मुंबई : “रामराज्यात जातव्यवस्था नव्हती, प्रभू श्रीरामाने शबरीची उष्टी बोरे खाल्ली. पण, महाभारतात जातव्यवस्था सुरू झाली ती झालीच!” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार नीला वसंत उपाध्ये यांनी आपल्या इंग्रजी पुस्तक Lime-Kilns, Salterns and the Agris (The past and The present) प्रकाशनावेळी केले. बुधवार, दि. ४ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विश्वस्त एकनाथ क्षीरसागर आणि सब्यसाची मुखर्जी देखील उपस्थित होते. ‘जुन्या मुंबईचे शिल्पकार : चुनाभट्ट्या नि मिठागरवाले आगरी‘ हा आपल्या भाषणाचा विषय घेऊन ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांनी श्रोत्यांशी यावेळी संवाद साधला.
आपल्या भाषणात आगरी जाती व्यवस्थेबद्दल बोलत असताना रामायण काळापासून ते थेट शिलालेख, बखरी ते आजपर्यंतचे संदर्भ उपाध्ये यांनी श्रोत्यांना दिले. “पाच हजार वर्षं जुना इतिहास असलेल्या या जातीचा उल्लेख ‘कुणबी‘ म्हणून केला आहे. इतर कुठल्याही जातीत आढळणार नाही, एवढा सन्मान स्त्रीचा आगरी जातीत केला जातो. एवढेच काय, स्त्रिधर्माची स्वागत करणारी जात ‘पहिली बेटी धनाची पेटी’, ” असा करून, या समाजातील स्त्री जातव्यवस्थेवरदेखील नीला उपाध्ये यांनी प्रकाश टाकला. तसेच त्यांनी आपल्या पुस्तकात आगरी बांधवांच्या व्यवसायात मिठागरांचे आणि चुनाभट्टीचे किती महत्त्व आहे, ते कसे सुरू झाले आणि आज कुठे आहे, हेदेखील उलगडून सांगितले.
"माझे आवडते कवी विंदा करंदीकर यांची ‘रक्तरक्तातील कोसळू दे भिंती' ही कविता माझ्या रगारगात भिनली आहे आणि तिचा मी आदर्श ठेवला आहे,” असे म्हणत नीला उपाध्ये यांनी या पुस्तकात आणि त्यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या जातीबांधवांचा, त्याचबरोबर आपले आजी-आजोबा, आई-वडील यांचा किती मोलाचा वाटा आहे, असे सांगत “मला माझी जन्मप्राप्त जात कधीच लपवाविशी वाटली नाही,” असे त्या म्हणाल्या. आयुष्यात पुढे जायचे असेल, तर जात हा अडथळा ठरता कामा नये. स्वप्न बघावे आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत कष्ट करावे. परिस्थितीत खचायचे आणि बदलायचे, मी हे अंगीकारले. म्हणून, आज हे पुस्तक लिहू शकले. ‘सीतेलादेखील अग्निदिव्य पार करावे लागले, तू तर साधी स्त्री आहेस!’ असे आपल्या आजीचे वाक्य उद्धृत करत त्यांनी श्रोत्यांना बळ दिले.