"भोंगे उतरवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार!" : राज ठाकरे

04 May 2022 13:41:39

Raj Thackeray
 
 
 
मुंबई : "जोपर्यंत राज्यातील मशिदींवरचे भोंगे खाली उतरणार नाहीत. तोपर्यंत मनसेचं हनुमान चालीसेचे आंदोलन सुरु राहणार", असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला. बुधवारी (दि. ४ मे) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दारम्यान ते बोलत होते. "जवळपास ९० - ९२ टक्के ठिकाणी पहाटेची अजाण आज झाली नाही. त्या मशिदींच्या मौलवींचे खास आभार मानेल. त्यांना आमचा विषय समजला. मात्र मुंबईतून आलेल्या रिपोर्टप्रमाणे मुंबईत ११४० मशिदी असून त्यापैकी १३५ मशिदींवर पहाटे ५च्या आत अजान झाली. या १३५ मशिदींवर मुंबई पोलीस काय कारवाई करणार आहेत, ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. पोलिसांनी यावर कारवाई करावी. माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई होणार असेल, तर होऊ दे. माणूसकीपेक्षा यांचा धर्म मोठा होत असेल, तर आम्हीही आमच्या धर्माला चिटकून राहू.", असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
 
 
 
विश्वास नांगरे पाटील म्हणाले, "आमचं बोलणं झालंय"   
"विश्वास नांगरे पाटील यांनी मला माहिती दिली. विश्वास नांगरे पाटलांचा फोन आला होता, ते म्हणाले होते की कुणीही भोंग्यावर अजान लावणार नाही, आम्ही सगळ्यांशी बोललोय. मग १३५ मशिदींवर पाचच्या आधीच अजान झाली, त्यांच्यावर कारवाई काय? ठराविक मशिदींवर अजान घेण्यात परवानगी दिल्याचं त्यांनी सांगितलं. पण अनधिकृत मशिदींवर भोंगे बसवण्यात आले आहेत. त्याला सरकारने अधिकृतपणे परवानगी कशी दिली." 
 
 
 
हनुमान चालीसा वाजणारच.
"राज्यात अनेक मौलवींना आमचा विषय समजला. यामुळे लोकांना होणारा त्रास कमी होईल. हा विषय फक्त मशिदींवरील भोंग्यांचा नाही तर अनेक मंदिरांवर असणारे भोंगेही खाली आले पाहिजेत. आता मुंबई महाराष्ट्रात अनेक मशिदी अनधिकृत आहेत. हे सरकार त्यांना ३६५ दिवस अधिकृत करत परवानगी देते. ही गोष्ट कल्पनेबाहेरची आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत अशावेळी पोलीस अशी ३६५ दिवसांची परवानगी कशी देऊ शकता? यांनीही भोंग्यांसाठी रोजच्या रोज परवानगी घ्यावी. पण माझं म्हणणं आहे की, पोलिसांना रोज एकच धंदा आहे का? की डेसिबल मोजत बसा आणि करावी करा. त्यामुळं जोपर्यंत हे अनधिकृत भोंगे उतरणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार. हा एका दिवसाचा प्रश्न नाहीये. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करायचे असेल तर रोज करा. ज्या ज्या मशिदीत मौलवी ऐकणार नाही त्यांच्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजणारच."
 
 
 
कायदा पाळणाऱ्यांना सजा? 
"महाराष्ट्रातून आणि बाहेरुनही अनेकांचे फोन येत आहेत. पोलिसांचेही फोन येत आहेत. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांनी ताब्यात घेतायत, नोटीस पाठवत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीच का होत आहे, असा आम्हाला प्रश्न पडलाय. कायदा पाळणाऱ्यांना तुम्ही सजा देणार, आणि जे पाळत नाहीत, त्यांना मोकळीक देणार? आमच्या लोकांची धरपकड कशासाठी ? आमची माणसं पकडून काय होणार आहे?"  
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0