अमेरिकेचा युरोप होऊ द्यायचा नसेल तर.....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2022   
Total Views |

biden
 
 
बिल्ड बॅक बेटर’ या घोषणेसह जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे डेमोकॅ्रॅटिक पक्षाचा पुरोगामी-सेक्युलर अजेंडा ते राबविणार, यावर त्यांच्या विजयाने शिक्कामोर्तब झाले होतेच. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले असेच मुस्लीमविरोधी निर्णय बायडन सत्तारुढ होताच उलटवणार, हे तसे अपेक्षितच होते आणि झालेही तेच. बायडन यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी ट्रम्प यांनी मुस्लीम देशांतील नागरिकांवर अमेरिकेत येण्यासाठी प्रवेशबंदी उठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुकीपूर्वी आणि निकालानंतरही बायडन यांचे इस्लामप्रेम प्रकर्षाने दिसून आले. यंदाही ‘व्हाईट हाऊस’मध्ये ईद साजरी करण्याची ट्रम्प यांच्या काळात खंडित झालेली प्रथा बायडन यांनी पुन्हा सुरू केली.
 
 
यानिमित्ताने बायडन यांचे भाषणही झाले. त्यांनीही ‘इस्लामोफोबिया’ आणि मुस्लिमांवरील जगभरात होणारे अत्याचार किती दुर्दैवी आहेत आणि मानवाधिकारांचे हनन कसे होते वगैरेची नेहमीची पिपाणी वाजवली. त्यामुळे एकूणच यंदाच्या ईदच्या रंगात अगदी ‘व्हाईट हाऊस’ही रंगून गेले. आता अमेरिकेच्या या सत्ताकेंद्रात कुठला उत्सव साजरा करावा आणि कुठला करू नये, हा म्हणा सर्वस्वी राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांचाच निर्णय. पण, राष्ट्राध्यक्षांचा हा निर्णय खरंच किती अमेरिकन नागरिकांना रुचणारा ठरेल, हा तिथे संशोधनाचाच विषय ठरावा.
 
 
म्हणा, असेही वयाच्या ऐंशीकडे झुकलेल्या बायडन यांना अमेरिकन जनताही अजिबात गांभीर्याने घेत नाही. त्यातच आधी अफगाणिस्तानातील माघार आणि रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकेने केवळ दवडलेली तोंडाची वाफ पाहता, अमेरिकेच्या जागतिक महासत्तापदालाही धक्का बसलाच आहे. अशा परिस्थितीतही जो बायडन यांनी आळवलेल्या मुस्लीम रागामुळे कदाचित तेथील मुस्लीम समुदायाला हायसे वाटेलही, पण ‘९/११' चा भीषण दहशतवादी हल्ला अद्याप विसरु न शकलेल्या सामान्य अमेरिकन नागरिकांचे काय? त्यांचा विचार मात्र साहजिकच जो बायडन यांच्या गावी नाही. कारण, ‘९/११’च्या हल्ल्यात जवळपास तीन हजार नागरिकांचा मृत्यू झाला. इतिहासातील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जातो. पण, आज बायडन यांनाच ‘९/११’च्या हल्ल्याचा, त्यामागील जिहादी हल्लेखोरांच्या रक्तरंजित मनसुब्यांचा सर्वस्वी विसर पडला की काय, असाच प्रश्न उपस्थित होतो. त्यातही आज बायडन ज्या डेमोक्रेटिक पक्षाचे नेतृत्व करतात, त्यांच्याच पक्षाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीच पाकिस्तानातील अबोटाबादेत सैन्य घुसवून ‘९/११’ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनचाही खात्मा केला होता. इतकेच नाही, तर अफगाणिस्तान, सीरिया, लिबिया यांसारख्या कित्येक इस्लामिक देशांत अमेरिकेनेच सैन्यतैनाती करून या दहशतवाद्यांसह कित्येक निरपराध मुस्लीम नागरिकांचाही जीव घेतला.
 
 
 
त्यामुळे एकीकडे इस्लामी शक्तींविरोधात लढणारी अमेरिका आणि दुसरीकडे याच मुसलमानांना ‘व्हाईट हाऊस’मध्ये आमंत्रित करून त्यांना गौरवान्वित करणारी अमेरिका, असे विरोधाभासी चित्र पुरोगामित्वाच्या आड उभे केले जाते. या सगळ्याचा बायडन आणि त्यांच्यासारख्या पुरोगामींच्या लेखी पाया हा ‘गुड मुस्लीम’ आणि ‘बॅड मुस्लीम’चा सिद्धांत. म्हणजे सगळेच मुस्लीम वाईट नसतात, दहशतवादी, जिहादी नसतात ही मानसिकता. त्यात काही प्रमाणात तथ्य असले, तरी इस्लामच्या नावावरच त्यांची माथी भडकावणे हेही तितकेच सोपे, हे नाकारुन कसे चालेल? त्यातच अमेरिकेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, अमेरिकन-मुस्लीम मतदारसंख्याही तशी मतदान प्रक्रियेच्या फारशी दखलपात्र नाही. त्यांचे प्रमाण हे एकूण लोकसंख्येच्या केवळ एक टक्के इतकेच. पण, मग तेही हातचे का जाऊ द्या, म्हणत डेमोक्रेटिक पक्षाने प्रारंभीपासूनच अमेरिकन-मुसलमानांना खुश करण्याचे धोरण अवलंबिलेले दिसते. ओबामा आणि आता बायडनही त्याला अपवाद नाहीत. पण, बायडन यांनी अमेरिकेतच वरचेवर होणारे पिस्तूल हल्ले, चाकूहल्ले यामागच्या आरोपींचेही बुरखे एकदा उघडून पाहावेच. एवढेच नाही, तर पूर्वी मानवाधिकार, धर्मस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य वगैरेची ‘री’ ओढणार्‍या युरोपीय देशांमध्ये आज याच इस्लामी कट्टरतावादाचे किती मोठे आव्हान उभे ठाकले आहे, ते जगजाहीर आहेच. तेव्हा, अमेरिकेचा जर युरोप होऊ द्यायचा नसेल, तर जो बायडन यांनी आपल्या मुस्लीमधार्जिण्या धोरणांवर वेळीच लगाम कसणेच अमेरिकेसाठी हिताचे ठरावे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@