मानसिक आजार आणि होमियोपॅथीची व्याप्ती

31 May 2022 11:10:51
 
 
 
mental health
 
 
 
 
 
निरोगी मनाचा जर कोणी मुख्य शत्रू असेल, तर तो मनाचा अहंकार. हा अहंकारच आपल्याला जगाच्या वास्तवापासून दूर ठेवत असतो. कारण, या अहंकारामुळे आपण आपली मनाची कवाडे इतरांसाठी बंद करुन घेतो व स्वत:चीच पूजा करू लागतो, स्वत:चीच स्तुती आपल्याला आवडू लागते. इतरांची मते, इतरांचे प्रयत्न आपल्याला तुच्छ वाटू लागतात. याचा अर्थ आपण भ्रम व खोट्या दुनियेत प्रवेश करत असतो, यामुळे आपली प्रगती खुंटते. सत्यापासून आपण फारकत घेत राहतो. जर आपण मनाची कवाडे बंद करुन घेतली, तर आपण इतर लोकांशी ‘कनेक्ट’ करू शकतच नाही त्यामुळे सत्यपरिस्थितीत आपली कामगिरी कशी आहे, हे आपल्यापर्यंत पोहोचतच नाही.
 
अहंकार हा आपल्या मनात अवाजवी आणि अवास्तव अपेक्षा आणि हक्काची भावना तयार करत असतो. अहंकारी माणसाला सतत एक भावना असते व ती म्हणजे स्वामित्वाची, हक्काची व वरिष्ठतेची. त्या भावनेमुळे आपल्याला मिळणारे काम किंवा हुद्दा हा आपल्या अपेक्षेप्रमाणेच असावयास हवा, असा त्यांचा मानस असतो. परंतु, प्रत्येक वेळी सत्यपरिस्थिती तशीच असते असे नाही. स्वामित्वाच्या आणि हक्काच्या भावनेने कित्येकदा इतरांच्या हक्काची पायमल्ली होत असते. कारण, इतरांच्या वेळेची हक्काची, प्रयत्नांची किंवा इतरांच्या पैशांची तमा या अहंकारी माणसाला अजिबातच नसते.
 
त्यामुळे मग कुठेतरी मनात हुकूमशाही तयार होत असते व हा आपल्याच मस्तीत राहून स्वत:चेच नुकसान करुन घेत असतो. जगापासून आपोआपच लांब जात असतो. अहंकारामुळे जेव्हा मन पूर्णपणे कलुषीत झालेले असते. त्यावेळी आपल्याला सतत बाह्य जगताकडून कामाच्या किंवा वागण्याच्या प्रमाणपत्राची गरज पडते. आपल्या वागण्याकडे, आपल्या बोलण्याकडे लोकांचे लक्ष असावे, आपली सर्वांनी सतत वाहवा करावी, आपली वाखाणणी करावी, असे सतत या लोकांना वाटायला लागते.
 
स्वत:लाच स्वत:च्या नजरेत मोठेपणा बहाल केल्यावर मग नेहमीच्याच गोष्टी सामान्य व कमी दर्जाच्या भासू लागतात व आपल्या इभ्रतीला साजेशी अशी जीवनशैली गरज नसतानाही अंगीकारली जाते. मग, त्यासाठी मोठे कर्ज काढून मोठे घर घेणे, मोठी महागातली गाडी घेणे, महागड्या गोष्टी खरेदी करणे, महागड्या हॉटेलमध्ये जाणे इत्यादी गोष्टींकडे कल वाढू लागतो. हे सर्व का केले जाते, तर इतरांकडून मोठेपणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वत:चा अनाठाई अहंकार जोपासण्यासाठी चालू असलेली ही धडपड असते. म्हणून आपल्या पुराणांपासूनच्या साहित्यात ही अहंकार हा मुख्य रिपू किंवा शत्रू मानला गेला आहे. अहंकारामुळे मग इतर वाईट गुण जसे क्रोध येणे, मत्सर वाटणे, हेकेखोरपणा, इतरांचा दुष्टपणा करणे इत्यादी गुण हे वाढीला लागतात, म्हणजेच षड्रिपुंच्या घेण्यात आपण अडकतच जातो, यापासून आणि जर सावध राहिलो तरच आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.
 
 
 
 
 
लेखक: डॉ. मंदार पाटकर
 
Powered By Sangraha 9.0