.’ मोदी सरकारकडून अशा रोगांवर-रोगग्रस्तांवर राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवादनामक जालीम औषधोपचार करायचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी रोगग्रस्तांचे समूह उपचार-उपकारकर्त्याच्याच जीवावर उठले आहेत. देशविदेशात त्याची बदनामी करायचा प्रयत्न करत आहेत. षड्यंत्रकारी ‘टूलकिट’वर ‘टूलकिट’ बाजारात आणत आहेत. कुठलीही किंमत मोजू, पण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला संपवू, अशा प्रतिज्ञा केल्या जात आहेत.
एखादी सहानुभूतीची किंवा उद्रेकाची तात्पुरती लाट निर्माण करून मोदीविरोधक, भाजपविरोधक, संघविरोधक सत्तेवर येतीलही, पण मग रोगग्रस्तांचा आजार अधिकच बळावत जाईल आणि रोगग्रस्तांसह देशालाही बरबाद करून टाकतील! तमाम मोदीविरोधक, तमाम भाजपविरोधक, तमाम संघविरोधक यांची विद्रूप संयुक्त पुरोगामी आघाडी पुन्हा सत्तेवर येईलही, पण ती पूर्वीपेक्षा अधिक विध्वंसकारी असेल, ती भारतीय जनता पक्षाला पर्याय होऊ शकणार नाही. निवडणुकीत मोदींचा, भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं वेगळं आणि मोदींना, भारतीय जनता पक्षाला समर्थ पर्याय देणं वेगळं. मोदींना पर्याय होण्यासाठी सवाई मोदी निर्माण करावा लागेल, भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्यासाठी सवाई भारतीय जनता पक्ष उभा करावा लागेल, संघाला पर्याय देण्यासाठी सवाई संघ निर्माण करावा लागेल. मोदींचा तिरस्कार करून मोदी होता येणार नाही, भारतीय जनता पक्षाचा तिरस्कार करुन भारतीय जनता पक्ष होता येणार नाही, संघाचा तिरस्कार करून संघ होता येणार नाही. रोगग्रस्त मानसिकता निरामय जीवनाला पर्याय होऊ शकत नाही. बहुसंख्य भाजपेतर पक्ष, त्यांची ‘इकोसिस्टीम’ यांना मोदीद्वेषाची, भाजपद्वेषाची, संघद्वेषाची काविळ झालेली आहे. या रोगावर राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद हाच औषधोपचार प्रभावी ठरणार आहे, तरच त्यांना सत्य स्वच्छ दिसायला लागेल!
सोनिया गांधी यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि तिच्यातून फुटून निघालेले अनेक प्रादेशिक काँग्रेसी पक्ष आणि बहुतेक सारे भाजपेतर-डावेतर प्रादेशिक पक्ष एका सामाईक आजाराने ग्रस्त आहेत. कुणाचा आजार प्रथमावस्थेत आहे, तर कुणाचा दुसर्या, तिसर्या, शेवटच्या टप्यात आहे. गंमत अशी की, आपल्याला असा काही आजार झालेला आहे, त्यामुळे आपली प्रकृती खंगत चालली आहे, आपल्याला योग्य औषधोपचाराची गरज आहे, हे उघडपणे मान्य करायला कुणीही तयार नाही. टाचेला लेप लावून काखेतला गळू बरा होत नसतो, तर योग्य त्या ठिकाणी लेप लावावा लागतो. योग्य त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करावी लागते. ज्या आजाराविषयी मी बोलतो आहे, तो आजार आहे परिवारवाद आणि वंशवाद! त्या आजारातून बाहेर आल्याशिवाय यातला कुणीही किंवा सगळे एकत्र येऊनही भारतीय जनता पक्षाला समर्थ पर्याय देऊ शकत नाही! परिवारवाद आणि वंशवादाचं आयतं मिळालेलं गाठोडं फार दिवस पुरत नाही आणि ते गाठोडं डोक्यावर घेऊन फारकाळ कुणी चालू शकत नाही. ध्येयनिष्ठ कार्यकर्ते-नेते निर्माण करण्याऐवजी सगळी कामं ‘आऊटसोर्सिंग’ करुन कुठलाही पक्ष सत्तेवर येऊ शकत नाही. याचा अनुभव सोनिया गांधी यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस घेत आहे.
