ठाण्यातही भाजपकडून शिवसेनेची पोलखोल

07 May 2022 18:45:43
ks
 
 
 
 
 
ठाणे : मुंबई महापालिकेतील शिवसेनेची पोलखोल सुरु केल्यानंतर पाठोपाठ ठाण्यातही भाजपाकडून सत्ताधारी शिवसेनेच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विविध ५० प्रकरणांवर काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार असून, शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभांसह प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. भाजपाच्या ठाणे कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली.
 
 
 
ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कोविड आपत्तीसह पाच वर्षांच्या काळात विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. नागरी सुविधांच्या कामांसह बॉलिवूड पार्क, थीम पार्क, बीएसयूपीसह तब्बल ५० प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचाराचे पुरावे देत काळी पुस्तिका प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर व्हीडीओ क्लिप व छायाचित्रे तयार करून प्रदर्शन भरविले जाईल. शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेऊन भाजपाकडून शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाईल, अशी माहिती आ. निरंजन डावखरे व आ. संजय केळकर यांनी दिली. पोलखोल करण्यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, असे आ. डावखरे यांनी सांगितले. तर ठाणे महापालिकेत आढळलेल्या भ्रष्टाचाराचे अनुभव नागरिकांनी भाजपा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले. या पत्रकार परिषदेला माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, मनोहर डुंबरे, शहर सरचिटणीस विलास साठे आदींची उपस्थिती होती.
 
 
 
ठाकरेंनी मनसुख हिरेन कुटुंबियाची माफी मागावी
माजी खासदार किरीट सोमय्या, आ.निरंजन डावखरे आणि आ. संजय केळकर यांनी आज मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मनसुख हे आरोपी नसून, पीडित असल्याचे `एनआयए'ने स्पष्ट केले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर हिरेन कुटुंबियांना दिलासा मिळाला, असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसुख हिरेन कुटुंबियांची माफी मागावी, अशी मागणी केली. प्रदीप शर्मा व सचिन वाझे यांची पुन्हा पोलिस दलात नियुक्ती कशी झाली, त्यामागील सुत्रधाराचा तपास करण्यासाठी पुढील आठवड्यात `एनआयए' अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0