कोरोना महामारीने हरवले मुला-मुलींचे बालपण

31 May 2022 10:57:47
 
 
school in india during covid-19 
 
 
 
 
बहुसंख्य शाळकरी मुले त्यांच्या शाळेवर एक अशी जागा म्हणून अवलंबून असतात की, जिथे त्यांना त्यांच्या समवयस्क मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, मैत्रीपूर्ण संबंध जोपासणे, एकमेकांच्या समस्या व्यक्त करणे, त्यातून एक सर्वसामान्य उत्तर शोधणे शक्य होते. शाळा बंद म्हणजे शिक्षणामध्ये तर अडसर होताच, पण मुलांच्या मानसिक विकासातही पण महत्त्वाचा अडथळा आलेला आहे.
 
 
महामारीतील ‘लॉकडाऊन’च्या काळात जगभर सुमारे १६८ दशलक्षांहून अधिक मुलांच्या शाळा जवळजवळ वर्ष दीड वर्ष पूर्णपणे बंद होत्या. याशिवाय जागतिक स्तरावर सुमारे २१४ दशलक्ष मुलांची किंवा सातपैकी एका मुलाची वैयक्तिक शिक्षणाची संधी हुकली आहे. शाळा बंद पडल्यास मुलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर व त्यांच्या सर्वांगीण विकासावर घातक परिणाम होत असतात. असुरक्षित वातावरणात वाढणारी मुले किंवा ज्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीत प्रवेश करणे संभव होत नाही, अशा मुलांना कधीही वर्गात न परतण्याचा, बालमजुरीमध्ये शिरण्याचा वा बालविवाहात अडकण्याचा धोका अधिक राहतो, याचा अभ्यास आता सखोलपणे झाला पाहिजे.
 
 
विशेषत: विकसनशील देशात शहराबाहेर राहणार्‍या व शिक्षणासाठी अवघड परिस्थितीतून जाणार्‍या मुलांचे नक्की काय झाले आहे, याचा आढावा वेगाने घेतला पाहिजे. ‘युनेस्को’च्या ताज्या आकडेवारीनुसार जगभर ८८८ दशलक्षांहून अधिक मुलांच्या पूर्णपणे व आंशिक पातळीवर शाळा बंद झाल्याने त्यांच्या शिक्षणात खूप व्यत्यय येत आहेत. बहुसंख्य शाळकरी मुले त्यांच्या शाळेवर एक अशी जागा म्हणून अवलंबून असतात की, जिथे त्यांना त्यांच्या समवयस्क मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, मैत्रीपूर्ण संबंध जोपासणे, एकमेकांच्या समस्या व्यक्त करणे, त्यातून एक सर्वसामान्य उत्तर शोधणे शक्य होते. शाळा बंद म्हणजे शिक्षणामध्ये तर अडसर होताच, पण मुलांच्या मानसिक विकासातही पण महत्त्वाचा अडथळा आलेला आहे.
 
शाळेत जाण्याचा काळ हा प्रत्येकाच्या जीवनात बहुमूल्यकाळ असतो. शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि तात्त्विक विकासाच्या या काळात ‘कोविड-19’ महामारीच्या एका अभूतपूर्व संकटाचा अनुभव घेतल्यानंतर काहींनी प्रियजनांना गमावल्याचा अनुभव घेतल्यानंतर आणि स्वत:ला व घरात इतरांना या साथीच्या आजारात ग्रस्त झाल्याचे पाहिल्याने मुलांवर एक नकारात्मक, भावना दुखावणारा अनन्य प्रभाव पडू शकतो. अनेक लहान मुले घरात वावरत असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाची हानी, अन्नाचा तुटवडा, घराची असुरक्षितता आणि आरोग्याच्या समस्या व आरोग्यसेवेचा अभाव या सगळ्या गोष्टींचा विशेषत:मोठा फटका बसलेला आहे.
 
 
‘कोविड-१९’ची लागण झालेल्या अनेक मुलांना या आजाराचे दीर्घकालीन परिणाम जाणूव शकतात. यापैकी बर्‍याच प्रभावांचा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांवर आणि पाश्चात्य देशांमधील मुलांवर असमानतेने परिणाम झालेला आहे. या मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या अधिक जाणवल्या. विशेषकरून मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक जाणवत आहेत. शाळांच्या अनेक समस्या आजही आहेत. शाळा चालू करायचे ठरले तेव्हा सगळेच वातावरण चिंतेच्या ढगांनी भरलेले होते. शिक्षकांचा आत्मविश्वास आणि प्रेरणा कमी होती.
 
 
शिवाय ते सगळे बिथरलेले होते. आपल्या देशात ९६ टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे कल्याण आणि मानसिक आरोग्यविषयक समस्यांचे जर निराकरण करायचे असेल, तर आम्हाला खूप आधाराची गरज आहे, असे आजही अनेक शिक्षकांचे म्हणणे आहे. एक प्राचार्य म्हणतात की, अनेक विद्यार्थी असुरक्षित तुटपूंजा वातावरणात येत असतात. त्यांना विशेष आधार आणि काळजीची गरज लागते. कारण, साथीच्या रोगाची एकंदरीत पार्श्वभूमी आणि गेल्या दोन वर्षांचा अनुभव पाहता मुलांच्या मनावर आणि भावनांवर त्याचा खूप गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येते. बहुतेक शाळांमधून शिक्षकांना महामारी आणि ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान व नंतरही शाळकरी मुलांच्या मनावर व भावनांवर होणार्‍या परिणामांबद्दल जाणीव आहे.
 
 
परंतु, त्या कशा सोडवायच्या वा त्यांचे निराकरण कसे करायचे, यासंबंधीचे निश्चित असे नियोजन नाही. किंवा उपायांचे ज्ञान नाही शिवाय पालकांचे सहकार्य यात जरी अपेक्षित असले, तरी ते किती सहकार्य करतील, याचा अंदाज आज शाळांना नाही. यापुढे जाऊन शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि त्यांचा आत्मविश्वास याचाही प्रश्न आहेच. सामान्यत: मुलांना आपली स्थिरावलेली प्रस्थापित दिनचर्या आवडते. त्यावर ते छान जोपासले जातात. त्यांच्या नेहमीच्या दैनंदिन चालीरिती व सवयी याकाळात भरकटत गेल्या, हे या अशा परिस्थितीत आपण मुलांकडून काय काय अपेक्षा करू शकतो. आजही कित्येक मुलांना अस्वस्थ वाटते आहे. तणाव, चिंता, राग किंवा दु:ख निराशा यांसारख्यानकारात्मक भावनांच्या अनुभवाने बरीच मुले नको तेवढी उत्तेजित झालेली आहेत. या भावना व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळायला हवी. आपल्यात असे विचित्र बदल का बरे झाले आहेत, हे त्यांना कळायला पाहिजे. या सर्व रगाड्यात आपण स्थिरावू शकू, हे आश्वासन त्यांना मिळाले पाहिजे.
 
 
 
 
लेखक- डॉ. शुभांगी पारकर
 
Powered By Sangraha 9.0