भारतातील काँग्रेससह एकाही परिवारवादी, वंशवादी राजकीय पक्षाला परिवारवाद, वंशवाद फेकून द्यावा आणि सामूहिक कर्तृत्वावर आपलं सामूहिक साम्राज्य उभं करावं, असं वाटत नाही आणि भारतीय मतदारही त्यांना तसं करायला विवश करत नाहीत, ही भारतीय लोकशाही प्रणालीची शोकांतिका आहे. परिवारवादी, वंशवादी राजकीय पक्षात एखादी व्यक्ती कितीही कर्तबगार असली, तरी ती जर त्या वंशपरिवाराबाहेरची असेल, तर ती त्या पक्षात सर्वोच्च स्थानी पोहोचू शकत नाही. एवढंच कशाला, पुतण्या अजित दादा पवार हे पवार परिवारातलेच असले, तरी शरद पवार यांचा ओढा आपली कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडेच अधिक दिसतो. पक्षाची स्थापना झाल्यापासून आजतागायत शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. असं फक्त परिवारवादी, वंशवादी राजकीय पक्षातच घडू शकते. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे दोघेही गांधी वंशपरिवारातलेच असले तरी सोनिया गांधी यांचा कल राहुल गांधी यांच्याकडेच अधिक दिसतो. प्रदीर्घकाळ अध्यक्षपद उपभोगल्यानंतर सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपदी बसविले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याला आता तीन वर्षे होत आहेत, तरीही सोनिया गांधी याच पुन्हा (हंगामी)अध्यक्षपदी विराजमान आहेत. असं फक्त परिवारवादी, वंशवादी राजकीय पक्षातच घडू शकते.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याकडे असलेली शिवसेनेची सूत्रं आपला राजकीय पट्टशिष्य पुतण्या राज ठाकरे यांच्याकडे न देता राजकारणापासून दूर असलेला आपला पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविली. माझ्या मुलाला (उद्धव) आणि नातवाला (आदित्य) सांभाळून घ्या, असं आदेशवजा आवाहन बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात शिवसैनिकांना केलं होतं. असं फक्त परिवारवादी, वंशवादी राजकीय पक्षातच घडू शकते. एखादा राजकीय पक्ष जेव्हा एखाद्या घराण्याच्या दावणीला बांधला जातो तेव्हा ते घराणे त्या पक्षाला आपली खासगी मालमत्ता समजून वागत असते! असा राजकीय पक्ष जर प्रादेशिक-भाषक भावना भडकवणारा असेल तर तो अधिक खतरनाक होऊ शकतो. याचा दाहक अनुभव बंगालसह आणखी काही प्रांत घेत आहेत! प्रादेशिक-भाषक संकुचितता, परिवारवाद, वंशवाद हा त्या त्या राजकीय पक्षाच्या प्रगतीलाच मारक ठरतो असे नाही, तर संपूर्ण देशाच्या प्रगतीलाही बाधक ठरत असतो. संकुचित भाषिक-प्रादेशिकवादी, परिवारवादी, वंशवादी राजकीय पक्षांपासून देशाला ज्या दिवशी मुक्ती मिळेल, तो दिवस लोकशाही प्रणालीसाठी, देशासाठी सुदिन असेल.
सोनिया गांधी यांच्या राजकीय क्षेत्रात खंगत चाललेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पुन्हा उभं राहायचं आहे. त्यांना मोदी-भाजपला सत्तेवरून खाली खेचायचे आहे. त्यासाठी काँग्रेस परिवार आणि तिची ‘इको सिस्टीम’ नैतिक-अनैतिक प्रयत्नही करत आहेत, पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला झालेल्या आजारावर उपचार करवून घ्यायला रुग्ण तयार नाही. राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी ६०० पारदर्शिका, ७० पानी मार्गदर्शिका यांचा आधार घेत १८ तासांचे सादरीकरण केले, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आम्ही आमच्या आजारावर उपचार करुन घेणार नाही, तरीही तुम्ही आम्हाला खडखडीत बरं करायची आणि सत्तेवर नेऊन ठेवायची जबाबदारी घ्या, असं रुग्ण आणि त्याचे नातेवाईक म्हणत असतील, तर प्रशांत किशोर तिथून पळ काढणारच ना? प्रशांत किशोर (पीके) हे गांधी परिवाराकडे गेले होते अहमद पटेल (एपी) यांच्या रिक्त झालेल्या जागी आपली वर्णी लागावी म्हणून, पण काँग्रेस म्हणाली, “मिस्टर पीके, आम्ही राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक सशक्तीकरण कृती गट स्थापन केला आहे, त्यात तुम्हाला सदस्य म्हणून घेतले आहे, आता राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची सारी जबाबदारी तुमची, लागा कामाला!” असं म्हणतात की, प्रशांत किशोरने सादरीकरणाची सुरुवात खालील अवतरणाने केली होती,
We cannot allow Congress to die,
Congress will die with the Nation!
रुग्णाला धीर देण्यासाठी सपने बेचनेवाला सौदागर प्रशांत किशोर असं बोलले असतीलही, पण खरंच काँग्रेस मरणपंथाला लागलीय का? अहो, आजपर्यंत एका काँग्रेसमधून अनेक काँग्रेस पक्षांचा जन्म झाला आहे, अनेक प्रांतात ते सत्तेवर आहेत आणि ते सारे वंशपरंपरागत आजाराने, परिवारवादाने ग्रस्त आहेत, काँग्रेसी इकोसिस्टीम गेल्या आठ वर्षांत अधिकच उग्र आणि सक्रिय झाली आहे, शिवसेनेसारखा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारा पक्षही काँग्रेसी परिवारात सामील झाला आहे. काँग्रेस प्रवृत्ती नामशेष व्हायला अजून बराच काळ जावा लागणार आहे. ही काँग्रेसी प्रवृत्ती जसजशी कमकुवत होत जाईल, तसतसा देश अधिक सशक्त होत जाईल.
जात, पंथ, प्रांत, भाषा समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय-अराजकीय पक्ष-संघटना बांधण्यात काहीच गैर नाही, पण तिथे इतर जात, पंथ, प्रांत, भाषा समूहाविषयी, त्यांच्या पक्ष-संघटनांविषयी तिरस्काराला स्थान असता नये. तुमची जात, पंथ, प्रांत, भाषाभक्ती ही राष्ट्रभक्तीला छेद देणारी असता नये. तुमचे जात, पंथ, प्रांत, भाषाहित हे राष्ट्रहिताला छेद देणारे असता नये. तुमचा जात, पंथ, प्रांत, भाषावाद हा राष्ट्रवादाला छेद देणारा असता नये. राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद सर्वोपरी असले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद ही कुठल्याही राष्ट्राची बलस्थानं असतात, ती कायम बलशालीच असली पाहिजेत. ती बलस्थानं कमजोर, कमकुवत झाली की राष्ट्र पारतंत्र्याकडे, विनाशाकडे वाटचाल करु लागते.
भारतीय जनता पक्षाला पर्याय उभा करायचा असेल तर तो राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद या त्रिसूत्री पायावरच उभा करावा लागेल, त्या पर्यायात परिवारवादाला, वंशवादाला, जातीय-भाषिक-प्रादेशिक संकुचिततेला अजिबात थारा देता कामा नये. असा पर्याय उभा राहू शकतो. भारतीय जनता पक्ष हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. अनामत रक्कम जप्त होणार्या जनसंघापासून सुरुवात करून इथपर्यंत यायला भारतीय जनता पक्षाला बराच काळ लागला, पण राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित आणि राष्ट्रवाद या त्रिसूत्रीशी भारतीय जनता पक्षाने कधीही प्रतारणा केली नाही, जातीय-भाषक-प्रादेशिक संकुचिततेला कधीही थारा दिला नाही, परिवारवाद, वंशवाद यांच्या तावडीत भारतीय जनता पक्षाला जावू दिले नाही. संघ परिवारात अशा विकृतींना थारा नसतो.
आजचे जे परिवारवादी, वंशवादी राजकीय पक्ष-संघटना आहेत, त्या प्रत्येक पक्ष-संघटनेतील प्रत्येकी १०० ध्येयवेडे नेते-कार्यकर्ते एकत्र येऊन असा पर्याय उभा करू शकतात, समाजातल्या समविचारी धडपड्यांचे सहकार्य त्यांना मिळू शकते! जर आज सुरुवात केली, खडतर परिश्रम घेतले, हेतू प्रामाणिक ठेवले, तर आगामी दहा-पंधरा वर्षांत असा देशव्यापी पर्याय उभा राहू शकतो, तो भारतीय जनता पक्षाला चांगली टक्कर देऊ शकतो. नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनाही असा खराखुरा प्रतिस्पर्धी-पर्याय नक्कीच आवडेल. कारण, राजकीय, वैचारिक लढाई लढताना कुणालाही शक्तीचा अनावश्यक वापर करावा लागणार नाही, असा पर्याय जेव्हा उभा राहील, तेव्हा परिवारवादी, वंशवादी, भंपक सेक्युलरवादी, भंपक समाजवादी, भंपक साम्यवादी राजकीय पक्ष-संघटना नामशेष होतील. संपूर्ण भारत आणि भारतीय लोकशाही प्रणाली त्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. तो क्षण आणखी जवळ आणण्यासाठी जागरुक भारतीय मतदार मोलाची कामगिरी बजावू शकतात. शुभं भवतु!
- सोमनाथ देशमाने