म्हाडा सरळसेवा भरती - २०२१ अंतिम टप्प्यात

06 May 2022 15:10:43
 
mhada
 
 
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याअंतर्गत ५६५ जागांसाठी १६३० यशस्वी परिक्षार्थींना कागदपत्रे सादरीकरण तसेच पडताळणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर यशस्वी उमेदवारांची संवर्गनिहाय सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान म्हाडातर्फे परिक्षा घेण्यात आल्या होत्या.
 
 
म्हाडा प्रशासनातर्फे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ट अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक, सहाय्यक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी, सर्वेयर, ट्रेसर, स्टेनोग्राफर, सहाय्यक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या १४ संवर्गातील जागांसाठी एकूण १६३० उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे. कागदपत्रे तपासणीकरिता बोलाविण्याचे ठिकाण, तारीख व वेळ पत्राद्वारे स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल.
 
 
ज्या उमेदवारांचे अर्जावरील फोटो व परिक्षा केंद्रावर काढण्यात आलेले फोटो जुळत नाहीत किंवा ज्यांचे लॉग डिटेल्स शंकास्पद आहेत किंवा ज्या उमेदवारांचे परिक्षा केंद्रावरील वर्तन आक्षेपार्ह आढळून आले आहे, अशा उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येणार आहेत. याबाबत योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करून सर्व काही योग्य आढळून आल्यानंतरच त्यांचे निकाल घोषित करण्यात येतील. अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0