पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर जयंती : चौंडीतील भाषणात पवार काय म्हणाले?

31 May 2022 16:33:19


sharad pawar 2
 
  
 
 
 
पुणे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त दि. ३१ मे रोजी जन्मस्थळी चौंडीत कार्यक्रम संपन्न झाला. आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात हा कार्यक्रम असल्याने राष्ट्रवादीतर्फे हा कार्यक्रम 'हायजॅक' करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत पोलीसांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीच्या वेशीवरत अडवून ठेवलं होतं.
 
 
 
भाजप कार्यकर्त्यांना पोलीसांच्या दंडुकेशाहीचा फटका यावेळी बसला. यावेळी पडळकरांनी पवारांवर जाहीर टीका केली. या सगळ्या वादादरम्यान पवारांचे भाषण सुरू होते. त्यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार आणि अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीचे भाषण शरद पवार यांनी केले. आजचा हा सोहळा हा एकप्रकारे ऐतिहासिक सोहळा आहे. असे पवार म्हणाले.
 
 
 
पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा दिला. "अहिल्यादेवींनी उभ्या आयुष्यामध्ये जे कर्तृत्व दाखवले ते नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. अनेक मान्यवर महिला या देशात होऊन गेल्या. पण साधारणत: तीन महिलांची आठवण देशात ठिकठिकाणी काढली जाते. राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर. जिजामातेने शिवाजी महाराजांना अन्यायाविरुद्ध लढायला एक आत्मविश्वास दिला.", असे पवार म्हणाले.
 
 
 
"सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दरवाजे मुलींसाठी खुले केले आणि अहिल्यादेवींने एक वेगळे काम केले ते काम म्हणजे कौटुंबिक संकट आल्यानंतर सुद्धा राज्यशकट हातामध्ये घेत त्यांनी प्रशासनाच्या संदर्भातील एक आदर्श देशासमोर ठेवला. असे देखील पवार आपल्या भाषणात म्हणाले. अहिल्यादेवींनी समाजासाठी अनेक उपयुक कार्ये हाती घेतली व ती पूर्ण करून दाखवली. समाजामधील चुकीच्या प्रथा थांबवण्यासाठी अहिल्यादेवी यांनी प्रयत्न केले, हुंडाबंदीमध्ये लक्ष घातले, विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी निर्णय घेतले.", असेही ते म्हणाले.
 
 
 
"कन्यादानाच्या संदर्भातील निर्णय घेतला. सर्व जातीधर्मातील लोकांना घेऊन राज्य चालवण्यासाठी सर्वधर्मसमभावाची संकल्पना त्यांनी कृतीमध्ये आणली. त्याचबरोबर प्रशासनाचा अधिकार आल्यानंतर ते प्रशासन कसे चालवायचे याचा आदर्श अहिल्यादेवींनी संपूर्ण देशासमोर ठेवला. सावित्रीबाईंचे काम एका वेगळ्या दिशेने होते. जिजामातेचे काम वेगळ्या पद्धतीचे होते आणि अहिल्यादेवींचे काम हे सर्वसमावेशक अशा प्रकारचे होते. परिवर्तनाला प्रोत्साहन देणारे होते. आज अहिल्यादेवींच्या जयंतीचा दिवस हा देशातील स्त्री वर्गाचा सन्मान करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांचा अधिकार वाढवणे यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून याठिकाणी होतोय याचे पवारांना समाधान वाटते.", असेही ते म्हणाले.
 
 
 
"दुष्काळी भागासाठीही त्यांनी पावले उचलली होती. कर्जत जामखेड विभागाचे आमदार असलेल्या रोहित पवारांचे शरद पवार यांनी कौतुक केले. कर्जत जामखेड परिसरातील दुष्काळाचे दुखणे फार जुने आहे. उद्योगाचा प्रश्न सुटलेला नाही. पवार यांना आनंद एका गोष्टीचा आहे की, इथल्या जनतेने निवडणुकीमध्ये रोहीत सारख्या एका तरूण कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने निवडून दिले. त्याच्या हातामध्ये कामाची संधी दिली. मागील दोन अडीच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे अशी झाली आहेत, ज्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पर्श दिसावा. उदाहरणार्थ, अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठिकठिकाणी बारव केले. त्या बारवातून पाण्याची सुविधा केली. इथल्या लोकांना त्यांची अपेक्षा विचारली तर ते फक्त पाणी सांगतात. रोहितने जबाबदारी घेतल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून पाणी इथे कसे आणता येईल यासंबंधी अनेकदा बैठका घेतल्या. पवार यांना खात्री आहे की, येत्या कालखंडात पाण्याचा प्रश्न सोडविण्याची सुरुवात इथे पाहायला मिळेल.", असे पवार म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0