चंडीगड : प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवार दि. २९ मे रोजी सायंकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवार दि. ३१ मे रोजी मुसेवाला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाने मूसा गावात त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर हा विधी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गावकरी, गुरदास मान यांसारखे प्रख्यात गायक आणि पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि आमदार सुखजिंदर रंधावा यांच्यासह त्याचे अनेक चाहते मुसेवाला यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते.
त्यांना निरोप देण्यासाठी चाहत्यांना अश्रू अनावर झाले. गावातील नागरिकांनी सिद्धूच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांनी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे.